Fake IAS Officer Cheats 35 Lakh Sarkarnama
महाराष्ट्र

Fraud Case Pune : IAS अधिकाऱ्याची बतावणी अन् 35 लाखांची लुट; 21 वर्षीय तरुणाच्या भामटेगिरीने खळबळ!

Fake IAS Officer Fraud : IAS अधिकारी असल्याची बतावणी करून 21 वर्षीय तरुणाने तब्बल 35 लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नेमकी घटना काय? जाणून घ्या सविस्तर.

Sudesh Mitkar

यूपीएससी उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी झाल्याचा दावा, वृत्तपत्रांमधील मुलाखतींचा बनाव आणि थेट सोसायटीच्या अध्यक्षपदावर कब्जा... रहिवाशांचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याच सोसायटीच्या आर्थिक व्यवहारांवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे.

अवघ्या २१ वर्षांच्या तरुणाने आयएएस अधिकारी असल्याची बतावणी करून सोसायटीच्या मुदत ठेवीतील लाखो रुपये हडप केल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे, तर म्हाडामध्ये फ्लॅट मिळवून देण्याचे आमिष दाखवून नातेवाईकांकडूनही लाखो रुपये उकळले. या तोतया आयएएस अधिकाऱ्याला बाणेर पोलिसांनी अटक केली आहे.

हितेश प्रमोद कुलकर्णी (वय २१) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून, दत्तात्रय नागरगोजे यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हितेशने आयएएस अधिकारी झाल्याची बतावणी करून सोसायटीतील रहिवाशांचा विश्वास संपादन केला. त्याच्या कथित यशाचा प्रभाव इतका पडला की, रहिवाशांनी त्याची थेट सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड केली. मात्र, अध्यक्षपदाची जबाबदारी मिळताच त्याने सोसायटीच्या आर्थिक व्यवहारांचा गैरफायदा घेण्यास सुरुवात केली.

आयएएस झाल्याचा दावा; मुलाखतींचाही बनाव!

हितेशने २०२५ मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी झाल्याचे कुटुंबीयांना सांगितले होते. त्याच्या या दाव्यामुळे नातेवाईकांनी आनंदोत्सवही साजरा केला. वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांमध्ये त्याच्या मुलाखती प्रसिद्ध झाल्याने त्याच्या दाव्याला अधिक विश्वासार्हता मिळाली. मात्र, पोलिसांच्या तपासात तो केवळ बारावी उत्तीर्ण असल्याचे समोर आले आहे.

सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरही त्याने आयएएस अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याची माहिती दिली होती. या कथित प्रतिष्ठेचा वापर करून त्याने रहिवाशांचा विश्वास जिंकला आणि सोसायटीचे अध्यक्षपद मिळवले.

बनावट सह्या, ऑनलाइन बँकिंग अन् एफडीवर कर्ज

सोसायटीच्या ३७ लाख रुपयांच्या मुदत ठेवीवर पदाधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून ऑनलाइन बँकिंगची सुविधा सुरू करण्यात आली. त्यानंतर या मुदत ठेवीवर १० लाख रुपयांचे कर्ज घेण्यात आले. त्यातील पाच लाख रुपये स्वतःच्या वापरासाठी खर्च केल्याचा आरोप आहे. पुढे मुदत ठेव मोडून त्यातील २७ लाख रुपये आणि बँक खात्यातील तीन लाख रुपये स्वतःच्या खात्यावर वळविण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. अशा प्रकारे सोसायटीच्या आर्थिक व्यवहारांतून सुमारे ३५ लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे.

फ्लॅटच्या लॉटरीचे आमिष; नातेवाईकांकडूनही १९ लाख रुपये उकळले

सोसायटीतील रिकामे फ्लॅट लॉटरी पद्धतीने मिळवून देण्याचे आमिष दाखवून हितेशने काही जणांकडून फी आणि स्टॅम्प ड्युटीच्या नावाखाली सोसायटीच्या खात्यावर १९ लाख रुपये जमा करून घेतले. याशिवाय, म्हाडामध्ये सदनिका मिळवून देण्याचे आश्वासन देऊन पाच ते सहा नातेवाईकांकडूनही १९ लाख रुपये घेतल्याचे तपासात समोर आले आहे.

हितेशच्या आर्थिक व्यवहारांबाबत संशय निर्माण झाल्यानंतर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी चौकशी केली. त्यावेळी त्याने आयएएस अधिकारी असल्याचा केलेला दावा, बँकेतील आर्थिक व्यवहार आणि फ्लॅट मिळवून देण्याच्या आमिषातून केलेली फसवणूक उघडकीस आली. त्यानंतर नागरगोजे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

बाणेर पोलिसांनी हितेश कुलकर्णीला अटक केली असून, न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT