Mumbai News, 14 Jan : मुंबई महापालिकेच्या प्रचारासाठी शिवाजी पार्क मैदानात आयोजित केलेल्या सभेतून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही बंधूंनी भारतीय जनता पार्टी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर सडकून टीका केली होती. तर ठाकरेंच्या याच टीकेला दुसऱ्या दिवशी त्याच मैदानात झालेल्या सभेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं होतं.
यावेळी बोलताना, शिवसेनेने मराठी मुलांना फक्त वडा-पावच्या गाड्या दिल्या. आम्ही त्यांना उद्योग व रोजगार देऊ, असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं होत. तर फडणवीसांच्या याच वक्तव्याचा समाचार ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून घेण्यात आला आहे. सामनात लिहिलं की, 'शिवाजी पार्कच्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस ताळतंत्र सोडून बोलले. ते म्हणतात, ‘‘शिवसेनेने मराठी मुलांना फक्त वडा-पावच्या गाड्या दिल्या.
आम्ही त्यांना उद्योग व रोजगार देऊ.’’ फडणवीसांचे हे विधान साठ वर्षांपूर्वी वडा-पाव खाऊन ‘मराठी’ न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्यांचा अपमान करणारे आहे. साठ वर्षांपूर्वी शिवसेनेच्या स्थापनेच्या वेळी मुंबईत मराठी तरुणांना नोकऱ्या, रोजगारातून डावलले जात होते. शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली मराठी माणूस एकवटला होता. त्या वेळी शिवसेनाप्रमुख म्हणाले, ‘‘आज नोकऱ्या मिळत नसतील तर रिकामे बसू नका.
वडा-पावच्या गाड्या लावा.’’ त्यानंतर मुंबईतील ‘वडा-पाव’ प्रसिद्ध झाला. ते एक रोजगार आणि आर्थिक उलाढालीचे साधन बनले. मुंबई-महाराष्ट्रात ‘वडा-पाव’च्या गाड्यांनी मोठा रोजगार मिळवून दिला. आज ‘वडा-पाव’ न्यूयॉर्क, इंग्लंड, युरोपियन राष्ट्रांत पोहोचला. पंचतारांकित हॉटेलमध्ये ‘वडा-पाव’ मिळत असला तरी लोक आवडीने ‘वडा-पाव’ खातात तो शिवसेनेच्या गाड्यांवरच.
वडा-पावचे महात्म्य आणि महत्त्व फडणवीस सारख्यांना कळणार नाही. कारण त्यांना कष्ट करून घामाची कमाई करणाऱ्या शेकडो कष्टकऱ्यांची घृणा वाटते', अशा शब्दात सामनातून फडणवीसांना हल्लाबोल करण्यात आला आहे. तर फडणवीस इडली-सांबर, ढोकळा-फाफडाचे कौतुक करतील, पण मराठी वडा-पाव दिसला की, त्यांना पोटदुखीचा त्रास सुरू होतो. फडणवीस यांना हे माहीत असायला हवे की, गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत ‘वडा-पाव’ आवडीने खातात. मोठ्या वर्गाचे ते अन्न आहे.
फडणवीसांचे लाडके अमित शहा मुंबईत येऊन ‘वडा-पाव’वरच ताव मारतात व हा ‘वडा-पाव’ शिवसैनिकांच्या गाडीवरचाच असतो. महाराष्ट्राच्या राजकीय कार्यकर्त्यांच्या चार-पाच पिढ्या मराठमोळ्या वडा-पाववरच पोसल्या याचा अभिमान राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असायला हवा. सगळ्यांचेच नशीब राजपुत्र जय शहासारखे नसते. जय शहाला कोणत्या गुणवत्तेवर क्रिकेट उद्योगात रोजगार मिळाला? असा सवालही सामनातून करण्यात आला आहे.
तर फडणवीस म्हणतात, ‘‘आम्ही वडा-पाव नव्हे रोजगार देणार.’’ आम्ही विचारतो, मुख्यमंत्री महोदय, मुंबई-महाराष्ट्रातले उद्योग व गुंतवणूक गुजरातला पळवली जातेय. त्यामुळे मराठी माणसाचा रोजगार नष्ट झाला. रोजगार देणार कोठून? मुंबई-महाराष्ट्रातील उद्योगांत 80 टक्के भूमिपुत्रांना प्राधान्य मिळावे यासाठी शिवसेनेने लढा दिला.
आज तुम्ही या लढाईवरच संकट आणले. मुंबईतले उद्योग गुजरातला पळवले जात असताना तोंडात ‘वडा-पाव’ कोंबून बसलेले फडणवीस रोजगार देण्याचा खोटा वायदा करीत आहेत व हजारो तरुणांच्या ‘चुली’ पेटवणाऱ्या वडा-पाव उद्योगाला कमी लेखत आहेत. मराठी माणसाचा वडा-पाव ‘इंटरनॅशनल’ झाला याचा अभिमान बाळगायचे सोडून ते वड्यात विष कालवत आहेत. दक्षिणेतील राज्यकर्ते ‘इडली’ विक्रीवर टीका करीत नाहीत.
बिहारचे मुख्यमंत्री लिट्टी चोखाचा अभिमान बाळगतात. दिल्लीत ‘कचोरी समोसा’ हा उद्योग आहे. पंजाबात ‘मिस्सी रोटी आणि लस्सी’चा बोलबाला आहे. कर्नाटकात ‘बेन्ने डोसा’ जोरात आहे. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झुणका-भाकर, वडा-पावचा द्वेष करतात. महाराष्ट्राला हे असे राज्यकर्ते लाभले हे दुर्दैवच म्हणायला हवे. वड्याच्या उकळत्या तेलात या वेळी मराठीद्वेष्ट्यांना तळून, भाजून काढले पाहिजे. वडा-पाव झिंदाबाद, अशा शब्दात ठाकरेंच्या शिवसेनेने फडणवीसांनी वडा पाव संदर्भात केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.