BJP Loyal Workers Angry : 24 तासांपूर्वी एन्ट्री अन् थेट उमेदवारी! प्राजक्त तनपुरेंमुळे भाजप निष्ठावंतांमधील खदखद पेटली

BJP loyal workers angry over Prajakt Tanpure candidature: विधान परिषदेसाठी प्राजक्त तनपुरेंना संधी मिळताच, दिल्लीला नावं पाठवायची फक्त औपचारिकता का? असा जुन्या कार्यकर्त्यांचा सवाल समोर आला आहे.
Prajakt Tanpure BJP entry and MLC candidature controversy
Prajakt Tanpure BJP entry and MLC candidature controversySarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar MLC Election 2026 : अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आत तनपुरेंना उमेदवारी मिळाल्याने पक्षातील जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची लाट उसळली आहे.

निष्ठावंतांचे नाव फक्त दिल्ली दरबारी पाठवण्यासाठीच असते का? असा प्रश्न भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चिला जात असून, या निर्णयाचे परिणाम आगामी स्थानिक राजकारणात दिसून येऊ शकतात, अशी चर्चा पक्षांतर्गत सुरू झाली आहे.

प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. त्यानुसार शनिवारी (ता. 30) मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आणि प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

त्याचवेळी विधान परिषद उमेदवारीबाबतही त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा होती. अखेर पक्ष प्रवेशानंतर अवघ्या एका दिवसातच उमेदवारी जाहीर झाल्याने भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

अहिल्यानगर भाजपमधून विधान परिषदेसाठी (MLC Election) प्रा. भानुदास बेरड, देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम आणि माजी नगराध्यक्ष वसंत लोढा हे प्रमुख इच्छुक मानले जात होते. प्राजक्त तनपुरे यांच्या नावासोबत प्रा. भानुदास बेरड यांचे नावही भाजपच्या केंद्रीय निवड समितीकडे पाठविण्यात आले होते.

Prajakt Tanpure BJP entry and MLC candidature controversy
BJP strength Ahilyanagar : विधानपरिषदेत प्राजक्त तनपुरेंची एंट्री? विजयी झाल्यास अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपचे 8 आमदार, पण ‘मूळ भाजपवासी’ फक्त दोनच!

विशेष म्हणजे, दिल्लीला आपले नाव पाठवण्यात आले आहे, याची माहितीही प्रा. बेरड यांना सुरुवातीला नव्हती. नंतर त्यांना याबाबत माहिती मिळाली. या घटनेमुळे पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते निर्णय प्रक्रियेपासून किती दूर गेले आहेत, याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. प्रा. बेरड हे जिल्ह्यातील भाजपचे जुने आणि प्रभावी नेते मानले जातात. संघटनात्मक पातळीवर त्यांचे मोठे जाळे असून, जुन्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा प्रभाव असल्याचे मानले जाते.

Prajakt Tanpure BJP entry and MLC candidature controversy
Prajakt Tanpure joins BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच राहुरीत मोठी हालचाल! तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब; कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष

लोकसभा निवडणूक 2024 मध्येही प्रा. भानुदास बेरड यांनी भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी माजी खासदार सुजय विखे पाटील आणि प्रा. राम शिंदे यांच्यासह त्यांनी पक्षाच्या मुलाखत प्रक्रियेत सहभाग घेतला होता. त्यांचे नावही केंद्रीय नेतृत्वापर्यंत पोहोचले होते.

मात्र, विद्यमान खासदार असल्याने सुजय विखे पाटील यांनाच उमेदवारी देण्यात आली. पुढे लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यावेळीही निष्ठावंतांना डावलण्यात आले, अशी चर्चा भाजपमध्ये रंगली होती.

नत्या निवडणुकीत भाजपच्या संघटनात्मक यंत्रणेपेक्षा विखे पाटील यांची स्वतंत्र यंत्रणा अधिक सक्रिय असल्याचे चित्र दिसले होते. अनेक जुने कार्यकर्ते प्रचारात फारसे दिसून आले नव्हते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत नाराज कार्यकर्त्यांना पुन्हा सोबत घेण्याचे प्रयत्न झाले, मात्र आता विधान परिषद उमेदवारीच्या निमित्ताने तीच नाराजी पुन्हा उफाळून आली आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर अनेक निष्ठावंत कार्यकर्ते पुन्हा बाजूला पडल्याची भावना पक्षात आहे. महापालिका तसेच नगरपरिषद निवडणुकांमध्येही त्यांचा अपेक्षित सहभाग दिसून आला नव्हता.

दरम्यान, राष्ट्रवादीकडील ही जागा भाजपच्या ताब्यात येण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांना संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, पूर्वीच्या अनुभवामुळे अनेक निष्ठावंतांनी उमेदवारीसाठी फारशी चाचपणीही केली नाही, अशी चर्चा आहे.

अखेरीस भाजप नेतृत्वाने पक्षात नुकतेच दाखल झालेल्या प्राजक्त तनपुरे यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली. त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांचे योगदान आणि निष्ठा यांना पक्षात नेमके किती महत्त्व आहे? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

अहिल्यानगर भाजपमध्ये सध्या तरी नव्या नेतृत्वाला प्राधान्य आणि जुन्या निष्ठावंतांची उपेक्षा, असे चित्र दिसत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांवर त्याचा परिणाम होतो का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com