Bhaskar Jadhav sarkarnama
महाराष्ट्र

Bhaskar Jadhav : 'सत्ताधाऱ्यांचा अहंकार, मस्ती आणि गर्व इतका... की', भास्कर जाधवांनी महायुतीला फटकारले

Bhaskar Jadhav On Mahayuti Over Assembly Winter Session : नागपूरमध्ये सोमवार (ता.८) पासून हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होणार असून त्याआधीच विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे.

Aslam Shanedivan

  1. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापान कार्यक्रमावर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.

  2. भास्कर जाधव यांनी महायुती सरकारवर भ्रष्टाचार, लोकशाही मूल्यांचा अनादर आणि संविधानाचा अपमान केल्याचा आरोप केला.

  3. विरोधकांनी सरकारविरोधातील रोष व्यक्त करत या कार्यक्रमात सहभागी न होण्याची घोषणा केली.

Nagpur News : राज्याच्या विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून (ता.८) सुरू होणार असून ते एका आठवड्याचे असणार आहे. यावरून आधीच विरोधक सरकारविरोधात आक्रमक झाले असून आता अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकत आपला रोष व्यक्त केला आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन तशी माहिती दिली. यावेळी भास्कर जाधव यांनी, सध्याचे महायुतीचे सरकार हे भ्रष्टाचाराने माखलेलं असून या सरकारला लोकशाही मूल्ये पाळण्यात काहीच रस नसून हे सतत संविधानाचा अपमान करणारे आहे. राजकीयदृष्ट्या विरोधकांना बदनाम करणारं आहे. यामुळेच या सरकारबरोबर चहापानाला उपस्थित न राहण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतल्याचे म्हटलं आहे.

भास्कर जाधव यांनी, 95 ते 99 या काळात मुख्यमंत्री म्हणून जोशी सर होते. ते विरोधकांना किती सन्मान देत होते हे आम्ही प्रत्यक्ष पाहिलं आहे. परंतु आता सत्ताधाऱ्यांचा अहंकार, मस्ती आणि गर्व इतका वाढला आहे. समोरच्या लोकांच्या संख्येप्रमाणे ते वर्तन बदलतात. सरकारी सत्ता असल्याचा गैरवापर करून चढाओढ निर्माण करणारे हे युतीचे लोक आहेत.

अलीकडेच नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षातीलच आमदार आणि नेते एकमेकांवर गंभीर आरोप करताना दिसले. एकमेकांचे चोरीचे पैसे, अनियमित प्रकार, त्याचे व्हिडिओ शूट करून जनतेसमोर आणले गेले. त्यामुळे आम्ही संख्येने कमी असलो तरी त्यांना प्रश्न विचारणारे आहोत. पण या सरकारच्या भ्रष्टाचाराच्या पापपेटारा भरला असून सुप्रीम कोर्टालाही हस्तक्षेप करावा लागला. तीन-चार हजार कोटींच्या टेंडरमध्ये उघडकीस आलेला फरक हा त्यांच्या भ्रष्टाचाराचं मोठं उदाहरण होतं असाही दावा भास्कर जाधव यांनी केलाय.

तसेच त्यांनी, घटनात्मक दृष्ट्या विरोधी पक्षनेतेपदाला मान आहे, पण उपमुख्यमंत्रिपदाची कोणतीही कायदेशीर तरतूद नाही. तरीही राजकीय सोय म्हणून ती पदं निर्माण केली गेली. परंतु विरोधी पक्षनेते म्हणून लोकशाही आणि संविधानाचा वारंवार अपमान करणाऱ्या या सरकारसोबत चहापानाला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. चहापान म्हणजे विरोधी पक्षाचे मुद्दे ऐकून घेणे, जनहिताचे प्रस्ताव विचारात घेणे. पण यांच्याकडे ना सौजन्य आहे, ना लोकशाही मूल्यांची जाणीव, अशी घणाघाती टीका भास्कर जाधव यांनी केलीय.

उद्धव ठाकरे यांच्या काळात कोरोनामुळे काही योजना थांबल्या होत्या असे आरोप महायुतीवाले सतत करत होते. पण आता मात्र शिवभोजन थाळीसारख्या गरिबांच्या योजनांनाही आठ-आठ महिने अनुदान मिळत नाही. उलट, 2022 पासून विरोधी पक्षातील आमच्या मतदारसंघात एकही रुपयाचं काम मंजूर झालेलं नाही. बजेट तयार करून आम्ही नियोजन विभागापर्यंत पोहोचवतो, पण सरकार मुद्दाम अडथळे निर्माण करतं असाही आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे.

तसेच सभागृहात लक्षवेधी सूचनांच्या नियमांचा गैरवापर केला जात असून खऱ्याखुऱ्या तातडीच्या मुद्द्यांऐवजी दोन-चार वर्षांपूर्वीच्या किंवा बिल्डर संबंधित विषयांनाच प्राधान्य दिलं जातं. मंत्र्यांकडून चर्चांना प्रतिसाद मिळत नाही. विरोधी पक्षाने मांडलेला कोणताही प्रस्ताव पूर्णत्वास जात नाही. अधिवेशन म्हणजे जनतेच्या प्रश्नांची उत्तरं मिळण्याचं स्थान, पण इथे फक्त भ्रष्टाचार झाकला जातोय असा हल्लाबोल देखील भास्कर जाधव यांनी केलाय.

राज्यातील अनेक घटनांमध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी स्वतःच्या लोकांना क्लीनचीट दिली. विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांवर मात्र चौकशांचा भडिमार केला जातो. ही लोकशाही नव्हे. आम्ही संख्या कमी असलो तरी प्रत्येक मुद्द्यावर ठामपणे आवाज उठवत राहू, कारण हे सरकार जनतेपेक्षा सत्तेचीच काळजी करणार असल्याचे म्हणत भास्कर जाधव यांनी फटकारलं आहे.

FAQs :

1. MVA ने चहापान कार्यक्रमावर बहिष्कार का टाकला?
महायुती सरकार भ्रष्टाचारात अडकलेले असून लोकशाहीचा अपमान करत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे.

2. या बहिष्काराची घोषणा कोणी केली?
ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

3. हिवाळी अधिवेशन कधी सुरू होते?
अधिवेशन सोमवार, ८ तारखेपासून सुरू होत असून ते एका आठवड्याचे आहे.

4. विरोधकांचे मुख्य आरोप काय आहेत?
सरकार संविधानाचा अपमान करते, विरोधकांना बदनाम करण्याचा प्रयत्न करते आणि भ्रष्टाचारात गुंतलेले आहे.

5. बहिष्काराचा अधिवेशनावर परिणाम होईल का?
होय, यामुळे अधिवेशनात विरोधक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT