राज्यात सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांना 100 दिवसांचा कृती कार्यक्रम दिला होता. विशेष म्हणजे या कृती कार्यक्रमाची स्पर्धा घेऊन त्याचा निकालही महाराष्ट्र दिनी जाहीर झाला. आता या कार्यक्रमाच्या धर्तीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने कार्यकर्त्यांना 100 दिवसांचे टार्गेट दिले आहे.
नागपूरमध्ये मंगळवारी (3 जून) भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात विदर्भाची विभागीय कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत विदर्भातील 309 मंडळांतील पदाधिकारी उपस्थित होते. रवींद्र चव्हाण यांनी यावेळी पक्षाच्या वरिष्ठ वर्तुळात करण्यात आलेले नियोजन या पदाधिकाऱ्यांसमोर मांडले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काहीही करून भाजप क्रमांक एकचा पक्ष राहिला पाहिजे. त्यादृष्टीने 100 दिवसांचा संघटनात्मक कार्यक्रम आखण्यात आला आहे. यात अगदी सुक्ष्म पातळीवर जाऊन लोकांशी संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच प्रत्येक बुथवरील पदाधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीचे वाटप तातडीने करावे, अशाही सूचना चव्हाण यांनी दिल्या.
कार्यकर्त्यांना देण्यात आलेल्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमात राज्यभरात केवळ भाजपचीच चर्चा राहिली पाहिजे यावर मुख्य आणि एकमेव भर आहे. यासाठी निवडणुकीपर्यंत मिळेल त्या मार्गाने शक्तिप्रदर्शन करायचे आहे. त्यासाठी होर्डिंग लावणे किंवा बॅनरबाजी करण्यावरही भर द्यावा, पण पक्षाचे मार्केटिंग झालेच पाहिजे, असे सांगण्यात आले.
कमळ चिन्हाचे मार्केटिंग करण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने आणि कार्यकर्त्यांने 'कमळ' चिन्ह लावून फिरायचे आहे. पक्षाच्या छोट्या बूथपातळीवरील कार्यकर्त्यांपासून ते 'राज्य पातळीपर्यंतच्या पदाधिकाऱ्यापर्यंत सर्वांनीच शर्ट किंवा साडीवर 'कमळ' चिन्ह लावूनच घराबाहेर निघावे, अशी सूचना देण्यात आली आहे.
एकूणच भाजपकडून आगामी काळात निवडणुकीच्या वातावरण निर्मितीवर प्रचंड भर देण्यात येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.