Rahul Bondre Family : राहुल गांधींनी भाजप प्रवेश थांबवलेल्या बोंद्रे कुटुंबाचा सगळा इतिहास...

राहुल बोंद्रे यांनी काँग्रेससोबत राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर बोंद्रे कुटुंबाच्या राजकीय वारशाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. चिखलीच्या राजकारणातील कुटुंबाची परंपरा आणि योगदान जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.
Rahul Bondre Family Legacy | Chikhli Political History
Rahul Bondre Family Legacy | Chikhli Political HistorySarkarnama
Published on
Updated on

Rahul Bondre News : भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर झाला... मुंबईत प्रवेशाची तारीखही ठरली... पक्षप्रवेशाच्या काही तास आधी काँग्रेसचे नेते राहुल गांधींचा फोन आला आणि राजकीय चित्रच बदललं. चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय मागे घेत काँग्रेससोबतच राहण्याची आणि लढण्याची भूमिका स्पष्ट केली आहे.

मात्र राहुल बोंद्रे यांची ही राजकीय कहाणी केवळ एका थांबवलेल्या पक्षप्रवेशाच्या चर्चेपुरती मर्यादित नाही. चिखलीच्या राजकारणात जवळपास पाच दशकांचा प्रवास, दोन वेळा आमदारकी, दीर्घकाळ जिल्हा काँग्रेसचे नेतृत्व आणि शिक्षण-सहकार क्षेत्रातील मोठे संस्थात्मक जाळे यामुळे बोंद्रे हे बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणातील महत्त्वाचे नाव राहिले आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी बोंद्रेंना काँग्रेसमध्येच थांबवण्यासाठी थेट संवाद का साधला, हा प्रश्न चर्चेत आहे. त्याचे उत्तर शोधताना बोंद्रे कुटुंबाचा राजकीय आणि सामाजिक इतिहास समजून घेणे महत्त्वाचे ठरते.

पंढरीनाथ पाटलांचा सहवास; तात्यासाहेबांचा राजकीय वारसा

बोंद्रे कुटुंब मूळचे कर्नाटकातील असल्याचे सांगितले जाते. पण गेल्या चार-पाच पिढ्यांपासून हे कुटुंब चिखली परिसराशी जोडले गेले आहे. राहुल बोंद्रे यांच्या राजकीय प्रवासामागे त्यांचे वडील सिद्धिविनायक उर्फ तात्यासाहेब बोंद्रे यांचा मोठा प्रभाव राहिला. तात्यासाहेब हे पंढरीनाथ पाटलांचे पट्टशिष्य. पंढरीनाथ पाटील म्हणजे क्रांतीज्योती महात्मा फुलेंचे आद्यचरित्रकार आणि दलितमित्र अशी ओळख. तात्यासाहेब श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे आजीवन सदस्य होते, त्यांनी या संस्थेसाठी त्याकाळी चिखलीत जवळपास १५ एकर जमीन दान दिली.

आणीबाणीच्या काळातील ‘त्या' यादीची चर्चा

बोंद्रे कुटुंबाच्या इतिहासात आणीबाणीचा काळ हा एक वेगळा आणि वादग्रस्त अध्याय म्हणून सांगितला जातो. शिवाजी शिक्षण संस्थेच्या परिसरात बसून पंढरीनाथ पाटील आणि तात्यासाहेब बोंद्रे यांनी चिखलीतील आरएसएस स्वयंसेवकांची यादी तयार केल्याचा दावा केला जातो. याच यादीच्या आधारे काही स्वयंसेवकांना मध्यरात्री ताब्यात घेऊन MISA अंतर्गत तुरुंगात डांबण्यात आल्याचे सांगितले जाते. यावरून त्या काळातील चिखलीतील राजकीय संघर्षाची तीव्रता अधोरेखित होते.

पिढ्यान्‌पिढ्यांची राजकीय-सामाजिक मुळे

या कुटुंबाकडे पूर्वी मोठ्या प्रमाणात जमीनजुमला असल्याचेही स्थानिक पातळीवर सांगितले जाते. त्यामुळे राजकारणासोबतच सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातही या घराण्याचा प्रभाव निर्माण झाला. १९७०च्या दशकात तात्यासाहेब बोंद्रे थेट जनतेतून चिखलीचे नगराध्यक्ष झाले. त्यानंतर पुढच्या पिढीने राजकारणाची सूत्रे हाती घेतली.

राहुल बोंद्रे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात चिखली नगरपालिकेतून केली. उपलब्ध वृत्तांनुसार, २०००-०१च्या काळात ते थेट जनतेतून नगराध्यक्ष झाले. नगराध्यक्ष म्हणून शहर विकासाच्या विविध संकल्पनांवर त्यांनी काम केले. याच काळात त्यांच्या नावातील बदलाचाही उल्लेख केला जातो. महाविद्यालयीन शिक्षणानंतरच्या काळात ‘राजेश’ हे नाव बदलून ‘राहुल’ करण्यात आले.

Rahul Bondre Family Legacy | Chikhli Political History
Rahul Bondre News : राहुल गांधींनी मातब्बर नेत्यांनाही कधी थांबवलं नाही; मग 2 टर्म आमदार राहिलेल्या बोंद्रेंसाठी थेट फोन का? वाचा Inside Story

२००४मध्ये पहिल्यांदा विधानसभेच्या मैदानात उतरले. मात्र अटीतटीच्या लढतीत त्यांना केवळ हजार मतांनी पराभव पत्करावा लागला. २००९ला त्यांनी भाजपाचे प्रकाश जवंजाळ यांचा दारुण पराभव करत ते पहिल्यांदा आमदार झाले. २०१४ला बोंद्रे यांनी भाजपाचे सुरेश खबुतरे यांचा पराभव केला. यात राष्ट्रवादीचे धृपतराव सावळे यांची त्यांना मोठी मदत झाली. तिहेरी लढतीत त्यांना दुसऱ्यांदा आमदारकीची लॉटरी लागली.

मात्र २०१९ आणि २०२४च्या विधानसभा निवडणुकांत त्यांचा पराभव झाला. दोन्ही निवडणुकांत भाजपच्या श्वेता महाले विजयी झाल्या. राहुल बोंद्रे यांची ताकद केवळ आमदारकीपुरती राहिली नाही. त्यांनी तब्बल १२ वर्षे बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद सांभाळले. या काळात जिल्ह्यात काँग्रेसची संघटनात्मक बांधणी करताना त्यांनी स्वतःचा राजकीय प्रभावही वाढवला.

आमदारकी गेली, पण संस्थांचं साम्राज्य वाढत गेलं

राहुल बोंद्रे यांची दुसरी मोठी ताकद म्हणजे शिक्षण, सहकार आणि बँकिंग क्षेत्रातील संस्थात्मक विस्तार. तात्यासाहेब बोंद्रेंच्या दूरदृष्टी आणि चिकाटीमुळे परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्था विस्तारत गेली. अनुराधा परिवारही मोठा झाला. आज अनुराधा शैक्षणिक संस्थेचा कॅम्पस २०० एकरांचा आहे. इंजिनिअरींग कॉलेजच्या ६ ब्रँचेस असून आता ऑटोनॉमस स्टेटस मिळाले आहे. नुकतीच त्यांना अजून एक ब्रँच मिळाली आहे. फार्मसीचे ४ कॉलेजेस आहेत. अनुराधा इंग्लिश मिडीयम स्कूल आहे. अनुराधा अर्बन बँकेच्या ३ शाखा असून हिरकणी महिला अर्बन पतसंस्थेच्या २० शाखा आहेत. मुंगसाजी महाराज सुतगिरणी आहे. याशिवाय जालना भागात रंगनाथ महाराज शिक्षण संस्था राहुल बोंद्रेंच्या ताब्यात आहे. जोडीली मंदीराचा ५०० ते ७०० एकर जमीनीचा परिसर आहे. बीएस्सी. अ‍ॅग्रीकल्चर कॉलेज आहे.

इतक्या सर्व शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून बोंद्रे यांचा १० ते १५ हजारांचा परिवार आहे. यामुळे त्यांचा प्रभाव राजकारणाबाहेरही विस्तारला. कर्मचारी, विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबांमुळे बोंद्रे परिवाराशी जोडलेला सामाजिक परीघ मोठा असल्याचा दावा केला जातो. म्हणूनच राहुल बोंद्रे यांचा राजकीय प्रभाव मोजताना केवळ त्यांनी किती वेळा आमदारकी जिंकली, एवढ्यावर गणित थांबत नाही. शिक्षण, सहकार, बँकिंग आणि संस्थात्मक नेटवर्क ही त्यांची स्वतंत्र ताकद मानली जाते.

Rahul Bondre Family Legacy | Chikhli Political History
BJP News: कॅबिनेट मंत्री अन् भाजप नेत्याचं स्वपक्षीय महिला नगरसेविकेविषयी भरकार्यक्रमातच वादग्रस्त विधान; व्हिडीओ व्हायरल

मुकुल वासनिक नेतृत्व, सपकाळ जवळचे मित्र

काँग्रेसमधील त्यांच्या राजकीय संबंधांमध्ये मुकुल वासनिक आणि हर्षवर्धन सपकाळ ही दोन नावे महत्त्वाची ठरतात. मुकुल वासनिक यांना ते नेतृत्व मानत असल्याचे बोंद्रे यांच्या राजकीय वर्तुळात सांगितले जाते, तर हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी त्यांची जवळची मैत्री असल्याचेही समोर आले आहे. भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यानंतरही बोंद्रे यांनी या दोघांशी चर्चा केली होती. गेल्या काही वर्षांपासून राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती. सप्टेंबर २०२६मध्ये मात्र त्यांनी स्वतः २२ सप्टेंबरला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते.

पण राहुल गांधींचा बोंद्रेंना फोन झाला. त्यानंतर बोंद्रे यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय बदलला. त्यांनी काँग्रेससोबतच राहणार असल्याचे फेसबुक पोस्टमधून स्पष्ट केले. “मी सर्वस्व पणाला लावेन, पण तुमच्यासोबत लढाई लढेन,” अशा आशयाची भूमिका त्यांनी राहुल गांधींसोबतच्या संवादानंतर व्यक्त केली.

यानंतर त्यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेस कार्यकर्ते जमा झाले आणि घोषणाबाजी केली. त्यामुळे बोंद्रे यांचा पक्षबदल हा केवळ वैयक्तिक राजकीय निर्णय न राहता बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेसच्या राजकीय ताकदीशी जोडलेला विषय बनला.

तात्यासाहेब बोंद्रे यांच्या राजकीय-सामाजिक वारशापासून सुरू झालेला प्रवास, नगराध्यक्षपद, दोन वेळची आमदारकी, दीर्घकाळ जिल्हाध्यक्षपद आणि शिक्षण-सहकार क्षेत्रातील संस्थात्मक विस्तार या सगळ्या पार्श्वभूमीवर राहुल बोंद्रे यांनी आता काँग्रेसमध्येच राहण्याचा घेतलेला निर्णय पुढच्या राजकीय अध्यायाची दिशा काय ठरवतो, याकडे बुलढाणा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com