

Kerala Politics : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या आणि केरळचे माजी मुख्यमंत्री के. करुणाकरन यांच्या कन्या पद्मजा वेणुगोपाल यांनी गुरूवारी पक्षाला सोडिचिठ्ठी दिली. भाजपमध्ये जाणे ही माझी चूक होती. पक्षाची विचारधारा समजून न घेताच भाजपमध्ये गेल्याची कबुलीही पद्मजा यांनी दिली आहे.
के. करुणाकरन हे काँग्रेसचे मातब्बर नेते होते. त्यांनी केरळचे चारवेळा मुख्यमंत्रिपद भूषविले आहे. राज्यातील यूनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटच्या (यूडीएफ) स्थापनेत त्यांचा मोठा वाटा होता. राज्यात सध्या डाव्या पक्षांचा पराभव करून यूडीएफ सत्तेत आहे. करणाकरन यांच्या कन्या पद्मजा याही सुरूवातीला काँग्रेसमध्येच सक्रीय होत्या. त्यांनी २०२४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.
जवळपास अडीच वर्षांनंतर पद्मजा यांनी भाजपला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा माझा निर्णय पूर्णपणे वैयक्तिक आहे. मी केरळचे प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर आणि भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडे माझा राजीनामा सादर केला आहे.
भाजपमध्ये गेल्यापासून मला काहीही मिळाले नाही. हा एक वैयक्तिक निर्णय आहे आणि मी पक्ष सोडण्याच्या माझ्या निर्णयावर के. मुरलीधरन यांच्याशी चर्चा केली आहे. भाजपची विचारधारा समजून घेण्यासाठी मला थोडा वेळ लागला. विचारधारा समजून न घेताच मी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याचा मी भाजपला दोष देत नाही. भाजपमध्ये जाणे माजी वैयक्तिक चूक होती, असे पद्मजा वेणुगोपाल म्हणाल्या आहेत.
काँग्रेसमध्ये घरवापसी
पद्मजा यांनी २०२१ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढविली होती. मात्र, त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी पक्षातील नेत्यांवर टीका करत आपल्याला मदत केली नसल्याचा आरोप केला होता. या निवडणुकीनंतर त्यांनी २०२४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.
कमळ चिन्हावर त्यांनी यावर्षी पुन्हा विधानसभेची निवडणूक लढविली. पण यावेळी त्यांचा पराभव झाला. दरम्यान, काँग्रेसमध्ये परतण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, यूडीएफ सरकार आणि मुख्यमंत्री सतीशन यांचे कौतुक केल्याने त्यांची लवकरच घरवापसी होऊ शकते, अशी चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.