Anil Bonde Vs Sanjay Gaikwad  Sarkarnama
महाराष्ट्र

BJP Vs Shivsena : 'त्या' जाहिरातीवरून युतीत वादाचा भडका! भाजप खासदार आणि शिवसेना आमदारानं एकमेकांची औकातच काढली...

Anil Bonde Vs Sanjay Gaikwad : '' बाळासाहेब ठाकरेंचे बोट पकडून आपण मोठे झाला आहात. नाहीतर...''

सरकारनामा ब्यूरो

Buldhana : शिवसेनेच्या एका जाहिरातीवरून युतीत जोरदार वादाची ठिणगी पडली. भाजपकडून या जाहिरातीवर तीव्र आक्षेप घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह शिंदे गटाच्या नेतेमंडळींनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, अद्यापही वादाची धग कमी होण्याचं नाव घेत नाहीये. भाजप खासदाराकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत खोचक टीका करतानाच बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होत नाही असा हल्लाबोल केला होता. या टीकेला शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जशास तसं उत्तर दिलं आहे.

'राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे' या जाहिरातीवरुन राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. या जाहिरातीवरुन भाजप व शिवसेनेत मिठाचा खडा पडला आहे. भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड(Sanjay Gaikwad) यांच्यात चांगलीच जुंपली आहे.

खासदार अनिल बोंडे यांनी शिवसेनेंवर निशाणा साधताना बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होत नाही असं म्हटलं होतं. तसंच ठाणे म्हणजेच महाराष्ट्र असं मुख्यमंत्र्यांना वाटत असल्याचंही बोचरी टीका बोंडे यांनी केली होती.कालच्या जाहिरातीनंतर भाजपकडून आलेल्या सर्वात आक्रमक विधान हे अनिल बोंडे यांनी केलं होतं. बोंडे यांच्या या टीकेला शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

संजय गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप खासदार अनिल बोंडे (Anil Bonde)यांच्या टीकेवर जोरदार पलटवार केला आहे. यावेळी गायकवाड म्हणाले, महाराष्ट्रात तुम्ही कोणाच्या संगतीने मोठे झालात याचा विचार करा. बाळासाहेब ठाकरेंचे बोट पकडून आपण मोठे झाला आहात. नाहीतर आपली काय औकात होते हे लक्षात ठेवलं पाहिजे अशा शब्दांत गायकवाड यांनी भाजपच्या मर्मावर बोट ठेवलं.

...50 वाघांमुळेच भाजपच्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान

तसेच मुख्यमंत्र्यांची वाहवा जर जनता करत असेल तर ते कटू सत्य पचविण्याची ताकद राजकीय नेत्यांनी ठेवावी. सुरुवातीला भाजप(BJP)चे दोनच खासदार होते, आज त्यांचे 300 च्यावर खासदार झाले आहेत. आमच्या नेत्याबद्दल अशी भाषा करत असतील तर वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घालावं, असं आवाहन संजय गायकवाड यांनी केलं आहे.

याचवेळी शिवसेना आणि एकनाथ शिंदे हे वाघ आहेत. आणि 50 वाघांमुळेच भाजपच्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान आहे असे खडेबोलही आमदार संजय गायकवाड यांनी भाजपला सुनावले आहे.

अनिल बोंडे नेमकं काय म्हणाले?

शिवसेनेच्या जाहिरातीवरुन भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक टीका केली होती. बोंडे म्हणाले, आधी उध्दव ठाकरेंना मुंबई म्हणजे पूर्ण महाराष्ट्र वाटत होता. आता एकनाथ शिंदे(Eknath Shinde)यांना ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र असल्याचं वाटत आहे असा टोला लगावला आहे. याचवेळी त्यांनी बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होत नाही हे लक्षात ठेवावं अशा शब्दांत बोडे यांनी शिंदेंना डिवचलं आहे.

फडणवीस एक असा चेहरा...

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. त्यांना भाजपसह अवघ्या महाराष्ट्राने त्यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारलं आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासाठी असा एक चेहरा आहे, जो बहुजनांसाठी काम करतो. ओबीसी, मराठा आरक्षण, धनगर, आदिवासी समाजासह दिव्यांग अशा सर्व घटकांना न्याय देण्याचं काम ते करत असल्याचं म्हणत बोंडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT