Aamravti News : राज्यातील पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघातील तर पुणे, नागपूर व मराठवाडा पदवीधरच्या तीन अशा एकूण पाच मतदारसंघासाठी 23 ऑक्टोबरला निवडणूक होत आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, यातील अनेक मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. त्याचा फटका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार व आमदार किरण सरनाईक यांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अत्यंत सावध आणि मोठे प्लॅनिंग केले आहे.
त्यामुळेच अमरावती शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट आल्याचे पाहावयास मिळत आहे. 'वंचित'च्या उमेदवारचा अर्ज बाद झाल्यानंतर त्यांच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंनी मोठा डाव टाकला असून त्यांच्या 'खास' दूतामार्फत प्रकाश आंबेडकरांशी संपर्क साधला असल्याचे समजते.
अमरावती शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये निर्माण झालेला अंतर्गत तणाव आणि बंडखोरीचे नाट्य आता टोकाला पोहोचले आहे. अमरावती मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार गाजी मोहम्मद जाहेरोश यांचा उमेदवारी अर्ज छाननीत फेटाळला गेला. त्यामुळे सध्या निवडणूक रिंगणात वंचितचा कोणताही उमेदवार नाही. त्यामुळेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने मोठे प्लॅनींग केले आहे. वंचितच्या मदतीसाठी थेट प्रकाश आंबेडकर यांच्याशी संपर्क साधला असल्याचे समजते.
मुंबईतील दादर येथील 'राजगृह' या प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी जाऊन एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांचे विशेष दूत ॲड. निलेश देशमुख यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. या भेटीदरम्यान वंचितचा उमेदवार रिंगणात नसल्याने शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आमदार किरण सरनाईक यांना अमरावती शिक्षक मतदारसंघात पाठिंबा आणि मदत करण्याची विनंती आंबेडकरांना करण्यात आली.
शिवसेनेकडून 'डॅमेज कंट्रोल'चे प्रयत्न
या महत्त्वपूर्ण भेटीनंतर ॲड. निलेश देशमुख यांनी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांचा दौरा करत 'डॅमेज कंट्रोल'चे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी अकोल्यात शिवसेनेच्या (Shivsena) स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. या दौऱ्यादरम्यान देशमुख यांनी अकोल्यातील वंचितच्या एका नगरसेवकाची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यासोबतच पातूर येथील माजी नगराध्यक्ष आणि शिक्षण संस्थाचालक सय्यद बुऱ्हाण नबी यांची भेट घेऊन अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या पाठिंब्याबाबत आणि काही स्थानिक नेत्यांच्या पक्षप्रवेशाबाबत सकारात्मक चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.
बंडखोरीमुळे सरनाईक यांच्या अडचणीत भर
अमरावती शिक्षक मतदारसंघात भाजप नेत्यांच्या जवळच्या नातेवाईकांनीच अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरीचा केली आहे. त्यामुळे महायुतीत तीव्र नाराजी पसरली आहे. तिवसा मतदारसंघातील भाजप आमदार राजेश वानखडे यांचे मेहुणे शेखर भोयर यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. तर भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या भगिनी संगीता शिंदे यांनीही बंडखोरी करत उमेदवारी मागे घेण्यास नकार दिला आहे. या दोन्ही प्रमुख बंडखोर उमेदवारांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. दुसरीकडे माजी आमदार श्रीकांत जॊशी निवडणूक रिंगणात उतरले असल्याने सरनाईक यांच्या अडचणीत भर पडली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.