
Mumbai New, 22 Jan : बदलापूरमधील एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराचे पडसाद सबंध राज्यात उमटले होते. या मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम आरोपी अक्षय शिंदेला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी राज्यभरातून केली जात होती. अशातच अक्षय शिंदेंला पोलिस तळोजा कारागृहातून चौकशीसाठी नेत असताना त्याचा एन्काऊंटर (Akshay Shinde Encounter) करण्यात आला होता.
मात्र, या एन्काऊंटरच्या चौकशी अहवालात अक्षय शिंदे याला बनावट चकमकीत मारण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं आहे. शिवाय या प्रकरणातील पुरावे पाहता मुंबई उच्च न्यायालयाने या एन्काऊंटरला पाच पोलिसांना जबाबदार धरलं आहे. दरम्यान, कोर्टाच्या याच निर्णयावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून महायुती सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) राज्यात नेमके काय पोसत आहेत? कोणासाठी पोसत आहेत? अक्षय शिंदेच्या हत्येने अनेक प्रश्न निर्माण झालेत असा म्हणत फडणवीस लोकांच्या मनात हा प्रश्न कायम सळसळत राहील. देवाभाऊ न्याय करायला गेले, पण बंदुकीतून उलटा बार उडाला, असा टोला मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. तसंच हा एन्काऊंटर निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून घडवून आणल्याचा आरोपदेखील अग्रलेखातून करण्यात आला आहे.
'बदलापूर लैंगिक अत्याचाराचे प्रकरण देशभरात गाजले होते. संघ परिवाराचे लोक चालवत असलेल्या शाळेत लहान मुलीवर अत्याचार झाला. संस्था चालकांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. संस्था चालक सत्ताधारी पक्षाशी संबंधित असल्याने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न झाला. दुसरे असे की, पीडित मुलीच्या आईची तक्रार पोलीस घ्यायला तयार नव्हते व ती माऊली वणवण भटकत राहिली. बदलापूरचे (Badlapur) लोक रस्त्यावर उतरले व दंगल पेटली तेव्हा गुन्हा दाखल झाला व संस्थेचा शिपाई अक्षय शिंदे यास अटक केली.
अक्षय शिंदे याच्यासोबत आणखी आरोपी असावेत व ते संस्थेशी संबंधित ‘बडे’ लोक असावेत असा लोकांचा संशय होता. त्यांचे काय झाले ते फडणवीसांना माहीत. अक्षय शिंदेचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून त्यास कठोर शिक्षा देता आली असती, पण विधानसभा निवडणुका तोंडावर होत्या व शिंदे-फडणवीस सरकारला ‘नाट्य’ घडवून खळबळ माजवायची होती. मतांचे गणित जमवायचे होते. त्यामुळे 23 सप्टेंबर 2024 ला तळोजा कारागृहातून न्यायालयात नेत असताना मुंब्रा बायपास येथे पोलिसांच्या व्हॅनमध्ये झालेल्या कथित चकमकीत अक्षय मारला गेला, अशी बोंब ठोकण्यात आली.
या चकमकीवर तेव्हाच संशय निर्माण झाला होता, पण विषय लैंगिक शोषणाचा असल्याने सगळ्यांचीच तोंडे गप्प होती. अक्षयच्या हातात बेड्या असताना व चार मजबूत पोलीस व्हॅनमध्ये असताना एक सडपातळ आरोपी दंड बेड्या घातलेल्या हातांनी पोलिसांचे रिव्हॉल्व्हर खेचून हल्ला करून पळून जाण्याचा उद्योग करील काय? पण हे बनावट कथानक रचले गेले. विरोधकांनी गदारोळ केल्यावर या प्रकरणाची दंडाधिकारीय चौकशी झाली.
आता चौकशी अहवाल उच्च न्यायालयात सादर झाला व अक्षय शिंदेचे एन्काऊंटर बनावट असल्याचा ठपका ठेवून पाच पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) दिले. पाच पोलिसांना आरोपीच्या हत्येस जबाबदार धरले. हे सर्व पोलीस आता नोकरीतून बडतर्फ होतील व त्यांच्यावर खुनाचे खटले दाखल होतील. म्हणजे ते पोलीस व त्यांची कुटुंबे रस्त्यावरच आली. अक्षय शिंदेची हत्या होताच भाजप, शिंदे गट वगैरे लोकांनी त्याचा ‘इव्हेन्ट’ केला. कारण विधानसभा निवडणुका तोंडावर होत्या व त्यांना मतांसाठी माहोल करायचा होता."
तसंच या अग्रलेखातून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह प्रदीप शर्मा यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात असलेल्या प्रदीप शर्मा या पोलीस अधिकाऱ्याने अक्षय शिंदेच्या बनावट एन्काऊंटरची पटकथा व दिग्दर्शनाचे काम पडद्यामागून केल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात नेमके काय पोसत आहेत? कोणासाठी पोसत आहेत? अक्षय शिंदेच्या हत्येने अनेक प्रश्न निर्माण झाले. अक्षय शिंदेप्रमाणे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुन्यांचे एन्काऊंटर का झाले नाही? असा सवालही या अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.