Vijay Wadettiwar News : काँग्रेसकडून महाराष्ट्र, हरियाणा विधानसभा निवडणुकीत व्होट चोरी झाल्याचा आरोप केला होता. विशेष करून सायंकाळी पाच नंतर झालेल्या मतदानावर संशय व्यक्त केला जात होता. आता ‘द रिपोर्टर्स कलेक्टिव्ह’ने निवडणूक आयोगाच्या अंतर्गत नोंदींची तपासणी केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. याबाबत काँग्रेसने ट्विट करत व्होटी चोरी झाल्याचे सांगत आकडेवारी शेअर केली आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या ट्विट करत म्हटले आहे की, २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील २०० मतदारसंघांमध्ये सायंकाळी ५ वाजल्यानंतर नेमके किती मतदान झाले, याची माहितीच निवडणूक आयोगाकडे उपलब्ध नसल्याचे ‘द रिपोर्टर्स कलेक्टिव्ह’च्या अहवालातून समोर आले आहे.
'यामध्ये महाराष्ट्रातील ११४ विधानसभा मतदारसंघ, जम्मू-काश्मीरमधील ४४ आणि हरियाणातील २२ मतदारसंघांचा समावेश आहे.उदाहरणार्थ, महाराष्ट्रात एकनाथ शिंदे ज्या मतदारसंघातून विजयी झाले, त्या मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत केवळ १.१३ लाख मतांची नोंद होती; मात्र अंतिम आकडा २.०३ लाखांवर पोहोचला. म्हणजेच शेवटच्या तासात सुमारे ९० हजार मतदान झाल्याची नोंद आहे.'
'या अहवालानुसार, ३६६ मतदान केंद्रांवर शेवटच्या तासात दर मिनिटाला सरासरी ४ मते पडल्याची आकडेवारी समोर येते. याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.', असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
पुढे त्यांनी सांगितले की,विरोधी पक्षांनी सायंकाळी ५ वाजल्यानंतर अचानक वाढलेल्या मतदानाबाबत आक्षेप घेतला होता, तेव्हा आयोगाने हे आरोप फेटाळून लावले होते. मात्र, संबंधित आकडेवारीच आयोगाकडे उपलब्ध नव्हती, असे या अहवालातून समोर येत आहे.
मग प्रश्न असा आहे की, ज्या आकडेवारीची माहिती आयोगाकडेच नव्हती, त्या आधारे विरोधकांचे आक्षेप फेटाळण्याचा अधिकार आयोगाला कोणी दिला? लोकशाहीतील निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न निर्माण होत असताना आयोगाने जनतेला उत्तर देणे आवश्यक आहे.
निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे
लोकशाहीचा पाया असलेल्या मतदान प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल, तर हा केवळ विरोधकांचा प्रश्न नाही, तर संपूर्ण देशातील लोकशाहीचा प्रश्न आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे आणि सत्य जनतेसमोर आलेच पाहिजे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.