<div class="paragraphs"><p>bullock cart race</p></div>

bullock cart race

 
sarkarnama
महाराष्ट्र

पुणे जिल्ह्यातील बैलगाडा शर्यतीसाठी बॅड न्यूज; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

सरकारनामा ब्युरो

पुणे : नवीन वर्षाच्या तोंडावर पुणे जिल्ह्यातील बैलगाडा मालकांच्या (Bullock cart race) आणि शर्यतप्रेमींच्या आनंदावर विरजण पडलं आहे. कोविड-१९ च्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील मौजे चिंचोडी आणि मावळ तालुक्यातील मौजे नानोली तर्फे चाकणमधील बैलगाडा शर्यतीला पुढील आदेशापर्यंत स्थगित ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

या शर्यतीसाठी शिरूरचे माजी खासदार व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव-पाटील (Shivajirao Patil) हे आपल्या लांडेवाडी या गावी तर मावळचे राष्ट्रवादी आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) हे मावळ तालुक्यात नाणोली येथे राज्याचे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांच्या उपस्थित ही शर्यत घेणार होते.

मौजे चिंचोडी इथे शितलादेवी यात्रेनिमित्त आणि मौजे नानोली इथे दत्त जयंती उत्सवानिमित्त आज दिनांक १ जानेवारी २०२२ रोजी बैलगाडा शर्यत पार पडणार होती. मात्र काल जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत या बैलगाडा शर्यतीच्या परवानगीचा पुनर्विचार करण्यात आला. यात शासनाच्या नवीन नियमानुसार समाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये ५० जणांच्या उपस्थितीच्या मर्यादेनुसार आयोजकांना खुलासा विचारण्यात आला. त्यानुसार या बैठकीत आयोजकांनी केलेला खुलासा आण स्थानिक प्रशासनानेही सादर केलेला अहवाल ठेवण्यात आला.

आंबेगाव आणि मावळच्या तहसिलदारांच्या अहवालानुसार दोन्ही स्पर्धांमध्ये २५० बैलगाडा आणि प्रत्येक बैलगाडासोबत कमीत कमी २० जण उपस्थित राहणार असल्याचे नमुद करण्यात आले. त्यामुळे या शर्यतीमध्ये मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय जमणार असल्याचा अंदाज आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी पोलिसांनी या शर्यतीसाठी दिलेला ना हरकत दाखला रद्द केला आणि पुढील आदेशांपर्यंत या शर्यतीला स्थगित ठेवण्याचे आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत.

पुणे जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून कोविड पॉजिटीव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. २६ डिसेंबर रोजी जिल्ह्यात १५८ रुग्ण आढळले होते. तर दुसऱ्या दिवशी हा आकडा २४७ वर गेला होता. त्यानंतर २८ डिसेंबरला - २८२, २९ डिसेंबर - ४०४, ३० डिसेंबर - ४७७, ३१ डिसेंबर - ६८३ रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी जिल्ह्यातील बैलगाडा शर्यत पुढील आदेशापर्यंत स्थगित ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT