Prithviraj Chavan : CM असताना साताऱ्याकडे दुर्लक्ष झालं; पृथ्वीराज चव्हाणांची कबुली : भाजपमध्ये गेलेल्या जयकुमार गोरे, रणजितसिंह नाईक निंबाळकरांवरही निशाणा

Prithviraj Chavan on Satara Congress : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यांनी मुख्यमंत्री असताना साताऱ्याकडे पुरेसे लक्ष देता आले नाही, अशी कबुली दिली. ते म्हणाले, "साताऱ्याच्या बाबतीत मी स्वतःला जबाबदार मानतो. कारण मी थेट दिल्लीतून महाराष्ट्रात आलो होतो. माझ्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली. पण मला साताऱ्याकडे लक्ष देता आले नाही."
Prithviraj Chavan
Prithviraj Chavan Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News, 23 Nov : काँग्रेसचा एकेकाळचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात पक्षाची मोठी पीछेहाट झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातही काँग्रेसची संघटनात्मक ताकद कमी झाली असून, अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाची साथ सोडली आहे. साताऱ्यात काँग्रेसची झालेली वाताहात ही माझीही जबाबदारी आहे. मुख्यमंत्री असताना सातारा जिल्ह्याकडे पुरेसे लक्ष देता आले नाही, अशी कबुली माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

विशेष म्हणजे काँग्रेसमध्ये असताना महत्त्वाची पदे देऊन ताकद वाढवलेल्या नेत्यांनीच भाजपमध्ये प्रवेश केल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. त्यांचा रोख प्रामुख्याने मंत्री जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे होता. पृथ्वीराज चव्हाण यांनी 'सकाळ' कार्यालयाला भेट देऊन संपादकीय विभागातील सहकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी साताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसची स्थिती, पक्षातून बाहेर पडलेले नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राजकारण आणि महाविकास आघाडीच्या स्थापनेमागील कारणांवर भाष्य केले.

साताऱ्यातील काँग्रेसच्या वाताहातीची जबाबदारी स्वीकारली

कोल्हापुरात सतेज पाटील आणि सांगलीत विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस संघटनात्मक पातळीवर प्रयत्न करत असताना साताऱ्यात पक्षाची वाताहात का झाली, असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांना विचारण्यात आला होता. त्यावर चव्हाण म्हणाले, "साताऱ्याच्या बाबतीत मी स्वतःला जबाबदार मानतो. कारण मी थेट दिल्लीतून महाराष्ट्रात आलो होतो. माझ्यावर महाराष्ट्राची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यापूर्वी मी महाराष्ट्रात काम केले नव्हते. त्यामुळे राज्यकारभार कसा करायचा, याची सुरुवातीला काळजी होती. या सगळ्यात मुख्यमंत्री असताना साताऱ्याकडे मला फार लक्ष देता आले नाही."

'ज्यांना ताकद दिली, ते चारही नेते भाजपमध्ये पळून गेले'

"मुख्यमंत्री असताना साताऱ्यातील माझ्या चार सहकाऱ्यांना महत्त्वाची पदे देऊन त्यांची ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आज हे चारही नेते भाजपमध्ये पळून गेले आहेत," अशी टीका चव्हाण यांनी केली. त्यांचा रोख प्रामुख्याने जयकुमार गोरे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे असल्याचे दिसून आले. मात्र, चव्हाण यांनी या दोघांची थेट नावे घेतली नाहीत.

Prithviraj Chavan
YS Sharmila : माजी मुख्यमंत्र्यांच्या बहिणीला वडिलोपार्जित घरात जाण्यापासून पोलिसांनी रोखलं, कौटुंबिक वाद चव्हाट्यावर!

पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसच्या स्थितीवरही चिंता

लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला असला तरी विधानसभा निवडणुकीत विश्वजित कदम यांचा अपवाद वगळता कोल्हापूर आणि सांगलीत काँग्रेसला विजय मिळवता आला नाही, असे त्यांनी नमूद केले. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसची स्थिती चिंताजनक असून, अनेक नेत्यांनी पक्ष सोडल्यामुळे संघटनात्मक ताकदीवर परिणाम झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

फडणवीसांकडून अपेक्षा होत्या; पण नंतर चित्र बदलले

"देवेंद्र फडणवीस २०१४ मध्ये मुख्यमंत्री झाले, तेव्हा आमच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. ते सुशिक्षित आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रभावाखाली काम करणार नाहीत, न्यायबुद्धीने निर्णय घेतील आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखे नेतृत्व करतील, असे आम्हाला वाटत होते. मात्र, नंतर ते इतके राजकारणी झाले की त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांना भाजपमध्ये घेतले," असे चव्हाण म्हणाले.

Prithviraj Chavan
Rahul Narwekar : संजय राऊतांना आरोप करणे महागात पडणार? राहुल नार्वेकर मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत, म्हणाले, 'काही तासांत...'

'काँग्रेस-राष्ट्रवादीचे दीडशे नेते फोडले'

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील जवळपास १५० नेत्यांना भाजपमध्ये घेण्यात आल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. या नेत्यांमध्ये माजी प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेते आणि सहकार क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. काही नेत्यांवर गुन्हे दाखल करण्याची किंवा सीबीआय चौकशीची भीती दाखवून त्यांना भाजपमध्ये प्रवेश करण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला.

महाविकास आघाडी का स्थापन केली?

२०१९ मध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठीच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांचे भाजपमध्ये होत असलेले पक्षांतर आणि तत्कालीन राजकीय परिस्थिती या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.