Maharashtra Education News : नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या तोंडावर राज्य सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ओबीसी समाजासाठीच्या आठ शैक्षणिक सवलतींच्या योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही लागू करण्यात आल्या आहेत. एवढेच नाही तर यापुढील काळात ओबीसींसाठी सुरू करण्यात येणाऱ्या शैक्षणिक सवलतींच्या योजना आपोआप मराठा समाजालाही लागू होणार आहे.
महाराष्ट्र सरकारने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. या शासन निर्णयामध्ये ओबीसींच्या आठ शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधा देणाऱ्या योजनांचा उल्लेख करण्यात आला आहे. या सर्व योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही लागू होतील. संबंधित विभागांनी त्याची अंमलबजावणी करावी, असे आदेश सरकारने दिले आहे.
या आहेत शासन निर्णयातील आठ योजना -
१. राज्यातील इतर मागास वर्ग प्रवर्गास लागू असलेली "शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना" मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील लागू करण्यात यावी.
२. इतर मागास वर्ग प्रवर्गातील उमेदवारांसाठी लागू असलेली मोटार वाहन चालक व वाहक प्रशिक्षण योजना, नियोजन विभागाने सारथी संस्थेमार्फत राबविण्यात यावी.
३. इतर मागास वर्ग प्रवर्गातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना लागू असलेली शिष्यवृत्ती योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील लागू करण्यात यावी.
४. इतर मागास वर्ग प्रवर्गातील उमेदवारांना लागू असलेली शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थामधील पीपीपी योजनेंतर्गत उपलब्ध जागांवर तसेच खाजगी औदयोगिक प्रशिक्षण संस्थामध्ये प्रवेश घेतलेल्या उमेदवारांसाठीची योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विकास विभागाने राबवावी.
५. अनुदानित व विना अनुदानित महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या इतर मागास वर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लागू असलेल्या इतर १६ बाबींबाबतची प्रतिपूर्ती करण्याबाबतची योजना, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील लागू करण्याबाबतची कार्यवाही संबंधित विभागाने करावी.
६. राज्यातील रहिवासी असणारे व परराज्यात अनुदानित व विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या इतर मागास वर्ग प्रवर्गातील उमेदवारांसाठी लागू असलेली योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील लागू करबाबतची कार्यवाही संबंधित विभागाने करावी. ७. इतर मागास वर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती व सोयी सुविधा मिळण्यासाठी पात्र असलेल्या सर्व अभ्यासक्रमांसाठी, मराठा समाजातील विद्यार्थी देखील या शैक्षणिक सवलती व सोयी सुविधा मिळण्यासाठी पात्र असतील.
८. विद्यार्थ्यांनी केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया (CAP) पूर्ण झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश नियंत्रण समितीने मान्यता दिलेल्या संस्थास्तरावर प्रवेश घेतलेल्या इतर मागास वर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील शैक्षणिक सवलती लागू करण्यात याव्यात.
नव्या योजना आपोआप लागू होणार
शासन निर्णयात नमूद करण्यात आलेल्या योजनांव्यतिरिक्त ज्या शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधा इतर मागास प्रवर्गास लागू करण्यात आल्या असतील अथवा भविष्यात लागू करण्यात येतील, त्या सर्व शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधा पुढील आदेशापर्यंत मराठा समाजास आपोआप लागू होतील, असे सरकारने स्पष्ट केले आहे. या तरतूदी चालू शैक्षणिक वर्षापासून (२०२६-२७) लागू होतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.