बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. चिखली तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी यांचे रेल्वे अपघातात निधन झाले. कासारा घाटात धावत्या रेल्वेतून पडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच चिखली तालुका तसेच संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
डॉ. भुसारी हे काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते असून नुकतेच त्यांची पैठण विधानसभा मतदारसंघ निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पक्षाच्या मुंबईतील महत्त्वाच्या बैठकीसाठी ते प्रवास करत होते. मात्र, परत येताना कासारा घाटाजवळ अपघात घडला. पोलिसांच्या माहितीनुसार, धावत्या रेल्वेतून पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तातडीने नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न झाला, पण उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला. नेमका अपघात कसा झाला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
डॉ. भुसारी यांनी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून सामाजिक कार्याची सुरुवात केली होती. त्यांनी समाजसेवा, शिक्षण आणि राजकारण या सर्व क्षेत्रांमध्ये सक्रिय भूमिका बजावली. त्यांच्या कार्यामुळे ते सर्वसामान्यांच्या मनात आपलेपणा निर्माण करण्यात यशस्वी झाले होते. त्यांच्या अचानक निधनाने काँग्रेस पक्षासह संपूर्ण चिखली तालुका हळहळ व्यक्त करत आहे.
डॉ. भुसारी हे चिखली तालुक्यातील एक ओळखलेले नाव होते. त्यांनी काँग्रेस पक्षात दीर्घकाळ सक्रिय राहून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काम केले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक उपक्रम राबवले होते. त्यांचा सर्वसामान्यांशी घट्ट संपर्क आणि लोकाभिमुख स्वभाव यामुळे ते सर्वपक्षीय नेत्यांमध्ये लोकप्रिय होते.
अलीकडेच त्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काँग्रेस निरीक्षक म्हणून संभाव्य उमेदवारांची बैठक घेतली होती. तसेच येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत इसोली गटातून उमेदवारीची त्यांची चर्चा सुरू होती. त्यांच्या अकाली निधनाने काँग्रेस पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा धक्का पक्षासाठी चिंताजनक मानला जात आहे.
त्यांच्या निधनाने भुसारी कुटुंबासह चिखलीतील नागरिक, कार्यकर्ते आणि मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे. डॉ. भुसारी यांच्या जाण्याने “आपला माणूस” हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. त्यांच्या कार्याची आणि समाजसेवेची आठवण दीर्घकाळ राहील, अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.