

Disabilities welfare department : दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तुकाराम मुंढे यांच्याकडे असलेल्या दिव्यांग कल्याण विभागाने वैद्यकीय अधिकाऱ्याविरोधात राज्यात पहिला गुन्हा नोंदवला आहे.
29 जानेवारी 2026ला सांगलीमधील ईश्वरपूर पोलिस ठाण्यात प्रथम माहिती अहवाल दाखल करण्यात आला होता. त्यानुसार दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या तरतुदींमधील कलम 91 नुसार हा गुन्हा दाखल झाला आहे.
सांगली (Sangli) जिल्ह्यातील ईश्वरपूर तालुक्यातील एका सरकारी रुग्णालयात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याने 2016 ते 2019 या कालावधीत दिव्यांग व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या वैश्विक दिव्यांग ओळखपत्रासंदर्भात (यूडीआयडी कार्ड) आवश्यक कार्यवाही केली नाही. तसा आरोप आहे. याप्रकरणी ईश्वरपूर (जि. सांगली) पोलिस ठाण्यात प्रथम माहिती अहवाल दाखल करण्यात आला होता.
डॉ. रघुनाथ राजाराम भोई (वय 65) हे 2016 ते 2019 या कालावधीत ईश्वरपूर इथल्या उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत होते. सरकारी निर्णय नऊ ऑक्टोबर 2025 नुसार दिव्यांगांसाठी ‘यूडीआयडी नोंदणी’ अनिवार्य असतानाही संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याने सरकारच्या (Maharashtra) नियमांनुसार दिव्यांग प्रमाणपत्राचे नुतनीकरण तसेच ‘यूडीआयडी’ प्रणालीअंतर्गत आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली नाही.
या मुळे दिव्यांग व्यक्ती सरकारी योजनांपासून वंचित राहिल्याचा आरोप आहे. यातून दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांचे उल्लंघन झाले. जिल्हा शल्यचिकित्सक, सांगली तसेच उपसंचालक, आरोग्यसेवा, कोल्हापूर मंडल यांच्या पत्रानुसार या प्रकरणात दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील कलम 91अंतर्गत कारवाई करण्याचा आदेश होता.
दिव्यांग कल्याण विभागाच सचिव तुकाराम मुंढे यांनी, दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्र वैधतेबाबत दिव्यांग कल्याण विभागास अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींत दिव्यांगांचे वैश्विक ओळखपत्र ‘यूडीआयडी कार्ड’बाबत साशंकता व्यक्त केलेली आहे. त्यामुळे दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राची ‘यूडीआयडी कार्ड’ पडताळणी करणे आवश्यक असून, याचाच एक भाग म्हणून राज्यात पहिला गुन्हा दाखल झाला आहे, असे म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.