Mumbai News: भारतीय जनता पार्टीनं आगामी काळात होत असलेल्या निवडणुकांच्या धर्तीवर महाराष्ट्रात संघटनात्मक पातळीवर पुन्हा एकदा भाकरी फिरवली आहे.भाजप युवा मोर्चाच्या नव्या प्रदेश कार्यकारिणीची अधिकृत घोषणा सोमवारी(ता.5 ऑक्टोबर)करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य भाजप युवा मोर्चाची नवी प्रदेश कार्यकारिणी युवा मोर्चा प्रभारी सुनील राणे आणि युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी जाहीर केली आहे. ही नवी कार्यकारिणी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार तयार करण्यात आली असून त्यात एकूण 29 पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षात विविध संघटनात्मक फेरबदल व नियुक्त्या केल्या आहेत. यापूर्वी फेब्रुवारी 2026 मध्ये रविंद्र चव्हाण यांनी 6 सरचिटणीस आणि 12 उपाध्यक्षांसह आपली नवीन प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली होती, ज्यामध्ये गोपीचंद पडळकर, चित्रा वाघ यांच्यासह प्रमुख नेत्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या. तसेच कोल्हापूरमधील खासदार पुत्र कृष्णराज महाडिक यांची भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली होती.
भारतीय जनता पार्टीकडून या कार्यकारिणीत युवांना मोठी संधी देण्यात आली आहे. युवा मोर्चाच्या कार्यकारिणीत समावेश करण्यात आलेले सर्व पदाधिकारी हे 35 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील आहेत. या नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून भाजपनं मोठी रणनीती आखल्याचं बोललं जात आहे.
आगामी निवडणुकांमध्ये पक्ष युवाशक्तीची ताकद मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या सूचनेनुसार, प्रदेश सरचिटणीस व युवा मोर्चा प्रभारी सुनीलजी राणे आणि युवा मोर्चा अध्यक्ष (भाजपा महाराष्ट्र) कृष्णराज महाडिक यांनी युवा मोर्चा प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे.
नांदेडच्या 28 वर्षीय शंभवी साळे यांच्याकडे या नव्या कार्यकारिणीत 'युवती प्रमुख' पदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्यासमोर राज्यात युवतींचं संघटन मजबूत करण्यासोबतच आणि तरुणींच्या प्रश्नांवर भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून आवाज उठवण्याची मुख्य जबाबदारी असणार आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार जाहीर करण्यात आलेल्या या यादीत राज्यातील विविध विभागांतील तरुण चेहऱ्यांना स्थान मिळाले आहे. पक्षाची ध्येयधोरणे आणि कामे तळागाळातील तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही नवी टीम सज्ज झाली आहे.
35 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील चेहऱ्यांना संधी देऊन भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून राज्यातील तरुण मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. या निर्णयामुळे भाजपच्या युवा आघाडीत नवा उत्साह पाहायला मिळत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.