

चिपळूण नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेने शरद पवार राष्ट्रवादीवर परवानगीशिवाय प्रचारात फोटो वापरल्याची तक्रार दाखल केली.
ही तक्रार "मातोश्री" कडून आलेल्या थेट निर्देशानंतर करण्यात आली असून त्यामुळे भास्कर जाधव अडचणीत आले आहेत.
या घटनेमुळे ठाकरे शिवसेना आणि शरद पवार गटामध्ये निवडणुकीच्या तोंडावर वाद पेटला आहे.
Chiplun Municipal Elections News : नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर चिपळूणमध्ये तोंडावर ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये राजकीय वाद होण्याची शक्यता दिसत आहे. येथे ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीत पक्ष स्तरावर कोणतीच युती अथवा आघाडी झालेली नसताना पक्षाचे आमदार भास्कर जाधव राष्ट्रवादीचा प्रचार करत आहेत. तसेच राष्ट्रवादीचे उमेदवार पक्षनेतृत्वाच्या फोटोंचा वापर परवानगीशिवाय प्रचारात करत असल्याचे समोर आले आहे. यामुळे येथे ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली असून थेट येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडेच याची तक्रार केली आहे. तसेच 'मातोश्री'वरूनच थेट आलेल्या इशाऱ्यानंतर प्रचाराच्या सभेला हजर राहिलेले भास्कर जाधवही आता अडचणीत आले आहेत.
चिपळूण नगर परिषदेच्या निवडणुकीत सद्यस्थितीत शिवसेना-भाजप युती वगळता सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर निवडणूक मैदानात उतरले आहेत. एकीकडे येथे ठाकरेंच्या शिवसेनेनं स्वबळाचा नारा दिल्याने भास्कर जाधव चांगलेच दुखावले गेले. त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि माजी रमेश आमदार कदम यांना पाठिंबा दिला. तसेच त्यांचाच प्रचार करणार अशी घोषणाच पत्रकार परिषदेत करून टाकली.
मात्र त्यानंतर शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत यांनी ठाकरेंच्या शिवसेनेशी कोणाबरोबरही युती अथवा आघाडी झालेली नसून पक्ष स्वबळावर ही निवडणूक लढवत असल्याचे सांगितले. तसेच नगराध्यक्षपदासह सर्व जागांवर उमेदवार उभे केले. ज्यानंतर येथे शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आला होता. तर विनायक राऊत आणि भास्कर जाधव यांच्यातील दुराव्यामुळे शिवसेनेतील फुटीवर शिक्कामोर्तब झाला होता. अशा या अंतर्गत कलहाच्या दरम्यान पक्षनेतृत्वाकडून आलेल्या आदेशानुसार येथील पदाधिकाऱ्यांनी थेट तक्रार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडेच दाखल केलीय.
शनिवारी ठाकरे शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळा कदम, तालुकाप्रमुख बळीराम गुजर आणि शहर प्रमुख भैय्या कदम यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यामध्ये त्यांनी या निवडणुकीत ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी (शरद पवार पक्ष) यांच्यामध्ये कोणतीही आघाडी किंवा अधिकृत युती नाही. दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत.
तरीही राष्ट्रवादीच्या काही उमेदवारांकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे तसेच विनायक राऊत यांच्या प्रतिमांचा परवानगीशिवाय प्रचारासाठी वापर केला जात आहे. हे कृत्य खोडसाळ आणि दिशाभूल करणारे असून निवडणूक आचारसंहितेचे सरळ-सरळ उल्लंघन करणारे आहे. तसेच शिवसेनेच्या उमेदवारांकडूनही शिवसेना नेत्यांचे फोटो प्रचारासाठी वापरल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न होत असल्याचे नमूद केले आहे.तसेच याबाबत तत्काळ दखल घेऊन संबंधित उमेदवारांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशीही मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात प्रचाराच्या रणधुमाळीतच 'मातोश्री'वरूनच आलेल्या निदर्शनानुसार शरद पवारांच्या राष्ट्रवादी विरोधातच अशी तक्रार दाखल करण्यात आल्याने आमदार जाधव यांच्यासाठी अडचणीचे ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. यातच आता या तक्रार अर्जावर निवडणूक निर्णय अधिकारी काय कार्यवाही करतात, हे पाहणं महत्वाचे ठरणारे आहे. त्याचबरोबर आमदार जाधव आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून काय भूमिका घेतली जाते हे देखील पाहावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.