Amit Shah Pune Visit Sarkarnama
महाराष्ट्र

Amit Shah: गोकुळच्या सत्तासंघर्षानंतर अमित शाह पुण्यात; १६ तारखेला कोल्हापूर दौरा, सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांवर खलबतं होणार?

Amit Shah Pune Visit: गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर अमित शाह यांच्या पुणे आणि कोल्हापूर दौऱ्याकडे लक्ष लागले आहे. सहकारमंत्री म्हणून ते स्थानिक नेत्यांशी चर्चा करणार का, याबाबत उत्सुकता आहे.

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Politics News: एकीकडे गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत समविचारी आघाडी आणि महायुतीमध्ये शासननियुक्त संचालकांच्या मतदानाच्या अधिकारावरून जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. अखेर मंगळवारी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीने बाजी मारत राजेश पाटील यांना अध्यक्षपदी विराजमान केले. या सत्तासंघर्षाची चर्चा सुरू असतानाच आता केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याकडे पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. रविवारी (ता. १५) शाह पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील तीन कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर १६ नोव्हेंबरला त्यांचा कोल्हापूर दौराही नियोजित असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेश पाटील यांनी १६ विरुद्ध १३ मतांनी विजय मिळवला. संचालक मंडळाच्या निवडणुकीत समविचारी आघाडीने १३ जागा जिंकल्या होत्या, तर महायुतीला १२ जागा मिळाल्या होत्या. मात्र, शासननियुक्त चार संचालकांना मतदानाचा अधिकार मिळाल्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे गणित बदलले. या निकालामुळे काँग्रेस आमदार सतेज पाटील यांना राजकीय धक्का बसला. त्यामुळे अमित शाह यांच्या दौऱ्यात कोल्हापूरच्या राजकारणावर चर्चा होणार का, याकडे लक्ष लागले आहे.

अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यात 'रन फॉर युनिटी' मॅरेथॉन या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असणार आहे. अलका टॉकीज चौकातून पहाटे ५.३० वाजता मॅरेथॉनला सुरुवात होणार असून, शाह यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन होईल. याशिवाय ते भारत इतिहास संशोधक मंडळाच्या कार्यक्रमालाही उपस्थित राहणार आहेत. तसेच पिंपरी-चिंचवडमधील तळेगाव येथे आयोजित कार्यक्रमातही ते सहभागी होणार आहेत.

कोल्हापूर दौऱ्यात गोकुळच्या राजकारणावर चर्चा होणार?

अमित शाह हे केंद्रीय गृहमंत्री असण्यासोबतच सहकारमंत्रीही आहेत. त्यामुळे पुणे आणि कोल्हापूर दौऱ्याला सहकार क्षेत्राच्या दृष्टीने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गोकुळमधील सत्तासंघर्ष, शासननियुक्त संचालकांचा मतदानाचा अधिकार, तसेच कोल्हापूरमधील बदललेली राजकीय समीकरणे यावर भाजपच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मात्र, शाह यांच्या दौऱ्यात अधिकृत कार्यक्रमांव्यतिरिक्त स्थानिक नेत्यांसोबत स्वतंत्र बैठका होणार आहेत का,याबाबत अजून स्पष्टता नाही. त्यामुळे १६ नोव्हेंबरच्या कोल्हापूर दौऱ्यात गोकुळ आणि सहकार क्षेत्रातील राजकीय रणनीतीवर काय नवीन खलबते होणार का?,याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT