ajit pawar (4).jpg sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar News: अजित पवारांच्या निधनानंतर भाजपनं तडकाफडकी घेतलेला मोठा निर्णय, आता दादांचा 'तो' शेवटचा व्हिडीओ आला समोर

NCP VS BJP News: एकीकडे अजित पवारांच्या अकाली निधनानंतर भाजपनंही जिल्हा परिषदांसह पंचायत समितींच्या निवडणुकांसाठी प्रचार न करण्याचा निर्णय घेतला होता. आता त्याचवेळी अजितदादांचा मृत्यूपूर्वी तयार करण्यात आलेला एक शेवटचा व्हिडीओ समोर आला आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारीला सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत निधन झालं. अजितदादांच्या अकाली निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर दु:खाचा डोंगर कोसळला. अजित पवारांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरुन न येणारी अशी मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवारांच्या अपघाताबाबत रोज नवनवीन धक्कादायक बाबी समोर येत आहेत. अशातच आता दादांचा एक मृत्यूपूर्वी शेवटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी महापालिका निवडणुकीतील निराशाजनक कामगिरी मागे टाकत जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांसाठी जोर लावला होता. त्यांनी एकापाठोपाठ एक सभा घेत राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका जिंकण्यासाठी कंबर कसली होती. पण त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महायुतीसह संपूर्ण राज्यच शोकसागरात बुडालं आहे. अशातच आता अजितदादांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

एकीकडे अजित पवारांच्या अकाली निधनानंतर भाजपनंही जिल्हा परिषदांसह पंचायत समितींच्या निवडणुकांसाठी प्रचार न करण्याचा निर्णय घेतला होता. आता त्याचवेळी अजितदादांचा मृत्यूपूर्वी तयार करण्यात आलेला एक शेवटचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओत अजित पवार नागरिकांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस वा त्यांच्या पक्षासह स्थानिक पातळीवर झालेल्या युत्या, आघाडीच्या उमेदवारांसाठी मतदान करण्याचं आवाहन करत आहेत.

अजित पवार यांच्या दुर्घटनेच्या काही दिवसांपूर्वी हा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. अजित पवारांनी या व्हिडिओत महाराष्ट्रातील जनतेला जिल्हा परिषदा व पंचायत समितींच्या मतदानासंदर्भात आवाहन केलं होतं. लोकशाही मूल्यांवर दृढ विश्वास ठेवत शेवटच्या क्षणापर्यंत जनतेशी जोडून राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या अजित पवारांच्या कार्याची आणि विचारांची ही आठवण आहे. त्यांच्या या संदेशातून लोकशाही मजबूत करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, असा त्यांचा ठाम संदेश या व्हिडिओत दिसून येत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसनं या व्हिडिओबाबत प्रसिद्धी पत्रक जारी करुन माहिती दिली आहे. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक 2026 करीता मतदारांना उद्देशून संदेश देणारा व्हिडीओ शनिवार, दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी देवगिरी या शासकीय निवासस्थानी रेकॉर्ड करण्यात आला आहे. सदर व्हिडिओ प्रिय मतदार बंधू भगिनींसाठी व प्रसार माध्यमांकरीता प्रसारित करण्यात येत आहे. सदर व्हिडीओ पूर्णतः ओरिजनल आहे", असंही राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

अजित पवार व्हिडिओत काय म्हणाले?

उपमुख्यमंत्री अजित पवार संबंधित व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणतात, "नमस्कार बंधू-भगिनींनो, आपल्या गावाचा, तालुक्याचा आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास कुणाच्या हातात द्यायचा, हे ठरवण्याची ही महत्त्वाची वेळ आहे. जिल्हा परिषद ही ग्रामीण विकासाची महत्त्वाची किल्ली आहे. पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, शेती, रोजगार यासारख्या मुलभूत प्रश्नांशी थेट जोडलेली ही संस्था आहे", असंही त्यांनी म्हटलंय.

"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच ग्रामीण भागाला केंद्रस्थानी ठेवून काम केलं आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून महिलांच्या सक्षमीकरणापर्यंत, तरुणांच्या रोजगारापासून ते ज्येष्ठांच्या सन्मानापर्यंत आणि विकासाचा प्रत्येक मुद्दा आम्ही गांभीर्याने हाताळलेला आहे. मी केवळ शब्दाचा पक्का नाही तर कामाचा माणूस आहे. दिलेला शब्द पाळणं ही माझी ओळख आहे. पाणीपुरवठा असो, रस्त्यांची कामे असोत, आरोग्य सुविधा असोत किंवा शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान अर्थात AI, डिजीटल साधनं असोत, हे सर्व ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचा आमचा ठाम निर्धार आहे", असल्याची स्पष्ट भूमिकाही अजित पवार त्यांच्या प्रचारासंबंधीच्या व्हिडिओत मांडतात.

"या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना साथ द्या. स्वच्छ, कार्यक्षम आणि लोकाभिमुख कारभारासाठी आम्हाला संधी द्या. तुमच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही. विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. हा माझा शब्द असल्याचंही ते या व्हिडिओच्या माध्यमातून मतदारांना म्हणतात.

विकासाच्या या प्रवासात आमच्यासोबत सहभागी व्हा. येत्या 5 फेब्रुवारीला घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबा,असं आवाहनही अजित पवार यांनी मतदारांना केलं आहे. मतरुपी तुमचा आशीर्वाद आम्हाला द्या, असं आवाहन मी या निमित्ताने करतो. तुमचं एक मत गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि गावाच्या समृद्धीसाठी आहे हेही लक्षात ठेवा. धन्यवाद! जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी", असंही व्हिडिओच्या शेवटी अजित पवार म्हणतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT