MLC Candidate News : विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने रविवारी रात्री आपल्या 11 अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र, या यादीचे सूक्ष्म विश्लेषण केले असता, तब्बल 60 टक्के उमेदवार हे मुळ भाजपचे नसल्याचे दिसून येते. भाजपने आपल्या हक्काच्या निष्ठावंतांपेक्षा इतर पक्षांतून आलेल्या 'आयात' नेत्यांना झुकते माप दिल्याचे स्पष्ट चित्र आहे.
घोषित 11 उमेदवारांपैकी 6 जागांवर काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा अपक्ष पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांची वर्णी लागली आहे. तर, पाच जागांवर मूळ भाजपचे असलेल्या उमेदवारांना संधी दिली आहे.
प्राजक्त तनपुरे (अहिल्यानगर)
दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा राजीनामा देऊन 30 मे रोजी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या प्राजक्त तनपुरे यांना भाजपने अहिल्यानगरमधून उमेदवारी जाहीर केली आहे. 30 मे ला प्रवेश करणाऱ्या प्राजक्त यांना एकाच दिवसात 31 मे रोजी उमेदवारी जाहीर करण्यात आली. ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे भाचे आहेत. विशेष म्हणजे त्यांना महाविकास आघाडीचे सरकार आले होते तेव्हा त्यांना राज्यमंत्री देखील केली होते.
अमर राजूरकर (नांदेड)
नांदेडच्या राजकारणात आता काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले अशोक चव्हाण यांचा शब्द अंतिम असल्याचे नांदेडच्या उमेदवारावरून दिसून येते. चव्हाण यांचे निकटवर्तीय आणि काँग्रेसकडून तब्बल 12 वर्षे विधानपरिषदेत नांदेडचे प्रतिनिधित्व करणारे अमर राजूरकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
चव्हाण यांच्यासोबत अमर राजूरकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता.नांदेड भाजपचे शहराध्यक्षपद त्यांच्यावर सोपवण्यात आले होते.
बसवराज पाटील (धाराशीव-लातूर)
मूळ काँग्रेसचे असलेले बसवराज पाटील यांना धाराशिव मतदारसंघातून उमेदवारी मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती आणि खरी ठरली. बसवराज हे काँग्रेसचे माजी प्रदेश कार्याध्यक्ष आणि उमरगा व औसा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. मराठवाड्यातील काँग्रेसचा एक मोठा चेहरा मानले जात. मात्र, फेब्रुवारी २०२४ मध्ये अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाच्या काळातच काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. अखेर दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्यांना विधान परिषदेमध्ये भाजपने संधी दिली आहे.
अविनाश ब्राह्मणकर हे भंडारा जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात सक्रिय चेहरा आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात साकोली मतदारसंघातून महायुतीची ताकद वाढवण्यासाठी त्यांचा उपयोग केला गेला. मात्र, ते देखील मूळ भाजपचे नाहीत. 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या अगदी पूर्वसंध्येला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना थेट नाना पटोलेंविरोधात साकोलीतून विधानसभेची उमेदवारीही देण्यात आली होती. तेथे त्यांचा निसटता पराभव झाला. मात्र, नाना पटोले यांच्या विरोधात लढण्याचे बक्षीस त्यांना आता देण्यात आले असून ते विधान परिषदेचे आमदार होणार हे भाजपचे संख्याबळ पाहता निश्चित आहे.
सोलापूरमधून माजी आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांची राजकीय पार्श्वभूमी शिवसेना आणि अपक्ष अशी राहिलेली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ते अपक्ष म्हणून निवडून आले होते. मात्र, 2024 ला विधानसभा भाजपच्या तिकीटावर ते लढले. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला. २०१९ मध्ये अपक्ष विजयी झाल्यानंतर राजकीय गणितांमुळे त्यांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला असला, तरी महाविकास आघाडीच्या काळातही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी निष्ठा कायम ठेवली होती. ते भाजप पुरस्कृत सहयोगी सदस्य म्हणून कार्यरत होते. आता त्यांना थेट भाजपच्या कोट्यातून उमेदवारी मिळाली आहे.
धैर्यशील कदम हे सातारा जिल्ह्यातील कराड उत्तर मतदारसंघातील मातब्बर नेते आहेत. त्यांची मूळ राजकीय पार्श्वभूमी काँग्रेस पक्षाची आहे. २०१४ ची विधानसभा निवडणूक त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि २०१९ ची विधानसभा निवडणूक शिवसेनेकडून लढवली.
महाविकास आघाडीच्या काळात आणि त्यानंतर बदललेल्या राजकीय समीकरणात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे पक्षाने त्यांच्याकडे सातारा भाजपचे जिल्हाध्यक्षपद सोपवले होते. आता थेट स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून त्यांना भाजपने विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे.
या यादीत अरुण लखानी (वर्धा), प्रवीण पोटे (अमरावती), सुहास शिरसाट (संभाजीनगर), नंदकिशोर महाजन (जळगाव) आणि राजीव पोतदार (नागपूर) हे भाजपचे जुने आणि मूळ केडरमधील कार्यकर्ते आहेत. मात्र, एकूण ११ पैकी ६ जागांवर बाहेरून आलेल्या नेत्यांना संधी मिळाल्यामुळे भाजपच्या अंतर्गत गोटात जुन्या विरुद्ध नव्या कार्यकर्त्यांमधील वादाची ठिणगी पडण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे.
पक्षविस्तार आणि स्थानिक पातळीवरील विजयाची गणिते जुळवण्यासाठी भाजपने इतर पक्षांतून आलेल्या बड्या चेहऱ्यांवर विश्वास दाखवल्याचे सांगितले जाते. जेथे भाजपची ताकद नव्हती तेथे आयात उमेदवारांना घेत पक्ष विस्तार केला गेला. मागील दोन वर्षांच्या काळात आयात उमेदवारांनी आपली निष्ठा भाजपप्रती दाखवत आपल्या भागाता भाजपचा विस्तार केला. त्यामुळे बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे आयातांन देखील संधी दिल्याचे सांगितले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.