Devendra Fadnavis, Abhimanyu Pawar  Sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : फडणवीसांनी शपथ घेताच 'लाडका' आमदार फेडणार नवस; तुळजापूरची पायी वारी करणार

Abhimanyu Pawar Tuljabhavani Navas : देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, असे साकडे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेला घातले होते. त्यानुसार आता इच्छापूर्ण झाल्याने त्यांचे लाडके आमदार नवस फेडणार आहेत.

Sachin Waghmare

Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले असल्याने भाजपमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गुरुवारी आझाद मैदानावर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. हा दिवस भाजपमधील नेतेमंडळीच्या दृष्टीने सोनियाचा दिवस आहे.

गेल्या पाच वर्षांपासून भाजप नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आमदार, खासदार ज्या क्षणाची वाट पाहत होते, ज्या दिवसाकडे डोळे लावून बसले होते, अखेर तो क्षण आला, तो दिवस उजाडला आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. त्यातच देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, असे साकडे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेला घातले होते. त्यानुसार आता इच्छापूर्ण झाल्याने त्यांचे लाडके आमदार नवस फेडणार आहेत.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व्हावेत, असा नवस केला होता. त्यानुसार, इच्छापूर्ती झाल्याने आता औसा येथील भाजपचे आमदार अभिमन्यू पवार लवकरच नवस फेडणार आहेत. आमदार पवार हे औसा ते तुळजापूर असा पायी प्रवास करत तुळजाभवानी मातेचे दर्शन घेणार आहेत.

औसा मतदारसंघातील भाजपचे आमदार अभिमन्यू पवार हे 2014 ते 2019 या काळात देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक होते. फडणवीस यांचे सहकारी म्हणून काम करीत असल्याने त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत औसा मतदारसंघातून अभिमन्यू पवार यांना भाजपकडून उमेदवारी दिली होती.

पवार यांनी पहिल्यांदाच ही निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे आमदार बसवराज पाटील यांचा पराभव केला होता. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा अभिमन्यू पवार औसा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार दिनकर माने यांचा पराभव केला.

'राज्याचे मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस होऊ दे...' असा नवस आमदार पवार यांनी बोलला होता. त्यांनी बोललेला तो नवस पूर्ण झाला आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या दृष्टीने आज सोनियाचा दिन आहे. या दिवसाची प्रतीक्षा आम्ही पाच वर्षापासून करत होतो.

देवेंद्र फडणवीस यांचे सहकारी म्हणून मी 25 वर्ष काम केले, या काळात नेता, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता अशा विविध रोलमध्ये देवेंद्र फडणवीस यांना मी बघितले आहे. देवेंद्र फडणवीस अस्सल 24 कॅरेट सोनं आहे, त्यांनी या काळात खूप संयम ठेवला, खूप काही सहन केले. त्यामुळे खचून न जाता त्यांनी हे यश मिळवले, अशा शब्दांत अभिमन्यू पवार यांनी त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.

मी तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेला साकडे घातले होते. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होऊ दे... आता तो नवस पूर्ण झाला आहे, आणि तो नवस फेडण्यासाठी मी औसा ते तुळजापूर पायी चालत जाणार आहे, असेही आमदार पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT