राजस्थानमधील कोटा येथे झालेल्या भीषण रस्ते अपघाताने धुळे जिल्ह्यातील अमराळे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. खाटू श्यामच्या दर्शनासाठी गेलेल्या पवार कुटुंबातील 9 जणांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. देवदर्शन करून घरी परतण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या कुटुंबाचा प्रवास मात्र काळाने अर्ध्यावरच संपवला. एकाच कुटुंबातील 9 जणांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्याने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे.
शिंदखेडा तालुक्यातील अमराळे गावातील पवार कुटुंबीय खाटू श्यामच्या दर्शनासाठी राजस्थानला गेले होते. मात्र, कोटा येथे त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत कुटुंबातील 9 जणांना जीव गमवावा लागला. काही दिवसांपूर्वी ज्या घरात देवदर्शनाच्या आनंदाचे वातावरण होते, त्याच घरात आता दुःखाचा आक्रोश सुरू आहे.
अपघातातील मृतांचे पार्थिव अमराळे गावात दाखल होताच नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. आपल्या जवळच्या माणसांना एकाच वेळी निरोप देण्याची वेळ आल्याने कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. गावातील वातावरणही अत्यंत भावुक झाले होते. एकाच कुटुंबातील 9 जणांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या हृदयद्रावक प्रसंगाने उपस्थित ग्रामस्थ आणि नातेवाईकही गहिवरून गेले.
दरम्यान, धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी अमराळे गावात जाऊन पवार कुटुंबीयांची भेट घेतली. या दुःखद प्रसंगी त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही दिली.
या दुर्घटनेतून बचावलेल्या पवार कुटुंबातील 10 वर्षीय चिमुरड्याच्या भवितव्याचा प्रश्नही यानिमित्ताने समोर आला आहे. या मुलाच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारणार असल्याची घोषणा पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.