Solapur, 10 November : सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघात महायुतीमध्ये बेबनाव झाला असून शिवसेनेने महायुतीचा धर्म न निभावता अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांनी आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव, अपक्ष उमेदवार रणजितसिंह शिंदेंंना पाठिंबा दिला आहे, त्यामुळे माढ्यात महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचे मानले जात आहे.
माढा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील, महायुतीकडून (Mahayuti) माढ्याच्या नगराध्यक्षा मीनल साठे, तर रणजितसिंह शिंदे हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. याव्यतिरिक्त इतरही उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, या तिघांमध्ये मुख्य लढत आहे.
शिवसेनेचे संपर्कप्रमुख शिवाजी सावंत (Shivaji Sawant) आणि आमदार बबनराव शिंदे (Babanrao Shinde) यांच्यामध्ये माढा तालुक्यातील आलेगाव येथील भैरवनाथ शुगर कारखान्यावर बैठक झाली. त्या बैठकीनंतर शिवाजी सावंत यांनी रणजितसिंह बबनराव शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या कुटुंबीयांकडून महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार होणे अपेक्षित असताना त्यांनी आमदार बबनराव शिंदे यांच्या मुलाला पाठिंबा जाहीर केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
माढा तालुक्यातील सावंत आणि शिंदे हे एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी असणारी घराणी आहेत. अनेक निवडणुका त्यांनी एकमेकांच्या विरोधात लढवल्या आहेत, त्यामुळे सावंत आणि शिंदे युतीचे माढा तालुक्यात नवल आहे.
दरम्यान, शिवाजी सावंत हे महायुतीकडून माढ्यातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटल्याने अजित पवार यांनी माढ्याच्या नगराध्यक्षा मीनल साठे यांना उमेदवारी जाहीर केले आहे, त्यामुळे नाराज झालेल्या सावंत गटाने गेल्या आठवड्यात वाकाव येथे विचारविनिमय मेळावा घेतला होता. त्या मेळाव्यात त्यांनी कोणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे जाहीर केले होते, त्यानुसार सावंत यांनी बबनराव शिंदे यांच्याशी जुळवून घेत त्यांच्या मुलाला पाठिंबा जाहीर केला आहे.
निवडून येणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय : शिवाजी सावंत
याबाबत शिवाजी सावंत म्हणाले, सर्व कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करून आम्ही अपक्ष उमेदवार रणजितसिंह बबनराव शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. जो उमेदवार निवडून येईल, त्यालाच पाठिंबा द्यायचा, असं आमचं ठरलं होतं, त्यानुसार रणजित शिंदे यांना पाठिंबा देत असल्याचे सावंत यांनी जाहीर केले.
शिंदे-सावंतांमध्ये राजकीय संघर्ष नव्हता : बबनराव शिंदे
सावंत आणि शिंदे कुटुंबीयांमध्ये कधीही राजकीय संघर्ष नव्हता. आम्ही 2009 मध्ये एकत्र काम केले आहे आणि यापुढेही एकत्र काम करण्याचे आमचे ठरले आहे, त्यामुळे रणजित शिंदे यांचा विजय नक्की आहे. आम्हाला विजयाचा विश्वास होता. आता त्यात सावंतांच्या पाठिंब्याची भर पडली आहे, असे आमदार बबनराव शिंदे यांनी सांगितले.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.