BJP leader Kunal Patil at the Jawahar Shetkari Sahakari Soot Girni in Dhule. Sarkarnama
महाराष्ट्र

BJP Politics : भाजप प्रवेश करताच तब्बल 156 कोटींचं कर्ज मंजूर; फडणवीस सरकारकडून दिग्गज नेत्याची मागणी तातडीने पूर्ण

Kunal Patil: धुळ्यातील जवाहर सहकारी सूतगिरणीसाठी १५६.९ कोटींच्या कर्जाची शिफारस राज्य शासनाने एनसीडीसीकडे केली आहे. भाजप नेते कुणाल पाटील यांच्या या सूतगिरणीच्या आधुनिकीकरणासाठी हा महत्त्वपूर्ण आर्थिक आधार ठरणार आहे.

Hrishikesh Nalagune

Kunal Patil BJP: माजी आमदार, भाजप नेते कुणाल पाटील यांच्या जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीसाठी तब्बल १५६ कोटी ९० लाख रुपयांचे कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य शासनाने राष्ट्रीय सहकार विकास निगमकडे या प्रस्तावाची शिफारस केली आहे. राष्ट्रीय सहकार निगमकडून रक्कम प्राप्त करून ती सूतगिरणीला देण्यात येणार आहे.

जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणी मागील 3 ते 4 वर्षांपासून बंद आहे. जवळपास 3 हजार कामगार या सूतगिरणीमध्ये काम करत होते. मात्र सूतगिरणी बंद पडल्याने या कामगारांवर उपासमारीची वेळ ओढावली आहे. त्यामुळे ही सुतगिरणी लवकरात लवकर सुरू करावी आणि कामगारांना रोजगार द्यावा अशी मागणी होती. आता या कर्जामुळे सुतगिरणीचे पुनरुज्जीवन होण्यास मदत मिळणार आहे.

राज्यातील सहकारी सूतगिरण्यांना त्यांच्या आधुनिकीकरण, विस्तारीकरण, पुनर्वसन व उभारणीसाठी आवश्यक असणारे अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने राष्ट्रीय सहकारी विकास निगमाच्या 15.03.2000 च्या परिपत्रकान्वये जाहीर केलेल्या योजनेनुसार सहकारी व वस्त्रोद्योग विभागाच्या 17.11.2000 रोजीच्या शासन निर्णयाद्वारा राज्यात योजना लागू करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत राष्ट्रीय सहकारी विकास निगमकडून रक्कम प्राप्त करून हे कर्ज दिले जाणार आहे. या शिफारशीला २७ जानेवारी रोजी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती. त्यानंतर बुधवारी (१८ फेब्रुवारी) याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला. कुणाल पाटील यांनी जुलै 2025 मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर लगेचच कर्ज प्रस्ताव मंजूर झाला आहे.

कोण आहेत कुणाल पाटील?

कुणाल पाटील हे काँग्रेसचे दिग्गज नेते दिवंगत रोहिदास पाटील यांचे पुत्र आहेत. रोहिदास पाटील हे काँग्रेसकडून माजी मंत्री आणि अनेक वर्ष आमदार राहिलेले आहेत. या घराण्याचे गांधी घराण्याशी अत्यंत निकटचे संबंध होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी पार पडलेल्या भारत जोडो यात्रेदरम्यान खुद्द काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली होती.

2024 ची विधानसभा निवडणूक कुणाल पाटील यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली, परंतु भाजपच्या राम भदाणे यांच्याकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. अखेर जुलै 2025 मध्ये कुणाल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हा पक्ष प्रवेश सुतगिरणीच्या कर्जासाठीच केला असल्याचे त्यावेळी दबक्या आवाजात बोलले गेले.

सूतगिरणीवर छापा :

दोन वर्षांपूर्वी याच जवाहर सूतगिरणीवर आयकर विभागाने छापा टाकला होता. सलग ३ दिवस सूतगिरणीमध्ये आणि कुणाल पाटील यांच्या कार्यालयामध्ये आयकर विभागाने तपास केला होता. त्यानंतर त्यावेळी पाटील यांनी “सूतगिरणीचे ऑडिट पूर्ण झाले असून त्यात कोणतीही अनियमितता नाही,” असे स्पष्ट केले होते. मात्र भाजप प्रवेशासाठीच ही छापेमारी झाल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT