विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजपमधील मतभेद उघडपणे समोर आले आहेत. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता आपल्या पक्षातील मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
महायुतीमधील अंतर्गत वाद वाढणार नाहीत, याची काळजी घ्या आणि मित्रपक्षांवर जाहीरपणे टीका करणे टाळा, असे निर्देश त्यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीला 5 पैकी केवळ 2 जागा मिळाल्या, तर महाविकास आघाडीने 3 जागांवर विजय मिळवला.
या निकालानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. काही मतदारसंघांमध्ये मित्रपक्षांना अपेक्षित सहकार्य मिळाले नाही, तर काही ठिकाणी उमेदवारी आणि पाठिंब्यावरून मतभेद निर्माण झाल्याचे समोर आले. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत नाराजी चर्चेचा विषय ठरली आहे.
या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी पक्षातील नेत्यांना संयम बाळगण्यास सांगितले आहे. निवडणुकीत झालेल्या चुका आणि त्रुटींचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. महायुती म्हणून एकत्रितपणे काम केले पाहिजे. अंतर्गत मतभेदांचा फायदा विरोधकांना होऊ शकतो, त्यामुळे नेत्यांनी सार्वजनिक व्यासपीठावरून मित्रपक्षांवर टीका करू नये, अशी त्यांची भूमिका असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न लक्षात घेऊन राजकीय आरोप-प्रत्यारोपांपेक्षा मदतकार्याला प्राधान्य द्यावे, अशा सूचनाही शिंदे यांनी दिल्या आहेत. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवणे, सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणे आणि पंचनाम्यांच्या कामात सहकार्य करणे यावर कार्यकर्त्यांनी लक्ष केंद्रित करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.