atrocity on women in Aurangabad
atrocity on women in Aurangabad  sarkarnama
महाराष्ट्र

औरंगाबाद हादरले : दरोडेखोरांचा महिलांवर अत्याचार

सरकारनामा ब्यूरो

लोहगाव, पैठण : पैठण (Paithan) तालुक्यातील तोंडोळी शिवार मंगळवारी (ता.१९ ऑक्टोबर) रात्री साडे अकरा ते साडे बाराच्या सुमारास सात दरोडेखोरांच्या टोळीच्या अमानुष कृत्याने हादरून गेला. कोजागरीच्या शुभ्ररात्री इतर लोक दुधाचे प्याले रिचवत असताना या शिवारातील दोन अभागी महिलांवर दरोडेखोरांचा सामूहिक अत्याचार होत होता. दरोडेखोरांनी या शेतवस्तीवर आधी शस्त्राचा धाक दाखवत तीन सालगड्यांना मारहाण केली. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईलसह आदी ऐवज लंपास केला. याप्रकरणी बिडकीन पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरु होती.

आज बुधवारी (ता.२० ऑक्टोबर) दिवसभर या वस्तीवर पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. पोलिस अधीक्षकांसह इतर वरिष्ठ अधिकारी येथे ठाण मांडून होते.

याबाबत बिडकीन पोलिसांनी सांगितले की, औरंगाबाद शहरातील अभयकुमार मगर याच्या गाढेगाव पैठण रोडजवळ तोंडोळी शिवारातील गट नंबर ३१२ मधील शेतवस्तीवर मध्यप्रदेश राज्यातील शेंदवा भागातील मुकेश ताराचंद ब्राम्हणे (वय २५), हिरालाल नरसिंग कोठारे, (२७) राजू प्रेमा साळुंके (४५) यांचे तीन कुटुंब शेतीकामासाठी वास्तव्यास आहे. मंगळवारी (ता.१९) रात्री ही सर्व कुटुंबे झोपी गेली असतानाच रात्री साडेअकराच्या सुमारास अचानक सात ते आठ अज्ञात दरोडेखोर येथील शेतवस्तीवर आले. काही कळण्याच्या आत त्यांनी येथील तीन पुरूषांना शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी पुरुषांना दोरखंडाने बांधून टाकून चाकू तसेच कुर्हाडीचे धाक दाखवित रोख रक्कम व एक दुचाकी गाडी आणि सोन्याचे दागिने ही लुटून नेले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

घरातील नगदी रोख २० ते २५ हजार रुपये तसेच मोबाईल हिसकावून घेतले. याच ठिकाणी दरोडेखोरांनी मद्यप्राशन केले. त्यानंतर ते येथेच थांबले नाही तर त्यांनी नशेतच येथील दोन महिलांवर अत्याचार केला. या दोनपैकी एक महिला बाळंतीण तर दुसरी आठ महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेतील महिलांसह पुरुषांना औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरोडेखोरांच्या शोधासाठी विविध पथके रवाना करण्यात आल्याची माहिती बिडकीन पोलिसांनी दिली. यानंतर त्या दरोडेखोरांनी शेतवस्तीवरील सर्वांना घरात कोडून बाहेरून कडी लावून घेत घटनास्थळावरुन पोबारा केला. दरम्यान, दरोडेखोर येथून गेल्यानंतर पुरूषांनी खिडकीतून काही वस्तुच्या साह्याने कडी उघडून शेजारील संजय गुंजाळ व गस्तीवरील दोघांना फोनद्वारे घटनेची माहिती दिली. यानंतर गुंजाळ यांनी शेतमालकाला फोन करुन या घटनेची माहिती दिली. याबाबत बिडकीन पोलिसांना माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी तत्काळ सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी चौकशीनंतर दरोडेखोरांनी या महिलांवर अत्याचार झाल्याचे सांगितले. या घटनेनंतर पोलीस यंत्रणा हादरली.

जिल्हा पोलीस अधीक्षक निमित गोयल, उपविभागीय पोलीस आधिकारी डॉ. विशाल नेहूल, स्थानिक गुन्हे शाखा, श्वानपथक, बिडकीन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, बीट उपनिरीक्षक मोरे, प्रमुख सोमनाथ तांगडे, अमोल वसावे, पोलीस पाटील मीनाबाई तांबे, सरपंच संजय गरड, संजय गुंजाळ, उपजिल्हा प्रमुख बनसोडे आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

लोहगाव शिवारातही चोरी

सायंकाळी विशेष पोलीस महानिरीक्षक एस. के. मल्लिकार्जून प्रसन्ना यानी घटनास्थळी भेट देत जवळपास दीड किलोमीटर पायी जात आढावा घेतला. यावेळी पोलिसांच्या पाहणीत या घटनेतील दोन मोबाईल जवळपासच्या शेतात मिळून आल्याचे सुत्रांनी सांगितले.

दरम्यान, या दरोडेखोरांनी येथून जवळ असलेल्या लोहगाव शिवारातील नामदेव दारूटे, सिताबाई दारूटे यांना कुर्हाडीने जखमी केले तर, ताराबाई दादाभाऊ शिदे यांच्या गळ्यातील सोन्याचे मणी ओरबाडले. ढोके वस्तीवरून मोटारसायकलही नेल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. तसेच शेकटा रोडवरील शेतकरी तांबे यांच्या शेतातील पाण्याच्या हौदाजवळ मोबाईल, कुऱ्हाड, महिलांच्या बनावट सोन्याच्या वस्तू व दरोडेखोरांचे बदललेले कपडे पोलिसांनी हस्तगत केले आहे.

बल्ब फोडून केला अंधार...

-रात्री अकराच्या सुमारास आलेल्या या दरोडेखोरांनी शेतवस्तीवर घरात प्रवेश करण्यापूर्वी घरावर तुफान दगडफेक केली व घरासमोरील विजेचा बल्ब फोडून अंधार केला. यानंतर दरोडेखोरांनी घरातील लोकांना मारहाण केली. तोंडोळी या गावाजवळच ही शेतवस्ती आहे. गावाजवळ असणाऱ्या या शेतवस्तीवर एकाच ठिकाणी घरे नसून ठिकठिकाणी घरे करुन लोक राहतात. त्यामुळे लोकांचा एकमेकांशी संपर्क होत नसल्याचे चित्र या शेतवस्तीवर पाहायला मिळाले. घटना घडली ते घर ही येथे एकटेच असून दुसऱ्या घरापासून दूर अंतरावरच आहे. त्यामुळे रात्री अकराच्या सुमारास घडलेल्या क्रूर घटनेची माहिती तोंडोळी गावात सकाळी समजली व त्यानंतर बिडकीन पोलिस ठाण्यात घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधिकारी व पोलिस यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT