Rupali Chakankar News: देशभरात चर्चेत असलेल्या नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणाची चौकशी करीत असलेल्या विशेष तपास पथकाकडे (SIT) आलेल्या एका तक्रारीमुळे राज्यातील राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
बीड येथील एका व्यक्तीने अशोक खरातच्या विरोधात तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाकडे (SIT) गंभीर तक्रार दाखल केली आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यापासून धोका असल्याचे संबधित व्यक्तीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
तक्रार करणाऱ्या व्यक्तीचा एसआयटी शोध घेत आहे. या तक्रारी त्या व्यक्तीने केलेला दावा पोलिस यंत्रणा तपासत आहे. राजकीय सूडबुद्धीतून ही तक्रार करण्यात आली आहे का? या अँगलनेही पोलिस यंत्रणा तपास करीत आहे.
बीड जिल्ह्यातील एका व्यक्तीने एसआयटीकडे ( SIT) तक्रार नोंदवली आहे. अशोक खरात प्रकरणाच्या तपासाला वेग आला असतानाच या तक्रारीमुळे तपासाची दिशा बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. रुपाली चाकणकर यांच्याकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो, असा दावा या तक्रारदाराने केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी पक्षाच्या वतीने केली आहे. उदयकुमार आहेर यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
अजितदादांच्या पुणे आणि मुंबई येथील बंगल्याबाहेर झालेली काळी जादू, विमान अपघातात मृत्यू, खरात याच्याकडे दादांच्या फोटोवर फुली मारलेली असल्याचा सापडलेला पुरावा, खरातचे V.S.R. या विमान कंपनी सोबत उघड झालेले संबंध, खरात याच्यासोबत रूपाली चाकणकर यांचे असलेले नाते, सुनेत्रावहिनींनी रूपाली चाकणकर यांच्या दोन्ही पदांचा घेतलेला राजीनामा या सर्व गोष्टी लक्षात घेता बीड जिल्ह्यातील व्यक्तीने केलेली तक्रार निश्चितच गांभीर्यपूर्वक घेण्यासारखी आहे, असे आहेर यांनी म्हटले आहे.
दादांचा अपघाती मृत्यू सोबत भोंदू अशोक खरात याचा काय संबंध आहे? या दिशेने देखील तपास होणे गरजेचे आहे. आमच्या माऊली सुनेत्रावहिनी यांच्या जीविताला असलेल्या धोक्याबाबत सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आम्ही करीत आहोत, असे उदयकुमार आहेर यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.