Dadar’s Marathi Dr Nitish Raut Becomes Mayor in Britain Sarkarnama
महाराष्ट्र

Dr Nitish Raut News: दादरचा मराठी डॉक्टर थेट ब्रिटनमध्ये महापौर; डॉ. नितीश राऊत यांनी घडवला इतिहास

Dadar’s Marathi Dr Nitish Raut Becomes Mayor in Britain: मुंबईच्या दादरमध्ये वाढलेले डॉ. नितीश राऊत ब्रिटनमधील ऐतिहासिक सटन कोल्डफिल्ड शहराचे महापौर बनले आहेत. मराठी माणसासाठी अभिमानाची आहे.

Mangesh Mahale

Marathi success story: मुंबईच्या दादरमधील एका मराठी मुलाने ब्रिटनमध्ये इतिहास घडवला आहे. दादरमध्ये वाढलेला, मुंबईत वैद्यकीय शिक्षण घेतलेला आणि समाजसेवेचे संस्कार जपणारे डॉ. नितीश राऊत आज ब्रिटनमधील ऐतिहासिक ‘रॉयल टाऊन ऑफ सटन कोल्डफिल्ड’चे महापौर बनले आहेत. सातासमुद्रापार मराठी माणसाचा झेंडा पुन्हा एकदा अभिमानाने फडकला आहे.

आता महापौरपदी निवड झाल्यानंतर डॉ. नितीश राऊत यांनी आणखी एक इतिहास घडवला आहे. ते ‘सटन कोल्डफिल्ड’चे पहिले भारतीय वंशाचे महापौर, वेस्ट मिडलँड्स भागातील पहिले हिंदू महापौर आणि ब्रिटनमधील पहिले मराठी महापौर मानले जात आहेत. एका मराठी माणसाने परदेशात जाऊन केवळ स्वतःची प्रगती केली नाही, तर स्थानिक समाजात मिसळून नेतृत्वाची नवी ओळख निर्माण केली आहे.

ऐतिहासिक शहराचे नेतृत्व मराठी डॉक्टरकडे

ब्रिटनमधील बर्मिंगहॅमजवळ वसलेल्या ‘रॉयल टाऊन ऑफ सटन कोल्डफिल्ड’ या ऐतिहासिक शहराच्या महापौरपदी डॉ. नितीश राऊत यांची २०२६-२७ वर्षासाठी निवड झाली आहे. या शहराला तब्बल पाचशे वर्षांपूर्वी, १५२८ मध्ये इंग्लंडचे राजे हेन्री आठवे यांनी ‘रॉयल टाउन’चा दर्जा बहाल केला होता. ब्रिटनमध्ये मोजक्याच शहरांना हा विशेष सन्मान मिळालेला आहे. अशा प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक शहराचे नेतृत्व आता एका मराठी डॉक्टरकडे आले आहे, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

जे. जे. मेडिकल कॉलेज

डॉ. नितीश राऊत हे मूळचे मुंबईतील दादर पश्चिम येथील रहिवासी. त्यांचे बालपण अगदी सामान्य मराठी कुटुंबात गेले. किंग जॉर्ज शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले. अभ्यासात हुशार असलेल्या नितीश यांनी डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी अथक मेहनत घेतली. १९९४ मध्ये त्यांनी मुंबईतील प्रतिष्ठित जे. जे. मेडिकल कॉलेजमध्ये ‘एमबीबीएस’साठी प्रवेश घेतला. वैद्यकीय शिक्षण पूर्ण करतानाच त्यांनी केवळ स्वतःच्या करिअरचा विचार केला नाही, तर समाजासाठी काहीतरी करण्याची भावना कायम जपली.

वेगळी ओळख

डॉक्टर झाल्यानंतर त्यांनी ग्रामीण भागात जाऊन रुग्णसेवा केली. गावागावांतील लोकांच्या समस्या, आरोग्य व्यवस्थेतील अडचणी आणि सामान्य माणसाचे आयुष्य जवळून अनुभवताना समाजसेवेची भावना अधिकच दृढ झाली. पुढे त्यांनी ‘एमडी’चे शिक्षण पूर्ण केले आणि शीव मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणूनही काम केले. शिक्षण, शिस्त आणि समाजासाठी काम करण्याची वृत्ती यामुळे त्यांची ओळख वेगळी निर्माण झाली.

समाजाशी नाळ

२००५ मध्ये त्यांनी पुढील शिक्षणासाठी ब्रिटन गाठले. अनेक जण परदेशात गेल्यानंतर केवळ स्वतःच्या करिअरपुरते मर्यादित राहतात; मात्र डॉ. राऊत यांनी तिथेही समाजाशी नाळ जोडून ठेवली. प्रसूतीशास्त्रातील उच्च शिक्षण घेत असताना त्यांनी ब्रिटनमधील आरोग्य सेवा, स्थानिक प्रशासन आणि समाजकारण यांचा जवळून अभ्यास केला.

राजकारणात सक्रिय

आज ते ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेत सल्लागार स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. हजारो महिलांवर उपचार करताना त्यांनी डॉक्टर म्हणून विश्वास कमावला. मात्र त्यांचा प्रवास केवळ वैद्यकीय क्षेत्रापुरता मर्यादित राहिला नाही. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांवर काम करत राजकारणातही सक्रिय सहभाग घेतला.

स्थानिक ग्रंथालय

सटन कोल्डफिल्ड परिसरातील अनेक सामाजिक आणि विकासकामांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला. आर्थिक अडचणींमुळे बंद होण्याच्या मार्गावर असलेले ‘मीअर ग्रीन कम्युनिटी सेंटर’ आणि स्थानिक ग्रंथालय वाचवण्यासाठी त्यांनी सहकाऱ्यांसोबत मोठा संघर्ष केला. परिसरातील इतर ग्रंथालये टिकवण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. नागरिकांसाठी सार्वजनिक सुविधा टिकून राहाव्यात, यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

पर्यावरण संवर्धन

शहराच्या मुख्य बाजारपेठेच्या पुनर्विकासासाठी जवळपास दोन कोटी पौंडांच्या गुंतवणुकीच्या योजनेलाही त्यांनी पाठिंबा दिला. विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखण्यावर त्यांचा भर राहिला. ‘ग्रीन बेल्ट’ जमिनीवर प्रस्तावित गृहनिर्माण प्रकल्पांना स्थानिक नागरिकांसोबत त्यांनी विरोध केला. पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली. शहरातील प्रसिद्ध ‘सटन पार्क’च्या संवर्धन आणि व्यवस्थापनासाठी स्थानिक सहभाग वाढवण्याचे प्रयत्नही त्यांनी केले.

तिसऱ्यांदा नगरसेवक

लोकांमध्ये राहून केलेल्या कामामुळे त्यांना नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत गेला. ते सलग तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. विशेष म्हणजे, प्रत्येक निवडणुकीत त्यांचे मताधिक्य वाढत गेले. यावरून स्थानिक नागरिकांचा त्यांच्यावर असलेला विश्वास दिसून येतो.

यशाचे गमक काय?

“शिक्षण, कुटुंब मूल्यव्यवस्था, शिस्त आणि समाजसेवेच्या संस्काराने माझी सार्वजनिक जीवनाची जडणघडण झाली,” असे डॉ. राऊत सांगतात. नागरिकांशी सतत संवाद ठेवणे, त्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेणे हेच आपल्या यशाचे गमक असल्याचे ते नमूद करतात.

प्रेरणादायी प्रवास

दादरच्या मराठी संस्कारांत वाढलेला मुलगा आज ब्रिटनच्या ऐतिहासिक शहराचा महापौर झाला आहे. हा प्रवास केवळ एका व्यक्तीचा नाही, तर मराठी माणसाच्या कर्तृत्वाचा, जिद्दीचा आणि मेहनतीचा प्रेरणादायी प्रवास आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेला तरी मराठी माणूस आपली वेगळी छाप सोडू शकतो, हे डॉ. नितीश राऊत यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT