Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची लगीनघाई सध्या सुरु आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. निवडणूकांची घोषणा दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे. राज्यातील 29 महानगरपालिका 277 नगरपालिका 26 जिल्हा परिषदा आणि 289 पंचायत समितीच्या निवडणुका न्यायालयाने निर्धारित केलेल्या मुदतीत पार पाडणे बंधनकारक आहे. त्यामुळे स्थानिकच्या निवडणुका 31 जानेवारीपूर्वी होणार आहेत. त्यासाठी प्रशासनाकडून तयारी केली जात आहे.
त्यातच आता महायुतीच्या फॉर्म्युल्याबाबत सीएम फडणवीसांनी प्रसार माध्यमाशी बोलताना मोठे विधान केले आहे. 'मुंबई महापालिकेत महायुतीमधील तीनही घटक पक्ष एकत्रित निवडणूक लढणार आहेत तर पुणे, पिंपरी-चिंचवड व ठाणे महापालिकेत मैत्रीपूर्ण लढती होतील,' असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका न्यायालयाच्या आदेशानुसार घेण्यात येतील. दिवाळीनंतर म्हणजे नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्याच्या कालावधीत या निवडणुका होतील, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप (BJP), शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुती म्हणून एकत्रित लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात शक्य असेल त्या ठिकाणी महायुती एकत्र निवडणूक लढवणार आहे. तर ज्या ठिकाणी महायुती करणे शक्य नाही अशा मतदारसंघांमध्ये मैत्रीपूर्ण लढती होतील, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. मुंबई महापालिकेत महायुती असणार आहे. तीन पक्ष याठिकाणी एकत्र लढणार आहेत. मात्र पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र लढणार आहे. तर या ठिकाणी अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार आहे.
ठाण्यात भाजप व अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार आहेत तर याठिकाणी एकनाथ शिंदे (Eknath shinde)यांची शिवसेना स्वतंत्रपणे लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नको असेल त्याठिकाणी महायुती केली तर आमचेच मतदार अन्य पक्षाकडे वळण्याची शक्यता गृहीत धरून काही महापालिकेत मैत्रीपूर्ण लढती लढण्याचा विचार भाजप करीत असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले
भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी फडणवीस यांच्या नावाची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरु आहे. त्याबाबत विचारणा केली असता त्यांनी हे वृत्त फेटाळून लावले. मी या पदाच्या शर्यतीत नसल्याचे त्यांनी सांगितले. 2029 पर्यंत मी राज्यातच काम करणार आहे. पक्षाची तशीच इच्छा आहे. मी राज्याच्या विकासासाठीची योजना केंद्र सरकारकडे सादर केली आहे. त्यामुळे आगामी चार वर्षही येथेच राहणार असल्याचे स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.