Eknath Shinde And uddhav thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Shivsena UBT MPs Split : 'ठाकरेंचे शिल्लक खासदारही फुटणार!' शिंदेंच्या मंत्र्यांच्या दाव्याने नव्या चर्चांना उधाण; व्हीपवरूनही राजकारण तापलं

Uday Samant Claims On Thackeray Shivsena MPs Split : सध्या देशभरात डिलिमिटेशनच्या विधेयकावरून राजकीय हालचाली गतीमान झाल्या असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी मोठा दावा केला आहे.

Aslam Shanedivan

Maharashtra Politics : डिलिमिटेशन अर्थात मतदारसंघ पुनर्रचनेच्या विधेयकावरून देशातील राजकीय वातावरण तापले असून, संसदेत या विधेयकावर कोणती भूमिका घ्यायची, यावर विविध पक्षांमध्ये हालचाली सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्षांनी आपल्या खासदारांना व्हीप जारी केला आहे. शिवसेना ठाकरे गटानेही पक्षाच्या खासदारांसह फुटून गेलेल्या सहा खासदारांना व्हीप बजावल्याची चर्चा आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने या विधेयकाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. याच मुद्द्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटाला लक्ष्य करत उर्वरित खासदारही पक्ष सोडू शकतात, असा दावा केला आहे.

डिलिमिटेशन विधेयकावरून देशभरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या विधेयकाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्याच्या चर्चेवरून महाराष्ट्रातही राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवर टीका केली होती. विधेयकाला पाठिंबा न दिल्यास खासदार फुटतील, अशी भीती सुप्रिया सुळे यांना वाटत असल्याने राष्ट्रवादीने या विधेयकाला पाठिंबा दिल्याचा दावा राऊत यांनी केला होता.

राऊत यांच्या या वक्तव्याला उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'असं बोलता बोलता यांचेही शिल्लक असलेले खासदार फुटणार आहेत,' असा टोला सामंत यांनी लगावला. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना डिलिमिटेशन विधेयकाला ना विरोध आहे, ना पाठिंबा, असे म्हटले होते. त्यामुळे ठाकरे गटातील उर्वरित खासदार या विधेयकावर नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सामंत यांच्या वक्तव्यामुळे ठाकरे गटातील खासदारांच्या भूमिकेबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

मविआमध्ये समन्वयाचा अभाव होता

महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये सुरुवातीपासूनच समन्वयाचा अभाव असल्याचे आम्ही अनेकदा सांगितले आहे, असे उदय सामंत म्हणाले. आता दोन दिवसांनंतर विधेयक सभागृहात मांडले जाणार असून, प्रत्यक्ष कामकाजात काय घडते, याची उत्सुकता आहे. शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच विधेयकाला पाठिंबा जाहीर केला आहे. आमचे खासदारही विधेयकाच्या बाजूने मतदान करतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतील, असे सामंत यांनी स्पष्ट केले.

ठाकरे गटाकडून फुटलेल्या सहा खासदारांना व्हीप

डिलिमिटेशन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने पक्षातून बाहेर पडलेल्या सहा खासदारांनाही व्हीप जारी केल्याची चर्चा आहे. या खासदारांनी पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहून पक्षाच्या निर्देशांचे पालन न केल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, असे अॅड. असीम सरोदे यांनी सूचक विधान केले आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्टही शेअर केली आहे.

सरोदे यांनी आपल्या पोस्टमध्ये ठाकरे गटातून बाहेर पडलेल्या सहा खासदारांच्या कायदेशीर स्थितीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. शिवसेनेतून मशाल चिन्हावर निवडून आलेले सहा खासदार आर्थिक फायद्यासाठी शिंदे गटात सामील झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कोणतीही प्रक्रिया न पाळता या खासदारांना मान्यता दिली आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था केल्याचा दावाही सरोदे यांनी पोस्टमध्ये केला आहे.

पक्षाच्या व्हीपचे पालन न केल्यास अपात्रतेचा दावा

असीम सरोदे यांच्या मते, या सहा खासदारांविरोधात संविधानाच्या दहाव्या परिशिष्टातील परिच्छेद 2(1)(a) अंतर्गत पक्षविरोधी वर्तनाच्या आधारे अपात्रतेची प्रक्रिया सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी या खासदारांना पक्षातून काढलेले नसल्याने ते तांत्रिकदृष्ट्या अजूनही शिवसेनेचे सदस्य असल्याचा दावा सरोदे यांनी केला आहे.

त्यामुळे पक्षाचा व्हीप पाळणे या खासदारांसाठी बंधनकारक असल्याचे सरोदे यांनी म्हटले आहे. पक्षाच्या निर्देशानुसार वर्तन न केल्यास अपात्रतेची कारवाई होऊ शकते, असा दावा त्यांनी सोशल मीडिया पोस्टमधून केला आहे. डिलिमिटेशन विधेयकावरून सुरू असलेल्या राजकीय संघर्षात आता व्हीप, पक्षांतर आणि अपात्रतेच्या मुद्द्यांमुळे महाराष्ट्रातील राजकारणात आणखी रंगत येण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT