
Congress News : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे सोपवला आहे. त्यामुळे काँग्रेसचा (Congress) नवा प्रदेशाध्यक्षपद कोण असणार याविषयी चर्चांना उधाण आलं आहे. प्रदेशाध्यक्षपदी अनुभवी की तरुण नेत्यांना संधी द्यायची असा पेच काँग्रेस हायकमांडसमोर निर्माण झाला आहे. नवीन प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, सतेज ऊर्फ बंटी पाटील, अमित देशमुख यांची नावांची जोरदार चर्चा आहे.
लोकसभा निवडणुकीआधी मोठी फिल्डिंग लावूनही काँग्रेसच्या हायकमांडनं रोखठोक नाना पटोलेंनाच (Nana Patole) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी कायम ठेवलं.एकीकडे महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींकडून पटोलेंविरोधात तक्रारींवर तक्रारींचा पाढा वाचला जात होता, तर दुसरीकडे त्यांच्याच विदर्भातले काही नेत्यांना प्रदेशाध्यक्षपदाची स्वप्नं पडू लागली होती.त्यामुळे नानांचा विरोध त्यांनी दिल्ली दरबारी पोहचवला.
पण तरीही राहुल गांधीनी पुन्हा एकदा पटोलेंवरच विश्वास दाखवला.आणि तीच काँग्रेसची धूर्त खेळी यशस्वीही ठरली.कारण 2019च्या लोकसभा निवडणुकीत ज्या काँग्रेस पक्षाचा अवघा एक खासदार निवडून आला होता.त्याच काँग्रेसच्या खासदारांची 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील संख्या 13 वर पोहचवली.
शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसारखे पक्ष सोबत असतानाही नाना पटोलेंनी राजकीय चातुर्य दाखवत लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दमदार यश मिळवून दिलं होतं.त्यामुळे साहजिकच नानांचं महाराष्ट्रातलं वजन वाढलंच तसंच दिल्लीतही त्यांचा दबदबा वाढला.याचवेळी त्यांच्या पक्षातील विरोधकांना आपली तलवार म्यान करावी लागली.पण विधानसभा निवडणुकीतही त्यांच्यावरच महाराष्ट्राची जबाबदारी कायम ठेवली.यश मिळालं तरी नेतृत्व बदलण्याची भाजपसारखी धमक काँग्रेसनं दाखवली नाही.
लोकसभेला कॉन्फिडन्स वाढलेल्या नाना पटोलेंनी विधानसभेच्या निवडणुकीआधी महायुतीसह महाविकास आघाडीलाही शिंगावर घेतलं. जागावाटपात कोणतीही नमती भूमिका न घेता उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत प्रसंगी राजकीय कटुता घेत काँग्रेसच्या पारड्यात जास्तीत जास्त जागाही पाडून घेतल्या. पण विधानसभेच्या निवडणुकीत अनपेक्षित व तितकाच धक्कादायक निकाल लागला. महाविकास आघाडीची दाणादाण उडाली.288 जागा लढलेल्या आघाडीला अवघ्या 49 जिंकता आल्या.काँग्रेसला तर फक्त 16 जागांवरच विजय मिळवता आला.
या निराशाजनक कामगिरीनंतर काँग्रेसमध्ये पुन्हा प्रदेशाध्यक्ष बदलाचं वारं वाहू लागलं आहे. काँग्रेस हायकमांडनं महाविकास आघाडीत सगळ्यात जास्त जागा लढूनही काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याइतपतही जागा जिंकता आल्या नाही यावं हे काँग्रेसच्य पक्षश्रेष्ठींच्या चांगलंच जिव्हारी लागलं आहे.
याच पराभवाची जबाबदारी स्विकारत नाना पटोलेंनी आपल्याला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करण्याची विनंती काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे केल्याची माहिती समोर आली होती. यामुळे आगामी काळात त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचमुळे नानांविरोधातली पक्षांतंर्गत आघाडी पुन्हा एकदा कामाला लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीनं धुव्वा उडवलेल्या महाविकास आघाडीची निकालानंतर एकही बैठक झाली नव्हती. तसेच निवडणुकीतील पराभवाचं एकमेकांवर खापरही फोडण्यात आलं होतं.त्यामुळे उद्विग्न होत संतापलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा देत आघाडीला मोठा धक्का दिला.
पण महाविकास आघाडीचे शिल्पकार असलेल्या शरद पवारांनी या निर्णयानंतर धोका ओळखून ठाकरेंसोबत 90 मिनिटांची मॅरेथॉन बैठक घेत आघाडी टिकवण्यासाठी मोठ्या राजकीय हालचाली सुरू केल्या.यानंतर नाना पटोलेही मैदानात उतरले व त्यांनी महाविकास आघाडी एकत्र असल्याचा दावा केला.
गेले काही वर्षे रखडेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पाठोपाठ आता काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षपद बदलाबाबत मोठा निर्णय होणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोलेनंतर कुणाची वर्णी लागणार याविषयी राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे.पटोलेनंतर काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरात,विजय वडेट्टीवार,पृथ्वीराज चव्हाण,अमित देशमुख,सतेज पाटील,यशोमती ठाकूर, विश्वजित कदम,संग्राम थोपटे यांची नावं प्रदेशाध्यक्षपदासाठीच्या शर्यतीत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.