Shivsena Politics : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांची युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी महापालिका निवडणूक ठाकरे बंधुंच्या दृष्टिने अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये युती होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र, राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंसोबत युती करण्यापासून रोखण्याचे प्रयत्न एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून करण्यात येत असल्याची चर्चा आहे.
मंगळवारी मंत्री उदय सामंत यांनी अचानक राज ठाकरे यांची भेट घेतली. ठाकरे बंधुंची युतीची चर्चा सुरू असताना सामंत यांची ही भेट महत्वाची मानली जात आहे. राज यांनी उद्धव यांच्यासोबत जाऊ नये यासाठी केलेल्या प्रयत्नांचा हा एक भाग असल्याची चर्चा आहे. मात्र, ही भेट वैयक्तिक स्वरुपाची होती यामध्ये कुठलीच राजकीय चर्चा झाली नसल्याचे सामंत यांनी सांगितले.
आपण कामानिमित्त या भागात आले असताना राजसाहेब यांना फोन करून भेटण्याची विनंती केली. भेटीत चहा पिला, खिचडी खाल्ली आणि निघाले तुमच्या मनात ज्या राजकीय शंका आहेत त्याविषयी कसलीही चर्चा झाली नाही, असे सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन निवडणूक लढली तर त्याचा फटका महायुतीला बसण्याचा शक्यता आहे. त्यामुळे राज ठाकरे हे महायुतीसोबत आले नाही तरी चालेल पण त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत जाऊ नये, असे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांची भावना आहे. त्यामुळेच हवेतर आमच्यासोबत येऊ नका मात्र उद्धव यांच्यासोबत जाऊ नका यासाठी शिंदेंच्या शिवसेनेतून प्रयत्न केले जात असल्याची चर्चा आहे. या विषयी एका मराठी वृत्तपत्राने सुत्रांच्या हवाल्याने वृत्त देखील दिले आहे.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी बॅकफूटवर गेली आहे.त्यामुळे आता महायुतीमधील पक्षांमध्येच स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत स्पर्धा असल्याचे चित्र आहे. भाजपमध्ये होणाऱ्या इन्कमिंगमुळे स्थानिक स्वराज संस्था निवडणूक भाजप स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे. मुंबई महापालिकेमध्ये शिंदेसोबत युती करायची की नाही याबाबत अजुनही स्पष्टता नाही. मात्र, शेवटच्या क्षणी केवळ मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.