BJP Sarkarnama
महाराष्ट्र

BJP Politics : विधानसभेतील यशामुळं आत्मविश्वास दुणावलेल्या भाजपचं 'स्थानिक'च्या निवडणुकांपूर्वी 'या' सर्व्हेने टेन्शन वाढवलं

Maharashtra BJP survey : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एप्रिल किंवा मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्याबाबतचे संकेत खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीतील अधिवेशनात दिले होते. त्यामुळे अनेक महापालिकांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच पक्ष कामाला लागले आहेत.

Jagdish Patil

Nagpur News, 22 Jan : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील (Assembly Election) घवघवीत यशानंतर भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे. विधानसभेतील विजयानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी सज्ज रहा आणि कामाला लागा, असे आदेश भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शिर्डीत नुकत्याच पार पडलेल्या भाजपच्या दोन दिवसीय अधिवेशनातून राज्यभरातील पदाधिकारी आणि नेत्यांना दिले आहेत.

त्यामुळे भाजपने (BJP) अधिवेशनातूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुकल्याचं पाहायला मिळालं आणि त्याप्रमाणे भाजपचे नेते पदाधिकारी कामाला देखील लागले आहेत. मात्र, अशातच आता एका सर्व्हेने भाजपचं टेन्शन चांगलंच वाढलं आहे. कारण भाजपने नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी पहिला सर्व्हे केला. या सर्व्हेत भाजपच्या विद्यमान 30 ते 40 टक्के नगरसेवकांचे रिपोर्ट कार्ड निगेटिव्ह आलं आहे.

सर्वेमुळे भाजप आता बालेकिल्ला असलेल्या नागपुरातच भाकरी फिरवणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एप्रिल किंवा मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्याबाबतचे संकेत खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिर्डीतील अधिवेशनात दिले होते. त्यानुसार मुंबई, ठाणे, नागपूर, नवी मुंबईसह अनेक महापालिकांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच पक्ष कामाला लागले असतानाच भाजपने केलेल्या सर्व्हेमुळे त्यांच्याच संभाव्य नगरसेवकांचं टेन्शन वाढलं आहे.

या सर्व्हेच्या माध्यमातून सध्याचे विद्यमान नगरसेवक, लोकप्रतिनिधींबाबत जनतेची मते काय हे जाणून घेण्यात आली. त्यामध्ये नागपूरातील नगरसेवकांचा निगेटिव्ह रिपोर्ट आला आहे. त्यामुळे आता ज्यांचा निगेटिव्ह रिपोर्ट आला आहे त्या नगरसेवकांचा पत्ता कट होण्याची शक्यता असून पक्ष नवीन चेहऱ्यांना संधी देत गुजरात फॉर्म्युला वापरण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे भाजपच्या अनेक इच्छुक आणि विद्यमान उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

नागपूर महापालिकेतील सध्याचं चित्र काय?

नागपूर (Nagpur) महानगरपालिकेत एकूण जागा 151 इतक्या आहेत. 2017 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठं यश मिळालं होतं त्यांनी यावेळी 108 जागा मिळवल्या होत्या. मागील निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या जागा 46 ने वाढल्या होत्या. भाजपनंतर काँग्रेसला 29, बसपाला 10 तर शिवसेने दोन आणि राष्ट्रवादीसह अपक्षांना प्रत्येकी एक जागा मिळाली होती. त्यामुळे या महापालिकेत भाजपचाच वरचष्मा राहणार असं चित्र असलं तरी ताज्या सर्व्हेमुळे विद्यमान नगरसेकांना तिकीट नाकारल्यास ते बंडखोरी करणार की पक्षाचा आदेश मान्य करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT