Congress News Sarkarnama
महाराष्ट्र

Congress Big Breaking News : काँग्रेसचे चारजण कोण फुटणार ? कुणाचा बाप, कुणाचा नवरा, टोपीवाला अन् नांदेडवाला; 'या' आमदाराचा मोठा दावा

Sachin Waghmare

Mumbai News : विधान परिषदेची निवडणूक शुक्रवारी होत आहे. 11 जागांसाठी 12 जण निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत मोठी चुरस पाहावयास मिळत आहे. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडे बाजार रंगणार असताना उद्या मतदानावेळी काँग्रेसची चार मते फुटण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या आमदारानेच या चौघांची नावे सांकेतिक पद्धतीने सांगत त्यांची पोलखोल केली आहे.

काँग्रेसमधून (Congress) फुटण्याची शक्यता असलेले तीन-चार लोकं आहेत. कुणाचा बाप राष्ट्रवादीत गेला आहे, कुणाचा नवरा राष्ट्रवादीत आहे, एक टोपीवाला कधी इकडे असतो तर कधी तिकडे असतो. तर एक नांदेडवालाही आहे. या चारही जणांचे काय करायचे याचा निर्णय गुरुवारी रात्री होईल, असे आमदार कैलास गोरंट्याल यांनी सांगितले.

विधान परिषदेच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाने कोणत्याही प्रकारचा दगाफटका होऊ नये म्हणून आपापल्या पक्षाचे आमदार मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवले आहेत. त्यातच काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल (Kailas Gorntyal) यांनी आपल्या पक्षाचे 4 मते फुटण्याची शक्यता असल्याचा खळबळजनक दावा केला. मते फुटली तरी पक्षाच्या उमेदवार प्रज्ञा सातव या जिंकून येतील, असा दावा त्यांनी केला.

निवडणुकीच्या पार्शवभूमीवर घोडेबाजार टाळण्यासाठी भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट या 4 पक्षांनी आपले आमदार वेगवेगळ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवले आहेत. हे सर्व पक्ष आमदारांवर लक्ष ठेवून आहेत.

दुसरीकडे महाविकास आघाडीतील (MVA) काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आपल्या आमदारांना कोणत्याही हॉटेलमध्ये एकत्र ठेवलेलं नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांना आपले आमदार क्रॉस व्होटींग करणार नाहीत, याची खात्री असेल, अशी चर्चा होती. पण काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी आपल्या पक्षाचे 4 मते फुटण्याची शक्यता असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.

आमच्याकडे तिकीट मागणाऱ्याची रांग लागली

येणारा दिवस काँग्रेसचा असणार आहे. त्यामुळे आम्ही शंभर टक्के निवडून येणार आहोत. काँग्रेस काय होती आणि काय झाली ते तुम्हाला माहिती आहे. काँग्रेसमध्ये लोकं तिकीट मागायला येत नव्हते. पण आता ताकदवान झाली आहे. त्यामुळे वातावरण बदलले आहे. आता आमच्याकडे तिकीट मागणाऱ्याची रांग लागली आहे, असा दावा आमदार गोरंट्याल यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT