महानगरपालिकेच्या प्रचाराच्या तोफा काल संध्याकाळी थंडावल्या खऱ्या, पण मुंबईकरांच्या मनात नेमकं काय? मुंबईकर कोणाला कौल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महानगरपालिका निवडणुकीत सर्वच पक्षांनी आपली ताकद पणाला लावली होती. पण बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणुकीचं खर राजकारण तापलं ते या पाच मुद्द्यांमुळे. या निवडणुकीत महायुती आणि पुन्हा एकत्र आलेले ठाकरे बंधू आमनेसामने असल्याने चुरशीचा सामना होणार हे स्पष्ट आहे.
देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळख असलेल्या बीएमसीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. अनेक छोट्या राज्यांपेक्षा मोठं बजेट असलेली ही महापालिका कुणाच्या ताब्यात जाणार, यावर राजकीय समीकरणं अवलंबून आहेत. 227 जागांसाठी तब्बल 1700 उमेदवार रिंगणात उतरले असून ही लढत अत्यंत बहुरंगी ठरली आहे.
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात ‘मराठी विरुद्ध बिगर-मराठी’ हा वाद केंद्रस्थानी आला. भाजप नेते अन्नामलाई यांनी मुंबईला जागतिक शहर म्हणत केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण तापलं. या वक्तव्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे संतप्त झाले आणि त्यांनी परखड शब्दांत टीका केली. बाहेरून येणाऱ्या नेत्यांनी मुंबईबाबत बोलताना मर्यादा पाळाव्यात, असा इशारा त्यांनी दिला.
त्याआधी ‘खान विरुद्ध मराठी हिंदू महापौर’ या मुद्द्यावरून ओळखीच्या राजकारणाला उधाण आलं. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी वादग्रस्त विधान केल्याने चर्चा रंगली, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील महापौर हिंदू आणि मराठीच असेल, असा दावा केला. याचबरोबर महायुतीच्या जाहीरनाम्यात शहरातून बेकायदेशीर रोहिंग्या आणि बांगलादेशींना हद्दपार करण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.
राजकीय गणित पाहिलं तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिंदे गटाची शिवसेना यांच्यात 69 जागांवर थेट लढत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वारशाचा खरा दावेदार कोण, हे या निवडणुकीतून ठरणार आहे. शिवसेना (उबाठा) 97 जागांवर भाजपशी भिडत आहे, तर काँग्रेस 88 जागांवर भाजपला टक्कर देत आहे. शिंदे गटाची शिवसेना 18 जागांवर मनसेशी आणि 53 जागांवर काँग्रेसशी सामना करत आहे. भाजप आणि मनसे यांच्यातही सुमारे 35 जागांवर चुरस पाहायला मिळू शकते.
महिलांना आकर्षित करण्यासाठी ठाकरे बंधूंनी त्यांच्या जाहीरनाम्यात बेस्ट बसच्या तिकिटांवर 50 टक्के सवलत आणि छोट्या व्यावसायिकांसाठी पाच लाख रुपयांचं विनाअडथळा, विनाव्याज कर्ज देण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे विकास, ओळख, वारसा आणि आश्वासनं या सगळ्यांचा कस लागणार असून निकालाबाबत मुंबईकरांच्या मनात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.