Pune Police News Sarkarnama
महाराष्ट्र

Pune Police : भाडेकरू ठेवलाय पण 'ती' एक चुक भोवली! पुण्यात १५० हून अधिक घरमालकांवर गुन्हे दाखल!

Pune Police action against landlords : पुण्यातील तब्बल 150 घरमालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खडक, शिवाजीनगर, आंबेगाव आणि वाघोली पुण्यातील विविध भागात ही कारवाई करण्यात आली.

Sudesh Mitkar

Pune News : पुण्यात घर भाड्याने देत असाल तर सावधान! घरात कोण राहते, त्याची माहिती पोलिसांना न देणे आता चांगलेच महागात पडू शकते. भाडेकरूंची माहिती पोलिसांकडे नोंदवून न देणाऱ्या घरमालक आणि पीजी चालकांविरोधात पुणे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील विविध भागांत केलेल्या कारवाईत 150 हून अधिक घरमालक आणि पीजी चालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिक्षण, नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने देशाच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने नागरिक पुण्यात येतात. त्यामुळे शहरात फ्लॅट, खोल्या, दुकाने तसेच पीजीमध्ये राहण्याची मागणी मोठी आहे. मात्र, घर किंवा पीजी भाड्याने देताना तेथे राहण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीची आवश्यक माहिती पोलिसांना देण्याकडे काही घरमालक आणि पीजी चालक दुर्लक्ष करत असल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले आहे.

पोलिसांनी केलेल्या तपासणीदरम्यान भाडेकरू अथवा पीजीमध्ये वास्तव्यास असलेल्या व्यक्तींची माहिती पोलिसांकडे सादर न करणाऱ्या घरमालकांवर कारवाई करण्यात आली. खडक, शिवाजीनगर, आंबेगाव आणि वाघोली यांसह पुणे शहरातील विविध भागांत ही कारवाई करण्यात आली आहे.

विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त प्रशांत अमृतकर यांनी घरमालक आणि पीजी चालकांनी भाडेकरूंची माहिती देण्याबाबत गांभीर्याने पालन करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. घरमालकांनी केवळ भाडेकरूची ओळख पाहून घर भाड्याने देणे पुरेसे नसून, पोलिसांनी निर्धारित केलेली माहिती आणि प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

'त्या' घरमालकांना आता धडा

पुण्यात घर भाड्याने देताना पोलिसांना माहिती देणे ही केवळ औपचारिकता समजणाऱ्या घरमालकांना या कारवाईमुळे इशारा मिळाला आहे. आतापर्यंत 150 पेक्षा अधिक जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे पुण्यात घर, फ्लॅट, खोली किंवा पीजी भाड्याने देणाऱ्या घरमालकांनी भाडेकरूची आवश्यक माहिती पोलिसांकडे तातडीने खात्री करणे गरजेचे आहे. माहिती नोंदवून न दिल्यास तुमच्यावरही कारवाई होऊ शकते.

पोलिसांचा इशारा

शहरात मोठ्या प्रमाणावर नागरिक बाहेरून येऊन राहत असल्याने कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने भाडेकरूंची माहिती पोलिसांकडे उपलब्ध असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे घरमालकांनी भाडेकरूची माहिती लपवण्याऐवजी पोलिसांनी सांगितलेली प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा देखील देण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT