Income tax raid  Sarkarnama
महाराष्ट्र

Retired Officer Raid : करोडोंची माया आणि किलोने सोनं-चांदी; एका निवृत्त अधिकाऱ्याच्या घरातील छाप्याची खळबळजनक इनसाईड स्टोरी!

Income tax raid retired government officer : निवृत्त अधिकाऱ्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात कोट्यवधींची रोकड आणि किलोने सोनं-चांदी सापडल्याने मोठी खळबळ उडाली. वाचा संपूर्ण इनसाईड स्टोरी.

Rashmi Mane

आंध्र प्रदेशात भ्रष्टाचाराविरोधात मोठी कारवाई करत अँटी करप्शन ब्युरोने (ACB) पंचायत राज विभागातील निवृत्त अधिकारी कल्लेपल्ली श्रीनिवास राव यांच्या घरांवर आणि संबंधित ठिकाणांवर छापे टाकले. या छाप्यांमधून तब्बल 50 कोटी रुपयांहून अधिकची बेहिशोबी मालमत्ता उघडकीस आली असून, ही रक्कम त्यांच्या अधिकृत उत्पन्नाच्या कित्येक पट अधिक असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

श्रीनिवास राव यांनी 1990 पासून पंचायत राज विभागात सेवा बजावली होती. 31 डिसेंबर 2025 रोजी ते विशाखापत्तनम येथून सुपरिंटेंडेंट इंजिनिअर पदावरून सेवानिवृत्त झाले. मात्र निवृत्तीनंतर काही दिवसांतच त्यांच्या विरोधात गंभीर आरोप समोर आले. मिळालेल्या विश्वासार्ह माहितीनुसार ACB ने एकाच वेळी विशाखापत्तनम, सलूरू आणि हैदराबाद येथे त्यांच्या तसेच कुटुंबीय आणि जवळच्या सहकाऱ्यांशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले.

ACB अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही कारवाई राज्यातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या जप्तींपैकी एक मानली जात आहे. छाप्यादरम्यान अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, मौल्यवान दागिने, जमिनींची कागदपत्रे आणि संशयास्पद दस्तावेज सापडले. तपासात तब्बल अडीच किलो सोने, 20 किलो चांदी, 61.87 लाख रुपये रोख आणि कोट्यवधी रुपयांच्या जमिनीचे दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल पुरावेही हस्तगत करण्यात आले असून, त्यांची सखोल तपासणी सुरू आहे.

या प्रकरणात ACB ने श्रीनिवास राव यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना अटक करून विशाखापत्तनम येथील विशेष ACB न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तसेच काही बँक लॉकर अद्याप उघडायचे असून, त्यातून आणखी मालमत्ता सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, आंध्र प्रदेशात महसूल, न्यायिक आणि अभियांत्रिकी विभागातील अधिकाऱ्यांवर ACB ची धडक कारवाई अधिक तीव्र झाली आहे. उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता आणि लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये सातत्याने मोठे खुलासे होत असून, सरकारचा भ्रष्टाचाराविरोधातील कठोर पवित्रा या कारवाईतून स्पष्टपणे दिसून येतो.

SCROLL FOR NEXT