Maharashtra FDA Action : राज्यातील अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागात तुकाराम मुंढे यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर विभागाच्या कामकाजातील मरगळ झटकली गेल्याचे चित्र दिसू लागले आहे.
विशेषतः राज्यभरातील गुटखा, भेसळ आणि तेल माफियांविरोधातील कारवाईला अभूतपूर्व वेग मिळाला असून, त्याचा थेट परिणाम अन्ननमुना तपासणीच्या आकडेवारीत दिसून आला आहे.
FDA च्या ताज्या आकडेवारीनुसार, जून 2025च्या तुलनेत जून 2026 मध्ये अन्न नमुना तपासणीमध्ये तब्बल 462 टक्क्यांची विक्रमी वाढ नोंदवली गेली आहे. जून 2026 या महिन्यात राज्यभरातून (Maharashtra) आलेल्या 7 हजार 494 अन्न नमुन्यांची तपासणी करण्यात आली. गेल्या वर्षी याच कालावधीत ही संख्या फक्त 1 हजार 622 इतकी होती.
विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उपलब्ध मनुष्यबळाचा अधिक प्रभावी वापर, प्रयोगशाळेतील उपकरणांचे ‘बॅच सिस्टीम’ने नियोजन, दोन पाळ्यांमध्ये कामकाज, प्राप्त नमुन्यांचे तातडीने वर्गीकरण आणि दूध (Milk), दुग्धजन्य पदार्थ, नाशवंत खाद्यपदार्थ तसेच प्रतिबंधित अन्न नमुन्यांना प्राधान्य देणे अशा उपाययोजनांमुळे ही मोठी वाढ शक्य झाली.
विशेष म्हणजे, 1 जून रोजी 13 हजार 474 अन्ननमुने तपासणीसाठी प्रलंबित होते. त्यापैकी केवळ जून महिन्यातच 7 हजार 494 नमुन्यांची तपासणी पूर्ण करण्यात आली. म्हणजेच, एका महिन्यातच प्रलंबित नमुन्यांपैकी जवळपास 56 टक्के कामकाज पूर्ण करण्यात FDA ला यश आले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे तपासण्यात आलेल्या नमुन्यांपैकी 4 हजार 091 नमुने गुणवत्ता निकषांशी विसंगत आढळले. यामुळे राज्यातील खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडून संकलित करण्यात आलेले नमुने मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील FDA प्रयोगशाळांमध्ये तपासले जातात. विभागात आलेल्या नव्या प्रशासनिक वेगामुळे पुढील काळात भेसळखोर आणि काळाबाजार करणाऱ्यांवर आणखी मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.