Maharshtra BJP Core Committee Meeting Sarkarnama
महाराष्ट्र

VIDEO - BJP Maharshtra Delhi Meeting: भाजपने विधानसभेसाठी कसली कंबर; दिल्लीत कोअर कमिटीच्या बैठकीत 'रोडमॅप'वर चर्चा!

Mayur Ratnaparkhe

Maharshtra BJP Politics : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला बसलेला फटका, घटलेली जागांची संख्या त्यावरून देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपद सोडण्याची व्यक्त केलेली इच्छा आणि आगामी विधानसभा निवडणूक या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दिल्लीत भाजपच्या महाराष्ट्रातील कोअर कमिटीची बैठक गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची मानली जात होती. कारण, या बैठकीत भाजपचे केंद्रीय नेतृत्व नेमका काय कानमंत्र देतात, विधानसभेसाठी भाजपची रणनिती कशी असणार, राज्यात बदल होणार की नाही, महायुतीबाबत भाजपची काय भूमिका असणार आदी अनेक प्रश्नांची उत्तरं स्पष्ट होणार होती. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष होते.

अखेर बैठक संपल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी माध्यमांना याबाबत माहिती दिली. फडणवीस म्हणाले, 'भाजपच्या महाराष्ट्राच्या कोअर कमिटीची बैठक ही केंद्रीय नेतृत्वासोबत झाली आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राचा जो काही निकाल आला आहे, त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये कुठे कशी मतं मिळाली, कुठं चांगली मिळाली, कुठं कमी मिळाली? त्याची कारणं काय काय होती, त्यावर कुठल्या मुद्य्यांचा प्रभाव होता. अशा सगळ्या गोष्टींची चर्चा झाली आणि त्यासोबतच आगामी विधानसभेचा रोडमॅप यावर सुद्धा एक प्राथमिक चर्चा आम्ही केली.'

याशिवाय, 'कुठल्याही परिस्थितीत आपल्या महायुतीच्या सर्व घटक पक्षांसोबत ही विधानसभा निवडणूक कशी जिंकता येईल, यासंदर्भातील एक रोडमॅप आम्ही तयार केला आहे आणि याच सोबत आता लवकरच घटक पक्षांसोबतही चर्चा करून आणि अत्यंत मजबुतीने आपल्याला निवडणुकीत कसं पुढं जाता येईल, यासंदर्भातील सर्व कार्यवाही ही येत्या काळात आम्ही करणार आहोत. केंद्रीय भाजप पूर्ण ताकदीनिशी आमच्या पाठिशी उभी आहे.' अशी माहितीही फडणवीसांनी यावेळी दिली.

पीयूष गोयल(Piyush Goyal) म्हणाले, 'महाराष्ट्रात कोणताही बदल नाही. पुन्हा एकदा एनडीएचं महायुतीचं सरकार अतिशय मजबुतीने आम्हाला महाराष्ट्रात आणायचं आहे. कोणत्याही प्रकारच्या बदलाची शक्यता नाही.'

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनामा संदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाली नाही. देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रिपदी कायम राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राज्यात कुठलाही बदल होणार नाही, हे कोअर कमिटीच्या बैठकीत स्पष्ट झालं असल्याचं सांगण्यात आलं आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT