Balasaheb Thorat Sarkarnama
महाराष्ट्र

Balasaheb Thorat News : भाजपच्या इच्छुकांचे वाढले टेन्शन; काॅंग्रेसच्या थोरातांचा खोचक टोला

Pradeep Pendhare

Nagar News : लोकसभा २०२४ च्या निवडणुकीसाठी भाजपकडून १६ राज्यातील १९५ उमेदवारांची पहिली यादी शनिवारी जाहीर केली आहे. १६ राज्यातील या उमेदवारांच्या यादीत महाराष्ट्राला वगळण्यात आले आहे. यावरून महाराष्ट्रातील भाजपकडून इच्छुक असलेल्यांचे टेन्शन वाढले आहे, तर काॅंग्रेसने यावरून निशाणा साधला आहे.

काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते विधिमंडळाचे गटनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी भाजपने जाहीर केलेल्या यादीत महाराष्ट्राचा समावेश का करू शकले नाहीत, यावर खोचक टोला लगावला आहे.

आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले, "महाराष्ट्रातील महायुतीत अंतर्गत प्रचंड गोंधळ आहे. यातून जागा वाटपावर देखील गोंधळाचे वातावरण आहे. अंतर्गत असंतोष खद्खद्त आहे. या सगळ्यांचा परिणाम हाणामाऱ्यांत होऊ नये, एवढीच आम्हाला काळजी आहे. या गोंधळाचा परिणाम आम्हाला दिसतोय आणि भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्र येऊ शकला नाही". यांच्यातील हाणामाऱ्यांचा परिपाक्कामुळे महाराष्ट्राची यादी जाहीर करू शकले नाहीत. यामुळे महाराष्ट्रात काय निकाल येईल, हे आपल्याला माहितीच आहे, असा खोचक टोला देखील बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे. (Balasaheb Thorat News)

लोकसभा २०२४ ची निवडणूक जाहीर होण्याअगोदरच भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. भाजपचे नेते विनोद तावडे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मंत्री राजनाथ सिंह, मंत्री स्मृती इराणी, शिवराज चौहान, कृपाशंकर सिंह, ज्योतीरादित्य शिंधिया आदी दिग्गजांचा यात समावेश आहे.

यादीत १६ राज्यातील १९५ उमेदवारांचा समावेश आहे. परंतु महाराष्ट्राला यात वगळले आहे. महाराष्ट्रात हमखास निवडून येणाऱ्या सिटवर देखील भाजपकडून नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपकडून इच्छुक असलेल्यांचे टेन्शन वाढले आहे.

महाराष्ट्रात राजकीय गणित भाजपने बदलली आहेत. महाविकास आघाडीचे सरकार उलथून लावल्यानंतर भाजपने सत्ता स्थापन करताना महायुतीचा प्रयोग केला आहे. यात शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडून त्यांच्या गटाच्या मदतीने सत्ता स्थापन केली. शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटलेल्या गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष आणि पक्षचिन्ह दिले आहे. त्यामुळे हे फुटलेले गट आता अधिकृत पक्ष झाले आहेत. त्यामुळे लोकसभेच्या महाराष्ट्रातील ४८ जागा वाटपात हे फुटलेले पक्ष महायुतीकडून दावा करू लागले आहेत. यातून भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

महायुतीकडून महाराष्ट्रातील जागा वाटपावर अनेकदा बैठका झाल्या. भाजपच्या केंद्रीय यंत्रणेकडून देखील हस्तक्षेप झाला. तरी देखील तिढा सुटलेला नाही. फुटलेल्या गटामध्ये देखील धुसफूस सुरू आहे.

शिवसेना एकनाथ शिंदे गटात देखील अतंर्गत धुसफूस सुरू आहे. यातच भाजपने केलेल्या सर्व्हेनुसार शिंदे आणि पवार गट मागत असलेल्या जागांवर विजयाची खात्री नाही. त्यामुळे त्या जागांवर भाजपकडून दावा केला जात आहे. यातून शिवसेना एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये देखील धुसफूस वाढली आहे. राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटामध्ये देखील काही अलबेल नाही. त्यामुळे भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी महाराष्ट्राला यादीतून वगळल्याचे सांगितले जात आहे.

अमित शहा तोडग्यासाठी बैठक घेणार

भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shaha) महायुतीची पाच मार्चला बैठक घेऊन जागा वाटपाचा घोळ मिटवणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या बैठकीकडे महाराष्ट्राचे, विशेष करून भाजपकडून (Bjp) इच्छुक असलेल्यांचे लक्ष लागले आहे. या बैठकीला महायुतीच्या प्रमुखांना आंमत्रित करण्यात आले असून, 'थेट तोडगा' या बैठकीत निघेल, असे देखील सांगितले जात आहे.

SCROLL FOR NEXT