मुंबई : गणेशोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांमध्ये होणाऱ्या वाढत्या ध्वनीप्रदूषणाची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. मिरवणुकीदरम्यान सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यास पूर्ण बंदी घालण्याचे निर्देश देण्याची भूमिका न्यायालयाने स्पष्ट केली आहे. तसेच परवानगीपेक्षा अधिक आवाज करणारे DJ, लाऊडस्पीकर आणि इतर ध्वनिक्षेपकांवरही पोलिसांनी कठोर कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने धार्मिक मिरवणुकांमधील ध्वनीप्रदूषणाची स्वेच्छा दखल घेतली. मिरवणूक काढण्यासाठी मिळालेली परवानगी, लाऊडस्पीकर, ढोल, फटाके यांसाठी आवश्यक असलेल्या स्वतंत्र परवानग्या मंडळांना दर्शनी भागात लावणे बंधनकारक करण्याची भूमिका न्यायालयाने घेतली आहे. परवानगी प्रदर्शित केली नाही तर संबंधित मंडळावर पोलिसांनी कारवाई करावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील ध्वनीप्रदूषणाविरोधातील कार्यकर्ते विद्यानंद बापट यांचा उल्लेख महत्त्वाचा ठरतो. बापट यांनी गणेशोत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या आवाजातील DJ, Dolby आणि लाऊडस्पीकरच्या वापराविरोधात सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांनी संबंधित प्रशासनाकडे ध्वनीप्रदूषणाच्या नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती.
दरम्यान, मिरवणुकीतील आवाजाची पातळी तपासण्यासाठी पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी डेसिबल मीटरद्वारे नोंद घ्यावी. निर्धारित मर्यादेपेक्षा आवाज अधिक आढळल्यास कायद्यानुसार कारवाई करण्याचे निर्देश देण्यात येणार आहेत. ढोल पथकांकडून वाद्य म्हणून वापरल्या जाणाऱ्या सिलिंडरच्या वापरावरही बंदी घालण्याची भूमिका न्यायालयाने मांडली आहे.
न्यायालयाने मंडळांकडून 'Security Deposit' घेण्याची शक्यताही व्यक्त केली आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास ही रक्कम दंड म्हणून जप्त करता येईल. न्यायमूर्ती कुलकर्णी यांनी स्पष्ट केले, "या मंडळांकडे पैशांची काहीच कमतरता नाही... Security Deposit ही अट या मंडळांसाठी प्रतिबंधात्मक ठरेल... हे 'प्रदूषण करणाऱ्यानेच त्याची किंमत मोजावी' या तत्त्वावर आधारित असेल."
न्यायालयाने वारकरी मिरवणुकीचे उदाहरण देत सांगितले की, हजारो वारकरी टाळ-मृदंगाच्या साथीने गाणी म्हणत सहभागी होतात; मात्र त्यामुळे इतरांना त्रास होईल, अशा पद्धतीचे ध्वनीप्रदूषण होत नाही. न्यायालयाने म्हटले, "आम्ही कोणत्याही धार्मिक मिरवणुका किंवा उत्सवांच्या विरोधातही नाही... उत्सव जरूर साजरे व्हावेत, पण ते कायद्याच्या चौकटीत राहूनच व्हावेत.
दरम्यान, राज्याचे महाधिवक्ता डॉ. मिलिंद साठे यांनी पोलिसांकडून मिरवणुकीसाठी मिळणारी परवानगी आणि DJ, लाऊडस्पीकर, ढोल किंवा फटाक्यांसाठी आवश्यक असलेली परवानगी वेगवेगळी असल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यामुळे आता धार्मिक मिरवणुकांमधील ध्वनीप्रदूषणावर प्रशासनाची जबाबदारी अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.