Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाची धार तीव्र केली आहे. उपोषण सुरू असतानाच सरकारसोबत चर्चा करून तोडगा निघाला नाही, तर मुंबईकडे कूच करण्याची भूमिका जरांगे यांनी घेतली आहे. सरकारकडून आंदोलन कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांच्याकडून केला जात आहे. त्यामुळे एकीकडे जरांगे सरकारवर दबाव वाढवत असताना दुसरीकडे त्यांच्याविरोधात गंभीर आरोप करत मराठा कार्यकर्ते अजय बारसकर यांनी थेट EDकडे धाव घेतली आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाच्या नावाखाली आर्थिक गैरव्यवहार आणि मोठ्या प्रमाणात अवैध संपत्ती जमा केल्याचा आरोप बारसकर यांनी केला असून, तब्बल हजार कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. अजय बारसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांविरोधात त्यांनी पाच दिवसांपूर्वी अंमलबजावणी संचालनालयाकडे (ED) तक्रार दाखल केली.
याप्रकरणी ED कार्यालयाकडून त्यांना बोलावण्यात आल्यानंतर त्यांनी डेप्युटी डायरेक्टर यांच्यासमोर आपली बाजू मांडली. तसेच आपल्याकडे उपलब्ध असलेले पुरावे आणि संबंधित कागदपत्रे अधिकाऱ्यांकडे सादर केल्याचा दावा त्यांनी केला. बारसकर यांनी आपल्या तक्रारीत मनोज जरांगे यांच्या काही निकटवर्तीयांच्या आर्थिक व्यवहारांवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.
पांडुरंग तारक, ईश्वर बलांडे, गंगाधर काळकुटे, श्रीराम पुरणकर, संजय कटारे, स्वप्नील तारक, बद्रीनाथ तारक आणि विलास खेडकर यांच्यासह इतर काही व्यक्तींच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पांडुरंग तारक यांच्याकडे पूर्वी केवळ १० गुंठे जमीन होती, मात्र आता त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात जमीन असल्याचा दावा बारसकर यांनी केला.
अंतरवली आणि छत्रपती संभाजीनगर परिसरात कोट्यवधी रुपयांच्या जमिनी खरेदी केल्याचा आरोपही त्यांनी केला. आंदोलनाच्या काळात संबंधितांच्या राहणीमानात आणि संपत्तीत झालेल्या कथित वाढीचा आर्थिक स्रोत तपासला जावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासोबतच वाळू व्यवसायाशी संबंधित आर्थिक व्यवहारांचीही चौकशी करण्याची मागणी बारसकर यांनी केली. त्यांच्या दाव्यानुसार, या प्रकरणात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला असून त्याची व्याप्ती किमान हजार कोटी रुपयांपर्यंत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करून संबंधितांची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
मनोज जरांगे यांच्या वापरातील महागड्या डिफेंडर गाडीचा मुद्दाही बारसकर यांनी उपस्थित केला. ही गाडी कुठून आली, तसेच लीलावती रुग्णालयातील उपचारांचा खर्च कशातून करण्यात आला, याची चौकशी व्हावी, असा सवाल त्यांनी केला. संबंधित व्यक्तींच्या संपत्तीपासून जमीन खरेदी आणि इतर आर्थिक व्यवहारांपर्यंत सर्व बाबी तपासण्याची मागणी त्यांनी EDकडे केल्याचे सांगितले.
दरम्यान, जरांगे यांच्या राजकीय नेत्यांसोबत झालेल्या कथित बंद दाराआडच्या चर्चांवरूनही बारसकर यांनी सवाल उपस्थित केला. जरांगे पूर्वी खुलेपणाने चर्चा करण्याची भूमिका मांडत होते. मात्र, त्यानंतर विविध राजकीय नेत्यांसोबत त्यांच्या बंद दाराआड बैठका झाल्याचा दावा बारसकर यांनी केला. अशोक चव्हाण, उदय सामंत, संदीपान भुमरे, अजित पवार, शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत नेमकी काय चर्चा झाली, याचा खुलासा जरांगे यांनी करावा, असे आव्हान त्यांनी दिले.
बारसकर यांनी जरांगे यांच्या आंदोलनाच्या पद्धतीवरही जोरदार टीका केली. कॅप्टन अशोक खरातचा संदर्भ देत त्यांनी जरांगेंना ‘सामाजिक खरात बाबा’ अशी उपमा दिली. उपोषणाच्या माध्यमातून मराठा समाजाची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच उपोषणादरम्यान सलाईन आणि ग्लुकोज घेतले जात असल्याचा दावाही बारसकर यांनी केला. २ सप्टेंबरला अंतरवली सराटी येथे ‘जिंकलो रे राजा’ अशी घोषणा देण्यात आली होती. या घोषणेचा संदर्भ देत हैदराबाद गॅझेटचा GR आणि ‘सगेसोयरे’च्या मुद्द्यावरून मराठा समाजाची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप बारसकर यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.