Maharashtra government officer death news : राज्यातील प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार यांचा मृतदेह रेल्वे रूळावर आढळला आहे, तर नांदेड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंत्याने कार्यालयात गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळले आहे.
या दोन्ही घटनांमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. दोन्ही घटनांची आपापल्या पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.
अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार (Tehsildar) किरण देवतरसे (वय 58)यांचा मृतदेह निंबळक (ता. नगर) इथल्या रेल्वे रूळावर आढळला आहे. ते सहा महिन्यानंतर निवृत्त होणार होते. तत्पूर्वी त्यांच्याबाबत अशी घटना घडल्याने जिल्ह्यातील महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे.
किरण देवतरसे हे नागरदेवळे (ता. नगर) ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणारे आलमगीर इथले रहिवाशी आहेत. त्यांचा मृतदेह शनिवारी थेट निंबळक (ता. नगर) इथल्या रेल्वे रूळावर छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला. गेल्या काही दिवसांपासून तणावात होते, असे सांगितले जात आहे. देवतरसे यांनी श्रीगोंदा, शेवगाव तहसील कार्यालयासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागात कर्तव्य बजावलं आहे. मागील दोन वर्षांपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयातील (Collector Office) मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे प्रमुख म्हणून काम पाहात होते.
नांदेड इथल्या जिल्हा परिषदेच्या नायगाव इथल्या बांधकाम उपविभागात कार्यरत असलेले कनिष्ठ अभियंता विलास बल्लुरे हे कार्यालयात गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळले. कार्यालयात तांत्रिक अधिकारी नसल्याने देगलूर इथं कार्यरत असलेले विलास बल्लुरे यांना प्रतिनियुक्तीवर नायगाव इथं काम करण्याचा आदेश होता. मागच्या दोन-तीन वर्षांपासून ते नायगाव इथं कार्यरत होते.
बल्लुरे यांच्याकडेच कार्यालयाची चावी असायची. काही दिवसांपूर्वी त्यांची पदोन्नती देखील मिळाली होती. यातच नायगाव इथल्या कार्यालयातील पहिल्या मजल्यावर गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळले. शनिवार असल्याने कार्यालय बंद होते. मात्र, आजूबाजूला असणाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली.
पोलिसांनी कार्यालयाचे दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. पण कुटुंबासह अन्य नातेवाइकांनी सायंकाळी पाचपर्यंत कुलूप उघडू दिले नाही. त्यामुळे पोलिस हतबल झाले. समजूत घातल्यानंतर पुढे कायदेशीर कारवाई झाली. कनिष्ठ अभियंता बल्लुरे यांनी गळफास का घेतला, याबाबत वेगवेगळ्या चर्चा होत्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.