Anand Adsul, Amit Shah, Abhijeet Adsul, Devendra Fadanvis,  Sarkarnama
महाराष्ट्र

Mahayuti News : महायुतीत नाराजीनाट्य, अमित शहांनी शब्द पाळला नाही; राज्यपालपदासाठी डावलल्यानंतर अडसूळ कुटुंबातून संताप

Sachin Waghmare

Mumbai News : राज्यातील महायुतीमध्ये नुकत्याच झालेल्या राज्यपाल पदाच्या नियुक्तीवरून वादाची ठिणगी पडली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी अमरावती लोकसभा निवडणूक न लढण्याच्या बदल्यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी राज्यपाल पदाचा शब्द देण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. मात्र, राज्यपाल पदी त्यांची वर्णी न लागल्याने शिवसेनेचे युवा नेते अभिजित अडसूळ यांनी खदखद व्यक्त केली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून राज्यपाल पदाचा शब्द देण्यात आला होता. त्यानंतर आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांना राज्यपालपदी डावललं गेल्याची खंत अभिजित अडसूळ यांनी व्यक्त केली. युतीमध्ये आणखी किती काळ अन्याय सहन करायचा, आमच्या देखील मर्यादा आहेत, असे म्हणत महायुतीसाठी ही धोक्याची घंटा असल्याचा इशारा शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे नेते अभिजित अडसूळ यांनी दिला आहे.

27 मार्चला झालेल्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यपालपदाचे आश्वासन दिले होते. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी देखील नीती आयोगाच्या बैठकीपूर्वी शिफारसपत्र अमित शहा यांना पाठवले होते, असेही अडसूळ म्हणाले.

भाजप नेत्यांच्या आग्रहाखातर मी मुंबई बँकेच्या निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यानंतर आश्वासन दिले होते. मात्र, मला साधं संचालकपदी घेतले नाही. मुंबई बँकेत अडीच वर्ष अन्याय झाला. दरेकर यांच्यावर लेबर कमिशनने त्यांचे पद रद्द केलं होते, अडीच वर्ष झाले तरी प्रवीण दरेकर त्यांच ऐकत नाहीत, असे यावेळी बोलताना अभिजीत अडसूळ म्हणाले.

किती वेळ अन्याय सहन करायचा

युतीमध्ये आणखीन किती वेळ अन्याय सहन करायचा आमच्या सुद्धा मर्यादा आहेत. भविष्यात काम करायचं की नाही असा प्रश्न आहे. एके ठिकाणी अन्याय होतो म्हणून आम्ही दुसरीकडे आलो. येथे देखील अन्याय होणार असेल तर राजकारण न करता घरी बसलेले बरे, असेही अडसूळ म्हणाले.

प्रत्येक वेळी डावलले जाण्याची खंत वाटते

आनंदराव अडसूळ पाच वेळा खासदार होते. माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री होते. राज्यात दोन वेळा कॅबिनेट रँकिंगच महामंडळ त्यांनी सांभाळले आहे. त्याशिवाय अनेक पद त्यांनी भूषवली आहेत. काही काळ लोकसभेत ते शिवसेनेचे गटनेते होते. लोकसभेत कोणत्या निवडणुका असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आनंदराव अडसूळ यांना फोन करून त्यांची सही करून घ्यायचे. पहिली किंवा दुसरी सही त्यांची असल्याचा आग्रह असायचा. प्रत्येक वेळी डावलला जाण्याची खंत वाटते. प्रत्येक गोष्टीला वेळ मर्यादा असते दोन वर्ष आम्ही राज्यपाल पदाची वाट बघतोय अशाच प्रकारे अन्याय होत राहिला तर राजकारणात शब्दांना काहीच अर्थ राहणार नाही, असेही ते म्हणाले.

नवनीत राणा यांना तिकीट देऊ नका असे सांगितले होते

एका मर्यादेपर्यंत मागणी करणार आणि मग नेहमीसाठीच थांबणार नाही. मागासवर्गीय असल्याचा त्रास होतोय का? मागासवर्गीय असणे हा गुन्हा आहे का? असे आता वाटायला लागले आहे. मागासवर्गीय नसताना नवनीत राणा यांना तिकीट दिले गेले. नवनीत राणा यांना तिकीट देऊ नका राज्यात आणि देशात चुकीचा मेसेज जाईल, तेव्हाच सांगितलं होते, असेही अडसूळ म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT