Balasaheb Thackeray News Shivsena
महाराष्ट्र

Balasaheb Thackeray Today Birthday: महाराष्ट्राला मी महान बनवू शकतो!...हे सारं घडलं होतं बाळासाहेब ठाकरे या माणसामुळं!

Balasaheb Thackeray Hindu Ideology: मराठी माणसाचं हित हाच शिवसेनेचा धर्म असायला हवा! महाराष्ट्र आणि मराठी संस्कृती यांच्या भल्यासाठी करावं तेवढंच राजकारण करण्याची मर्यादा शिवसेनेला पाळायला हवी. हेच बाळासाहेबांना अभिप्रेत होतं. आज 23 जानेवारीला त्यांची 99 वी जयंती त्यानिमित्तानं त्यांच्या कार्याचं केलेलं स्मरण!

सरकारनामा ब्यूरो

हरीश केंची

Shiv Sena 23 Jan 2025 : सत्तरच्या दशकातला ६६-६७ चा काळ! 'बजाव पुंगी हटाव लुंगी' हा आवाज देत मुंबई शहरातला मराठी तरुण उभा झाला. पहाडाला धडक देण्याची ईर्षा त्याच्या मनांत जागली होती. 'मी माझ्या समाजाची अवहेलना थांबवू शकतो, महाराष्ट्राला मी महान बनवू शकतो!' असा विश्वास त्या तरुणांच्या मनात जागला होता. हे सारं घडलं होतं बाळासाहेब ठाकरे या माणसामुळं!

महाराष्ट्रानं भले भले 'मैदान गाजवू' वक्ते बघितले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आवेश, आचार्य अत्र्यांचा सोलून काढणारा विनोद, प्रबोधनकारांच्या वाणीतली आग आणि व्यंगचित्र काढण्याचा सराव असल्यानं सहजपणे धोतराला हात घालणारी भाषा वापरण्याची सवय यांचं हे अजब रसायन मात्र नवं होतं, ते तरुणांना हवं होतं. बाळासाहेब तेव्हा शाल पांघरत नसत. उलट पोशाख आणि सगळाच अविर्भाव व्यंगचित्रकाराचाच होता. पण महाराष्ट्रावर, मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायानं हा माणूस नुसता धगधगला होता. हे सारं थांबविण्याची जणू होड घेऊनच मैदानात उतरला होता.

आई भवानीचा आशीर्वाद पाठीशी असल्याचं बाळासाहेब सांगायचे. पण पाठीशी प्रबोधनकारांचा, वडिलांचा आशीर्वाद आणि त्यांचीच परंपरा होती. बाळासाहेब बघता बघता साऱ्या लढाऊ मराठी तरुणांचे सेनापती झाले. ही पोरं साधीसुधी नव्हती. बाळासाहेबांच्या शब्दासाठी प्राण द्यायची त्यांची तयारी होती. त्यावेळी कलानगरातल्या 'मातोश्री' बंगल्याचं अस्तित्व नव्हतं. रानडे रोडवरच्या इवल्याशा जागेतली एक खोली हा सेनापतींचा दरबार! बाहेर छात्या फुगवलेल्या मावळ्यांची ही झुंबड.

आपल्या नेत्याला आपणच मोठा करायचा हे स्मरून वागणारे हे मावळे! येणाऱ्याला आपल्या नजरेच्या जरबेनं जोखणारे, त्याला पायातले चपला-बूट काढून ठेवायला लावणारे. बाळासाहेबांशी कुणी जादा सलगी दाखवू नये याची काळजी घेणारे, मी गेलोय या दरबारात.

बाळासाहेबांना अगदी लवून मुजराही केलाय संयुक्त महाराष्ट्र होऊनही मराठी नेते ताठ मानेनं दिल्लीत उभे होत नव्हते. नेहमीप्रमाणे वितंडवाद घालून संयुक्त महाराष्ट्र समिती नावाची ताकद आम्हीच नष्ट केली होती. आचार्य अत्र्यांचं सामर्थ्यही ओसरलं होतं. अशावेळी मराठी मनाला उभारी देणारा आवाज होता फक्त नि फक्त बाळासाहेब ठाकरे यांचा!

हा महाराष्ट्र लाचार लतकोडग्या नेत्यांनी कंबरेत मोडला होता. त्याला हात धरून 'उठ वीरा, तुझा कणा सह्याद्रीचा आहे. आम्ही तुला वाकू-झुकू देणार नाही...!', असा विश्वास देत बाळासाहेब हर हर महादेवची ललकारी घुमवत होते. त्यांच्यापुढं मस्तक झुकवण्यातसुद्धा एक थरार होता. मुंबईतच नव्हे, साऱ्या मराठी मुलुखात बाळासाहेब यांचा आवाज जायलाच हवा, असं मानून मी मराठी माणसाच्या हितासाठी झुंजणाऱ्या शिवसेनेच्या बाजूनं उभाही झालो. फारच थोडे बोटावर मोजता येतील असे मराठी पत्रकार शिवसेनेच्या सहाय्याला उभे होते. बाकी एकजात विरोधात.

इंग्रजी वृत्तपत्रांनी तर शिवसेनेविरुद्ध अपप्रचाराचा आगडोंबच उभा केला होता. प्रांतवादी, राष्ट्रविघातक, ऐक्यावर आघात करणारी, फॅसिस्ट, गुंड सेना असा गजर चालला होता. विविध पक्षांचे राष्ट्रीय पुढारी ह्या संघटनेविरुद्ध सतत बोलत होते पण शिवसेनेला मराठी तरुणांनी आपलं म्हटलं होतं! बाळासाहेबांना साथ देण्याचा त्यांचा निर्धार होता.

प्रारंभाला मुंबई-ठाणे एवढाच शिवसेनेचा, अन् बाळासाहेबांचा व्याप होता. पण दणका असा जबरदस्त होता की, सारा देश डोळे विस्फारून शिवसेनेकडं, बाळासाहेबांकडं बघत होता. त्यांची ही निर्माण झालेली ताकद कशी वापरायची, केव्हा वापरायची याचाही विचार सुरू होता. शिवसेनेला आजवर बहुतेक सगळ्याच राजकीय पक्षांनी आपल्या स्वार्थासाठी वापरलंय, आपल्या गरजेपोटी आपलं म्हटलंय. कम्युनिस्टांचा कामगार भागातला दबदबा मोडून काढण्यासाठी काँग्रेसवाल्यांनी शिवसेना वापरली.

प्रजा समाजवाद्यांनी शिवसेनेशी तर युतीच केली होती. समाजवादी नेते मधु दंडवते त्यावेळी शिवसेनेच्या समर्थ राष्ट्रवादाची भलामण करीत होते. सगळ्यात शेवटी हिंदुत्वाचं राजकारण करणाऱ्या भाजपेयीं मंडळींनी शिवसेना वापरली. आणि तेव्हापासून शिवसेना पचवायची उमेद धरून आजही भाजपेयीं नेते शिवसेनेकडे बघून जिभल्या चाटत असतात. त्यामुळं त्यांनी फुटिरांना हाताशी धरून आपलं साध्य साधलं होतं. शिवसेनेचा विचार हा केवळ बाळासाहेब ठाकरे यांचाच विचार होता आणि आजही आहे.

मराठी माणसापासून हिंदुत्वापर्यंतचा शिवसेनेचा प्रवास झालाय. मुळात हिंदुत्वाचं राजकारण करताना हिंदुत्वाचा जसा आणि जेवढा विचार व्हायला हवा होता तेवढा विचार शिवसेना या संघटनेनं आणि स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी केलेला नाही. त्यांच्याभोवती राष्ट्रीय स्वयंसेवक संघातली काही मंडळी जमा झाली होती. त्यांनी बाळासाहेबांसाठी नव्हे तर बाळासाहेबांभोवती जमलेल्या मराठी तरुणांसाठी हे हिंदुत्वाचं जाळं लावलं होतं. मिळतील तेवढे शिवसैनिक भाजपकडं वळविण्याचा हेतू धरूनच हे हिंदुत्वाचं राजकारण आजतागायत सुरूच आहे.

भाजपेयीं नेत्यांनी आपला कावा अनेकदा आपल्या कृत्यांतून दाखवून दिलाय. बाळासाहेबांचा 'हिंदुहृदयसम्राट' ह्याच मंडळींनी बनवलाय. हिंदुत्व हे पाऱ्यासारखं आहे, ते जेवढ्या झटकन एकत्र येतं तेवढ्याच झटकन असंख्य स्वतंत्र गोलात विभागलं अन् विखुरलंही जातं. हिंदुत्वाचं राजकारण ही सोपी गोष्ट नाही. हिंदूंना एकत्र आणण्यासाठी जो संवाद साधायला हवा तो साधण्यासाठी जो प्रवास आणि प्रयास वैचारिक आणि प्रत्यक्ष करायला हवा, तो शिवसेनेत कुणी केलाय? 'हिंदुहृदयसम्राट' बाळासाहेब ठाकरे हे दादर, गिरगाव, सदाशिव-नारायण पेठ, औरंगाबाद-परभणी इथल्या जनतेला मान्य होऊ शकतील, पण हे तमाम हिंदूंना मान्य होतीलच असं त्यावेळी नव्हतं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना हिंदुहृदयसम्राट म्हणत पण हा सम्राटही अखेर फक्त पुण्या-मुंबईपुरताच उरला होता.

भाषाभिन्नतेवर आणि पंथभेदावर मात करून साऱ्या हिंदूंना राजकारणापुरतं का होईना, एकत्र आणायला हवं हा विचार आजचा नाही. तो स्वातंत्र्यलढ्यापासूनचा आहे. पण तो आजवर कधीच प्रत्यक्षात येऊ शकलेला नाही. याची जाणीव हिंदुत्वाचं राजकारण करणाऱ्यांनी तरी ठेवायला हवीय. मराठी माणसाच्या काळजाला हात घालणाऱ्या आणि मराठीच्या, महाराष्ट्राच्या भल्यासाठी वाटेल ते साहस करू शकणाऱ्या एका नेत्याला हिंदुत्वाच्या स्वप्नरंजनात अडकवून महाराष्ट्राचा काही मंडळींनी घात केला होता. बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट बनवणाऱ्यांनी त्यांना आणि तमाम शिवसैनिकांना चक्क बनवलं होतं. गृहलक्ष्मी म्हणून स्त्रीला पायाची दासी बनविण्याचा प्रकार होतो, त्याच धर्तीवर म्हणायचं हिंदुहृदयसम्राट आणि बनवायचं भाजपेयींचं मांडलिक असा प्रकार यात होता.

हिंदुत्वाच्या राजकारणाचे सारे तोटे शिवसेनेला भोगावे लागलेत सारे फायदे भाजपनं लाटलेत. काया-वाचा-मने भारतीय जनता पक्षाला वाहून घेणाऱ्या छुप्या भाजपेयींनादेखील शिवसेनेचे खासदार बनवण्याचा प्रकार हा यातलाच होता. शिवसेनेनं महाराष्ट्र हेच आपलं कार्यक्षेत्र मानायला हवं! मराठी माणसाचे हित हाच शिवसेनेचा धर्म असायला हवा! महाराष्ट्र आणि मराठी संस्कृती यांच्या भल्यासाठी करावं. तेवढंच राजकारण करण्याची मर्यादा शिवसेनेला पाळायला हवी. शिवसेना, बाळासाहेब हिंदुत्वासाठी भाजपला साथ करायला तयार झाले पण भाजपनं त्यांना राष्ट्रीय नेते म्हणून कधीही मान्य केलं नाही.

शिवसेनेबरोबर बोलणी करण्यासाठी नेहमीच दिल्लीतले दुय्यम दर्जाचे भाजपनेते नियुक्त केले जात. याचा अर्थ शिवसेनेला आपल्या पातळीचे हे लोक मानत नाहीत, हे स्पष्ट होतं. औरंगजेबानं आपल्या दरबारात पाच-सात हजारी सरदारांच्या मागे शिवाजी महाराजांनी उभे राहायला सांगितलं होतं तसला हा प्रकार! शिवसेना ही मांडलिकाची भूमिका करत होती. शिवसेनेच्या दुसऱ्या फळीतील काही नेते मनोहर जोशी यांच्यापासून संजय राऊत यांच्यापर्यंत हे पहिल्यापासूनच काँग्रेसची स्पष्ट म्हणावं तर शरद पवार यांच्याशी संबंधित आहेत, हे दिसून आलंय. यासंबंधाचा वापर त्यांनी संघटनेसाठी केला आहेच आणि संघटनेचाही वापर या संबंधासाठी केलाय.

प्रारंभीचा काळ सोडला तर नंतरच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांनाही भाजपचं हे हिंदुत्वाचं खोटं फसवं राजकारण याचा उबग आलेला होता. कारण जे काय करायचं ते सर्वस्व पणाला लावून ही बाळासाहेबांची वृत्ती होती. स्वभाव होता. त्यांना रोखठोकपणा हवा होता. मराठी माणसाला नवजीवन, नवचैतन्य देणारी शिवसेना हीच संघटना, मुंबईत हाच महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा आधार राहिलेलाय. सर्व बाजूंना मुंबईवर आणि मराठी माणसावर तुटून पडणाऱ्या परप्रांतीयांपासून शिवसेनाच मुंबईचं, मराठी माणसाचं रक्षण करत आहे, हिंदुत्वाच्या कधीच साकारू न शकणाऱ्या स्वप्नासाठी शिवसेनेनं मराठी माणसानं सर्वस्व पणाला लावणं हे कितपत योग्य आहे याचा विचार व्हायला हवा! असं मराठी माणसाला वाटत होतं. पण वेळ येत नव्हती. ती आता आली. हिंदुत्वाची पुटं चढवलेली कातडी शिवसेनेनं झटकून टाकली.

भाजपेयींचं मांडलिकत्व झिडकारलं. स्वतंत्र अस्तित्वासाठी झगडा उभारला. जे यापूर्वी घडेल असं वाटत होतं ते आता घडलंय. भाजपेयींनी शिवसेनेची आजची भूमिका बाळासाहेब ठाकरे यांना मान्य झाली नसती असं सतत म्हटलंय. ते तितकंसं खरं नाही. शिवसेनेचा जन्म, शिवसेनेचा संघर्ष हा महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी झालाय. हिंदुत्वासाठी नाही हे लक्षांत घेतलं पाहिजे. 'शिवसेना' याला वैचारिक भूमिका, आकार हे प्रबोधनकार ठाकरे यांनी दिलेलाय. त्यांनी कधीच भटी-बामणी हिंदुत्वाचा स्वीकार केलेला नाही. आज उद्धव ठाकरे जे म्हणतात तेच प्रबोधनकार आणि बाळासाहेब म्हणत. 'आमचं हिंदुत्व हे शेंडी जाणव्याचं नाही!' त्यामुळं बाळासाहेबांनी मराठी माणूस, मराठी अस्मिता, आणि महाराष्ट्र याचाच आग्रह धरलाय. त्यांच्या पश्चात उद्धव ठाकरे यांनी आताशी हीच भूमिका अंगीकारलीय ती बाळासाहेबांच्या विचारधारेतूनच!-

-हरीश केंची (ज्येष्ठ पत्रकार)

SCROLL FOR NEXT