ajit pawar devendra fadnavis eknath shinde sarkarnama
महाराष्ट्र

Mahayuti News : एकनाथ शिंदे अन् अजित पवारांमुळे भाजपचं नुकसान झालं का? सर्व्हेतून मोठी बाब समोर

Akshay Sabale

2019 मध्ये शिवसेनेनं 25 वर्ष भाजपसोबत असलेली युती तोडली. शिवसेनेनं काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जात महाविकास आघाडी स्थापन करत सरकार बनवलं. यानंतरच महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय घडामोडी सर्वांना परिचित आहेत.

पण, 2022 मध्ये शिवसेनेत ( Shivsena ) फूट पडली आणि एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली. तर, 2023 मध्ये अजित पवार यांनीही राष्ट्रवादीत फूट पाडत काही आमदारांसह शिवसेना-भाजपच्या सरकारला पाठिंबा दर्शवला.

2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं ( Bjp ) '45 पार'चा नारा दिला होता. मात्र, शिवसेना-राष्ट्रवादी आणि भाजपच्या महायुतीला '17' जागा पारही करता आल्या नाहीत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 23 जागा जिंकणाऱ्या भाजपला यंदा दोन अंकी आकडाही गाठता आला नाही. भाजपला फक्त 9 जागा मिळाल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी फूट पडल्यानं जनतेत रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे मतदानाच्या स्वरूपातून जनतेनं नाराजी वर्तवल्याचं वेगवेगळ्या राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे.

तसेच, "अजित पवार यांना सोबत घेतल्यानं मेहनतीनं राज्यात एक नंबर बनलेल्या भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली," अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ( आरएसएस ) मुखपत्रातून लोकसभेत जागा कमी झाल्यानंतर फटकारण्यात आलं होतं. एकप्रकारचे अजित पवार यांना सोबत घेतल्यानं भाजपचं लोकसभेला नुकसान झालं, असं 'आरएसएस'चं मत होतं. पण, भाजपच्या केंद्र-राज्य नेतृत्वाला अद्याप अजित पवार यांच्याशी युतीबाबतचे स्पष्टीकरण देता आलेले नाही.

यातच 'सकाळ माध्यम समुहा'नं एक सर्वेक्षण केलं आहे. त्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमुळे भाजपचं नुकसान झालं का? याबाबत जनतेची मते जाणून घेण्यात आली आहेत. अजित पवार यांच्यामुळे भाजपचं नुकसान होत असल्याची जनतेची भावना कायम राहिली. तर, एकनाथ शिंदे यांच्याबद्दल ती भावना तितकीशी तीव्र नाही. 2022 आणि 2023 मधील पक्ष फुटींबद्दल स्पष्टीकरण उपलब्ध नसल्यानं भाजपचे समर्थन करणारे मतदान 'दोन्ही पक्षांमुळे' भाजपचं नुकसान झाल्याचं मानतात.

सर्वेक्षणात काय?

22 टक्के लोक म्हणतात अजित पवारांमुळे भाजपचे नुकसान झालं. तर, 5.5 टक्के लोक एकनाथ शिंदेंमुळे भाजपचं नुकसान झाल्याचं मानतात. 19.7 टक्के लोकांच्या मते 'दोन्ही पक्षांमुळे' भाजपचं नुकसान झालं आहे. 13.5 टक्के लोक 'दोन्ही पक्षांमुळे' भाजपचं नुकसान झालं नसल्याचं म्हणतात. 13.7 टक्के लोकांच्या मते भाजपच्या राजकारणाचा परिणाम म्हणून त्यांचं राजकीय नुकसान झालं आहे. तर, 25.6 टक्के लोक सांगता येणार नाही, असं मत मांडतात.

विधानसभेला मतदारांची पसंती कुणाला?

सर्वेक्षणात 48.9 टक्के मतदारांचा कल विधानसभेला महाविकास आघाडीच्या बाजूनं आहे. तर, 33.1 टक्के मतदारांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीला पसंती देणार असल्याचं म्हटलं आहे. तर, 4.9 टक्के जनतेची महायुती आणि महाविकास आघाडीलाही नाकारलं आहे. 13.3 टक्के मतदारांनी कुणाला मतं द्यायचं, हे अजून ठरलं नसल्याचं सांगितलं आहे.

कुठल्या पक्षाला जनतेची पसंती?

पक्षांमध्ये भाजपला 28.5 टक्के मतदारांनी पसंती दर्शवली आहे. त्याखालोखाल काँग्रेस 24 टक्के, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) 14 टक्के, शिवसेना ( ठाकरे गट ) 11.7 टक्के, शिवसेना ( शिंदे गट ) 6 टक्के, राष्ट्रवादी ( अजित पवार ) 4.2 टक्के, असा पाठिंबा मतदारांनी सर्वेक्षणातून नोंदवलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT