काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी फोन करून समजूत काढल्यानंतर माजी आमदार राहुल बोंद्रे यांचा मंगळवारी होणारा नियोजित भाजपप्रवेश रद्द झाला आहे. स्वतः बोंद्रे यांनी आपण काँग्रेससोबतच थांबणार असल्याचे फेसबुक पोस्टमधून स्पष्ट केले आहे. राहुल गांधींशी बोलताना राहुल बोंद्रे यांनी "मै सबकुछ न्योछावर कर दूंगा लेकिन आपके साथ लढाई लढूंगा....!" असंही म्हटलं.
राहुल गांधी यांच्या या फोननंतर बोंद्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह संचारला असल्याचे चित्र आहे. रात्री उशीरा बोंद्रे यांच्या चिखलीतील राजा टॉवर परिसरातील निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते जमले होते. त्यांनी “राहुलभाऊ तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
आता राहुल बोंद्रेंच्या या निर्णयानंतर त्यांच्या भाजप प्रवेशासाठी प्रयत्न करणारे सगळे नेते तोंडावर पडले आहेत. यात प्रमुख नाव आहे अहिल्यानगरमधील एका बड्या संस्थानिक नेत्याचे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या आधीपासूनच बोंद्रेंच्या भाजपप्रवेशाची चर्चा सुरू होती. त्यासाठी हा बडा प्रयत्न करत होता. बोंद्रेंसाठी काँग्रेसमध्ये असल्यापासून हा नेता गॉडफादर होता. पण महाले दाम्पत्याच्या विरोधामुळे बोंद्रेंच्या प्रवेशाची चर्चा पुढे सरकत नव्हती.
बोंद्रे आणि महाले हे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात. विधानसभा निवडणुकीत बोंद्रेंना दोन वेळा पराभूत करत श्वेता महाले यांनी चिखलीच्या राजकारणात आपले स्थान मजबूत केले आहे. निवडून आल्यानंतरही महाले यांनी बोंद्रे यांच्या अनुराधा कॉलेज संदर्भातील जमिनीच्या व्यवहारांवरून आरोप केले होते. त्यावरून बोंद्रे यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला होता.
एकदा बोंद्रे विधिमंडळ आवारात दिसताच महालेंचा पारा चढला होता. त्यांनी थेट विधानसभा अध्यक्षांकडे 'एक गुन्हेगार' विधिमंडळ आवारात फिरतो, अशी तक्रार केली होती. याच मतभेदांमुळे बोंद्रेंच्या भाजपप्रवेशाला महाले दाम्पत्याचा विरोध होता. श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव आहेत. त्यामुळे महाले दाम्पत्याने सगळी ताकद वापरून बोंद्रे यांचा भाजपप्रवेश थांबवला होता.
मात्र शैक्षणिक, सहकारी संस्थांना राजकीय वरदहस्त आणि शासकीय अभय मिळावे यासाठी बोंद्रे यांनी भाजप प्रवेशासाठी हालचाली वाढवल्या होत्या. यासाठी त्यांनी पुन्हा अहिल्यानगरमधील त्या संस्थानिक नेत्याला मध्यस्थी करण्याची विनंती केली. त्यानुसार या नेत्याच्या माध्यमातून बोंद्रे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या.
महाले दाम्पत्याचा विरोध कमी करण्यासाठी बोंद्रे यांच्याकडून राजकीय संन्यास घेण्याचा शब्द घेण्यात आला. भविष्यात मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये एखादा नवीन मतदारसंघ तयार झाल्यात तिथे बोंद्रे यांना अॅडजस्ट करता येईल. पण सध्यातरी त्यांनी चिखलीत कुठच्याही पद्धतीने राजकीय लक्ष घालायचे नाही, त्यांनी राजकीय निवृत्तीच घ्यायची अशी गळ घालण्यात आली. याच शब्दावर महाले दाम्पत्याने बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशासाठी ग्रीन सिग्नल दाखवला.
पण आता राहुल गांधी यांच्या एका फोननंतर सगळेच राजकीय चित्र बदलले आहे. गांधी यांनी फोन करून समजूत काढल्यानंतर बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना तुर्तास पूर्णविराम मिळाला आहे. दोन टर्मचे माजी आमदार, १२ वर्षे जिल्हा काँग्रेसचे नेतृत्व, शिक्षण-सहकार क्षेत्रातील मोठे संस्थात्मक जाळे आणि बुलढाणा जिल्ह्यातील दीर्घ राजकीय अनुभव या सगळ्यामुळे बोंद्रे यांचे काँग्रेसमध्ये थांबणे स्थानिक पातळीवर महत्त्वाचे ठरू शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.