Eknath Shinde, Chandrakant Patil  Sarkarnama
महाराष्ट्र

Chandrakant Patil News : ...जेव्हा चंद्रकांतदादांच्या मदतीला मुख्यमंत्री शिंदे धावून येतात !

Sachin Waghmare

Political News : राज्यात दोन वर्षापूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदार बाहेर पडले. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडले. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महायुतीचे सरकार आले. राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष असूनही देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले. हे काही भाजप नेत्याच्या पचनी पडले नाही. त्यांची समजूत काढताना नाकीनऊ आले होते.

भाजपच्या (Bjp) आमदारांना समजावताना चंद्रकांत पाटील यांनी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी, या राज्याच्या विकासासाठी मनावर दगड ठेवा, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यावेळी चंद्रकांत दादाच्या मदतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच धावून आले. त्यांनी त्यावेळी कशी मदत केली, याचा संपूर्ण किस्सा राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमावेळी सांगितला.

राज्यात महायुतीचे सरकार आले, त्यावेळी मी प्रदेशाध्यक्ष होतो. त्यामुळे माझ्यावर संघटनात्मक जबाबदारी मोठी होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या श्रद्धेमुळे आणि संघटनेच्या प्रेमामुळे आमदारांच्या प्रतिक्रिया खूप आक्रमक होत्या. मी काहीही बोललो तरी वाद होत होते. मी राज्याचा अध्यक्ष होतो. त्यांना समजावताना मी माझे परंपरागत शब्द वापरले होते.

हिंदुत्वाच्या रक्षणासाठी, या राज्याच्या विकासासाठी मनावर दगड ठेवा, असे मी म्हटले होते. त्यामध्ये काहीच चुकीचे नव्हते. मात्र, मी केलेल्या या विधानाचा अर्थ वेगळा काढण्यात आला होता. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले हे मला आवडले नाही, असे काही जणांना वाटत होते, असे चंद्रकांतदादा (Chandraknt Patil) म्हणाले.

त्यानंतर मी प्रवासाला जात असताना मला एक असा फोन आला की, तुम्ही केलेल्या त्या वक्तव्यामुळे वादविवाद सुरू झाले आहेत. त्यावेळी मी त्यांना म्हणालो वादविवाद करण्याचे काहीच कारण कारण नाही. मी माझ्या कार्यकर्त्यांना अधिवेशनात समजावत होतो. त्यावेळी समजूत काढण्याच्या उद्देशाने मी ते वक्तव्य केले असल्याचे सांगितले.

या प्रकरणात मी अडचणीत आलोय हे एकनाथ शिंदे यांनी ओळखले. त्यांनी ताबडतोब दीपक केसरकर यांना सांगून दादा अडचणीत आहेत, तुम्ही बोलले पाहिजे असे सांगितले. त्यानंतर दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माझी बाजू सावरली.

105 आमदार, सात अपक्ष असे मिळून 112 आमदार असणाऱ्या पक्षाला उपमुख्यमंत्रीपद मिळाले तर ते पेढे वाटणार काय, त्यांना दुःख होणार, अशी पडद्यामागची स्टोरी सांगत चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी केलेल्या मदतीचे कौतुक केले. त्यामुळे मला अडचणीच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत केल्याचा किस्सा चंद्रकातदादांनी सांगितला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT