Uday Samant : शिवसेना नेत्याचा जयकुमार गोरेंना इशारा : ‘एवढं हिणवू नका; अन्यथा गोकुळ होतं, हे लक्षात ठेवा’

Pune Teachers' Constituency Election : शिवसेना पुरस्कृत सचिन सानप यांना कमी लेखू नका, असा इशारा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जयकुमार गोरे यांना दिला. 27 तारखेला त्यांची ओळख होईल, असे सांगत गोकुळच्या निकालाची आठवण करून दिली.
Uday Samant-Jaykumar Gore
Uday Samant-Jaykumar GoreSarkarnama
Published on: 
Updated on: 

Solapur, 19 October : सचिन सानप हे शिवसेना पुरस्कृत उमेदवार आहेत. त्यांना संविधानाने अधिकार दिला म्हणून ते निवडणुकीत उभारले आहेत, त्यामुळे ओळखत नाही, असे त्यांना हिणवू नये. सानप यांना कोण ओळखत नसतील तर येत्या 27 तारखेला ओळखतील. कोणाला कमी लेखू नका, काहीही होऊ शकतं. मी बोलेल तेच योग्य, असं म्हणणं चुकीचं आहे, नाही तर गोकुळ होतं, हे लक्षात ठेवा, असा इशारा शिवसेना नेते तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना लगावला आहे.

पुणे मतदारसंघातील अपक्ष उमेदवार, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ओएसडी राहिलेले सचिन सानप यांना शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. त्यांच्या प्रचारासाठी सामंत आज सोलापुरात आले होते. त्या वेळी त्यांनी जयकुमार गोरे यांना टोला लगावला.

पुणे शिक्षक मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत सुरु आहे. अतिशय चांगलं वातावरण सोलापूर जिल्ह्यात असून सचिन सानप मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा दावा सामंत यांनी केला. कोण पालकमंत्री? असा सवाल करत सामंत म्हणाले, आपले पालकमंत्री माझ्यापेक्षा फार मोठ्या उंचीचे नेते आहेत, त्यामुळे मी त्यांच्यावर जास्त बोलत नाही. येत्या २७ तारखेला निकाल आल्यानंतर सचिन सानप यांना ओळखतील.

शिक्षक उमेदवार आपण दिला आणि त्यालाच आपण पुरस्कृत केलं, तर शिक्षकांच्या मनातील इच्छा पूर्ण होईल, असं शिवसैनिक म्हणून माझं मत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी सानप यांना पाठिंबा दिला आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होणार हे अगोदरच ठरलं होतं. पुणे जिल्ह्यात 40 वर्षे उमेदवार नव्हता; म्हणून सचिन सानप यांना पाठिंबा दिला, असे सामंत यांनी स्पष्ट केले.

महायुती म्हणून आमचं पहिलं मत पदवीधर मतदासंघामध्ये स्मिता जाधव यांनाच आहे, त्यांना आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. मैत्रीपूर्ण लढत अगोदरच जाहीर असल्यामुळे शिवसेनेने सचिन सानप यांना पुरस्कृत केलेले आहे. त्यांना कोणी ओळखत नसेल तर 27 तारखेपासून महाराष्ट्र, सोलापूरचे पालकमंत्री ओळखतील, असा टोला उदय सामंत यांनी लगावला.

सामंत म्हणाले, सचिन सानप यांना ओळखत नाही, असं म्हणतात त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की, आपण मैत्रीपूर्ण लढत आहोत, ही भारत-पाकिस्तान लढत नाही. गोकुळ जिवंत उदाहरण आपल्यासमोर आहे. त्यामुळे जरा सबुरी आणि शांततेने घेतलं तर महायुती सगळीकडे जिंकू शकते, असं वातावरण आहे. पण, आपल्या अशाच काही गोष्टींमुळे मतदार आपल्याला कशा पद्धतीने वागवतात, हे चित्र गोकुळच्या निकालातून दिसून आलं आहे.

Uday Samant-Jaykumar Gore
Satej Patil Appeal : सतेज पाटलांची ‘ती’ भावनिक साद ठरली निवडणुकीचा टर्निंग पॉईंट : 2 मंत्री, 2 खासदार अन्‌ 10 आमदारांना दिला धोबीपछाड

शिक्षक बदला घेतील

पालकमंत्री जयकुमार गोरे यांना माझी विनंती आहे, कुठच्याही उमेदवाराला, विशेषतः गरीब कुटुंबातील उमेदवाराला गरीब आहे म्हणून, शिक्षक आहे म्हणून हिणवणं योग्य नाही. याचा बदला मताच्या माध्यमातून 100 टक्के शिक्षक घेतील. गोकुळ ही कोल्हापूर जिल्ह्यापुरती मर्यादित निवडणूक आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही 5 जिल्ह्यांची आहे. मी कधीही अतिआत्मविश्वासाने बोलत नाही. पण, या मतदारसंघात शिक्षक हे शिक्षक असलेले सचिन सानप यांना मतदान करतील.

शिक्षक भारतीचे कपिल पाटील यांनीही आम्हाला पाठिंबा दिला आहे. पुणे शिक्षकमधील महायुतीमधील बिघाडीचा फायदा इतर तिसऱ्या उमेदवाराला होणार नाही. पुणे शिक्षक मतदारसंघात सचिन सानप यांच्या विजयाची ही निवडणूक होईल, असा दावाही उद्योग मंत्र्यांनी केला.

ते म्हणाले, पुण्यात मैत्रीपूर्ण लढत आहे, वाद नाही. चंद्रकांत पाटील हे महायुतीचे नेते आहे, दुसऱ्यासारखं आम्ही ओळखत नाही, असे म्हणत नाही. त्यांनी भाजप कार्यकर्त्यांचे मनोबल उंचवावे, यासाठी सचिन सानप यांच्या पाठिंब्याबाबत भाष्य केले. पण आजच्या दौऱ्यात अनेकांनी सचिन सानप यांना पाठिंबा दिला आहे.

गोळीबार हा राजकीय भांडवलाचा विषय नाही

टायगर श्रॉफ यांच्यावरील गोळीबार हा प्रसंग राजकीय भांडवल करण्याचा नाही, तर सर्वजण एकत्र येऊन मार्ग काढण्याचा आहे. त्यांनी जर पत्रकार परिषद घेतली नाही तर तुम्हाला trp भेटणार नाही, असा त्यांचा गैरसमज आहे. पण, त्याचा परिणाम त्यांची संघटना वाढण्यात कधी झाला नाही.

तुम्हाला महाआघाडीनं बाजूला का ठेवलं?

सुषमा अंधारे माझ्या बहिणीसारख्या आहेत. मविआतील लोकांनी या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला का बाजूला ठेवलं, याचा विचार करावा. 7 नंबराचा त्यांचा ubt पक्ष 6 ला आणायचं असेल तर पुणे पदवीधर मतदार संघात मविआने का बाजूला ठेवलं, याचा विचार करावा, असा सल्लाही सामंत यांनी दिला.

ते म्हणाले, मित्रपक्षाच्या मंत्र्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की, या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर आपल्याला एकाच सरकारमध्ये काम करायचं आहे, त्यामुळे कोणाचीही मनं दुखावणार नाहीत, असा प्रचार केला तर सर्व व्यवस्थित राहिल.

पहिल्याच दिवशी मंगेश चिवटे यांना माहिती असूनही भाजप उमेदवाराच्या वयाबाबत आक्षेप घेतला नाही आणि आमचे उमेदवार सचिन सानप यांनीही आक्षेप घेतला नाही, ज्यांनी आक्षेप घेतला आहे, त्याचा निकाल कोर्ट देईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

Uday Samant-Jaykumar Gore
Sangli Politic's : सांगलीत पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार अरुण लाड यांची महायुतीच्या स्टेजवर हजेरी, भाजप प्रवेशाची चर्चा

पाच हजार रुपये हे दिवाळीसाठी अग्रीम रक्कम आहे. त्यानंतर केंद्र सरकारचे पॅकेज आहे. आमची तिजोरी खाली करावी लागली तरी चालेल. पण, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आम्ही कुठेही तडजोड करणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com